Nandurbar News : आदिवासी विकास विभागाने (Trible Department) योजनांच्या माहिती व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र टोल फ्रि क्रमांक (Toll free Number) कार्यांन्वित केला असून लवकरच बहुसंवादी मोबाईल ॲप्लिकेशन (Mobile App) व वेब पोर्टलची स्थापना करण्यात येणार असून, त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या योजना, उपक्रम यांची सर्व प्रकारची माहिती मिळविणे अधिक सोपे व सुलभ होणार असल्याचे प्रतिपादन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. 


नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळा नूतन शालेय इमारतींच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पालकमंत्री डॉ. गावित (Vijayakumar Gavit) बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी विकास विभागाकडून अनुसूचित जमातीसाठी अनेक वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्या योजनांची माहिती देण्यासाठी विभागामार्फत 1800 2670007 हा टोल फ्री क्रमांक प्रजासत्ताक दिनापासून सुरु करण्यात आला आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड आदी कागदपत्रे मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन कार्यालयीन वेळेत या टोल फ्री क्रमांकावरुन मिळणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


ते पुढे म्हणाले की, मोबाईल ॲप्लिकेशन व वेब पोर्टच्या माध्यमातून आता प्रशिक्षणार्थी आदिवासी उमेदवारांना अभ्यासक्रमाची नोंदणी केल्यापासूनच अभ्यास साहित्य आणि अनुषंगिक माहितीचा तपशील आणि त्याबाबत काही तक्रार असल्यास त्याचे निवारण तात्काळ करण्यात येणार आहे. संभाव्य नोकरी देऊ करणारे आणि नोकरी मिळवू पाहणारे कुशल आणि प्रशिक्षित आदिवासी उमेदवार या दोघांसाठी उपयुक्त प्लेसमेंट संबंधित  सर्व सेवा एकाच जागी या माध्यमातून निर्माण होणार आहेत. भरती करणारे त्यांच्या रिक्त जागांचे तपशील आवश्यक असलेल्या विशिष्ट कौशल्यांसह त्यावर पोस्ट करू शकतील. तसेच त्यांना तक्रार निवारणासह नोकरी देणाऱ्याचा अभिप्राय / रेटिंग मिळविण्यात मदत तसेच कुशल आदिवासी उमेदवारांना संभाव्य नोकरी देऊ करणाऱ्यांसोबत चॅट आणि व्हॉईस कॉल मोडद्वारे संवाद साधण्यासाठी मदत या ॲपच्या माध्यमातून होणार आहे. 


टोल फ्री नंबरवर मिळणार…


माहिती आणि मार्गदर्शनासाठी 1800 267 0007 निःशुल्क कॉल करता येणार आहे. वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजनांची माहिती लगेच मिळणार आहे. शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, जमातीचा दाखला, बँकेत खाते उघडणे, मनरेगा नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड मिळणेबाबतची माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. कुठल्याही कार्यालयात न जाता सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत मिळणार माहिती व मार्गदर्शन मिळणार आहे. 


ॲपच्या माध्यमातून मिळणार…


प्रशिक्षणार्थी उमेदवारांना अभ्यासक्रमांची नोंदणी केल्यापासून अभ्यास साहित्याची माहिती मिळणार.
तक्रार करता येणार व त्याचे निराकरणही तात्काळ होणार
नोकरी देणारे व नोकरी इच्छुक आपली माहिती अपेक्षित कौशल्यांसह पोस्ट करणार.
नोकरी देणाऱ्याकडून मिळणार अभिप्रायासह रेटींग.
नोकरी देऊ करणाऱ्यांसोबत चॅट आणि व्हॉईस कॉल द्वारे संवाद साधण्यासाठी मदत होणार.