Onion : सध्या कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात घसरण होत आहे. कांद्याच्या दरात कधी वाढ होणार याच्या प्रतिक्षेत शेतकरी आहेत. तर काही ठिकाणी शेतकरी कांद्यावर ट्रॅक्टर फिरवत असल्याची स्थिती आहे. दरम्यान, नेमकी कांद्याच्या दरात घसरण का होत आहे? देशात कांद्याची गरज किती? कांद्याच्या दरात सुधारणा होणार का? यासंदर्भातील माहिती शेतमाल बाजार अभ्यासक दीपक चव्हाण (Deepak Chavan) यांनी एबीपी माझाला दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात...
देशाला दरमहा कांद्याची 15 लाख टनाची गरज
देशाला दरमहा कांद्याची गरज ही 15 लाख टनाची आहे. त्याचबरोबर निर्यातीसाठी साधारणत: दोन ते अडीच लाख टन कांदा लागतो. असे एकूण 17 त 18 लाख टन कांद्याची देशाला दरमहा गरज असते. मात्र, ज्यावेळी गरजेपेक्षा कांद्याचा पुरवठा अधिक होतो. त्यावेळी कांद्याचे दर घसरतात आणि उत्पादन खर्चापेक्षा शेतकऱ्याला कमी दर मिळतो असे दीपक चव्हाण म्हणाले. चालू फेब्रुवारी महिन्यामध्ये अशीच परिस्थिती दिसत आहे. कांद्याचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळं दरात घसरण होत असल्याचे दीपक चव्हाण म्हणाले.
लेट खरीपाच्या लाल कांद्याचे उत्पादन वाढलं
यावर्षी लेट खरीपाचा भाग असणाऱ्या लाल कांद्याचं उत्पादन देशभरात वाढलं आहे. लेट खरीपाचा कांदा हा टिकावू नसतो. हार्वेस्ट केल्यानंतर आठ दिवसात लेट खरीपाचा कांदा विकावा लागतो. गेल्या तीन वर्षापासून मुख्य खरीपातले पाऊसमान प्रतिकूल राहत असल्यानं आणि दर मिळत नसल्यानं लेट खरीपातलं कांद्याचे क्षेत्र वाढल्याचे चव्हाण म्हणाले. लेट खरीपाच्या कांद्याच्या वाढीच्या काळात हवामान चांगले होते. त्यामुळं एकरी कांद्याची उत्पाकता वाढली आहे. त्यामुळं कांद्याचा पुरवठा वाढून दर कमी मिळत असल्याची माहिती दीपक चव्हाण यांनी दिली.
लाल कांद्याच्या पुरवठ्याची परिस्थिती दोन ते तीन आठवडे राहणार
मागील तीन वर्षापासून फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे दर किफायती राहत होते. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात माल निघेल या हिशोबाने शेतकऱ्यांनी कांद्याच्या लागणी वाढवल्या होत्या असे चव्हाण म्हणाले. सध्या कांदा निर्यात सुरु आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा जास्त असल्यानं दर घसरत आहेत. लाल कांद्याच्या पुरवठ्याची परिस्थिती दोन ते तीन आठवडे राहील. पुढे उन्हाळ कांद्याचा हंगाम सुरु होईल. उन्हाळ कांदा साठवता येतो. त्यावेळी सध्या सारखी पॅनिक सेलिंग होणार नाही. त्यामुळं बाजारभावात थोडीफार सुधारणा अपेक्षीत असल्याचे दीपक चव्हाण म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: