Parbhani News: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे आपल्या स्पष्ट बोलीसाठी प्रसिद्ध असून, याचा प्रत्यय परभणीकरांनाही (Parbhani) आला आहे. परभणीतील विविध रस्त्यांच्या भूमीपूजन आणि कोनशिला अनावरण गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गडकरी यांनी थेट मंचावरूनच नेत्यांना सुनावले. कंत्राटदार काम व्यवस्थित करत नसतील तर त्याच्या तक्रारी करा, पण ब्लॅकमेल करण्यासाठी तक्रारी करू नका. पैसे कमवा परंतु असे कमवू नका असे म्हणत गडकरींनी नेत्यांना सुनावले. तर गडकरींच्या वक्तव्यावर समोर बसलेल्या नागरिकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. 


परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बाह्यवळण रस्ता तसेच, इतर रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी परभणी जिल्ह्यातील रस्त्यावरून चांगलीच खरडपट्टी काढत, रस्ते चांगले होत नसल्याच्या तक्रारी केल्या जात असल्याचा उल्लेख केला. तर रस्ते चांगले करून घ्या केवळ कंत्राटदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी तक्रारी करू नका, पैसे कमवा परंतु ब्लॅकमेल करून कमवू नका असा सल्ला दिला. तर मी 50 हजार कोटींचे काम केले पण एकही कंत्राटदार माझ्या घरी येत नाही असा सणसणीत टोलाही गडकरी यांनी लगावला. 


गडकरींचा रोष नेमका कुणावर 


तर याबाबत नेमकं गडकरी यांचा रोष कुणाकडे होता याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना विचारले असता, परंतु फक्त काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी तक्रारी जास्त केल्या त्यांच्याकडे तसेच ते दिल्ली असणाऱ्यांबाबत बोलले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे गडकरी यांचा रोष नेमका कुणावर हे मात्र समजू शकले नाही.


जिल्ह्यात जलसिंचन वाढवा


परभणी जिल्ह्याला गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी मिळते. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाच्या माध्यमांतून आर्थिक उन्नती होण्यास हातभार लागेल. त्यासाठी ग्रामीण भागात सिमेंटचे पक्के रस्ते होणे आणि तो भाग शहरांशी जोडला जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शेतकऱ्यांनी पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सौरकृषि पंप योजनेचा लाभ घेत भविष्यात सौरकृषी पंपाच्या माध्यमातून आर्थिक स्तर ऊंचावण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. शेतकरी अन्नदाता आहेच आता तो ऊर्जादाता झाला पाहिजे, असे सांगून बांबूपासून इथेनॉल निर्मिती करता येत आहे. तसेच शेतातील विविध टाकावू वस्तूंपासून इंधननिर्मिती करण्याकडे शेतकऱ्यांनी वळण्याचे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nitin Gadkari : हिंगोलीची हळद साता समुद्रापार गेली पाहिजे - गडकरी