Maharashtra Politics Crisis : अजित पवारांकडे जलसंपदा? पाहा कोणत्या मंत्र्याला मिळणार कोणते मंत्रिपद?
Maharashtra NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Maharashtra NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 37 आमदारांचा पाठिंबा असल्याचे समोर आले आले आहे.
अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली, त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उप मुख्यमंत्रिपदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला जातोय. अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबतची माहिती समोर आली आहे. कोणत्या मंत्र्याला कोणती मंत्रिपदे मिळू शकतात ते पाहूयात..
अजित पवारांच्या गटाला मिळणारी संभाव्य मंत्रिपदे कोणती ?
अजित पवार : जलसंपदा
छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील : ऊर्जा
हसन मुश्रीफ : कौशल्य विकास
धनंजय मुंडे : गृहनिर्माण
आदिती तटकरे : महिला व बालकल्याण
संजय बनसोडे : पर्यटन
अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण
धर्मरावबाबा आत्राम : आदिवासी कल्याण
महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो. pic.twitter.com/mvZ2oh7w6u
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 2, 2023
सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार काय म्हणाले ?
राष्ट्रवादीने (NCP) सरकारसोबत निर्णय घेतला आहे . वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील नऊ वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी करत आहे. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे म्हणून विकासाचा एकमेव मुद्दा समोर ठेवून आम्ही निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अजित पवार म्हणाले, देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे, मी वर्धापन दिनी स्पष्ट भूमिका मांडली होती. तरुणांना संधी देणं गरजेचं आहे. नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजे, तसा प्रयत्न माझा राहणार आहे. कोरोना होता तरी विकास ही आमची भूमिका होती. केंद्रीय निधी राज्याला कसा मिळेल यासंदर्भात पुढाकार घेणार आहे. हा निर्णय आमदारांना हा निर्णय मान्य आहे. आम्ही सत्तेत राष्ट्रवादी पक्ष म्हणून सहभागी होत असून पुढे देखील निवडणुका पक्ष चिन्हासोबतच लढवणार आहे.