Fit India Mobile App: क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Sports Minister Anurag Thakur) यांनी आज 'फिट इंडिया' (Fit India) कार्यक्रमाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वैयक्तिक प्रशिक्षण-सह-फिटनेस मार्गदर्शन प्रदान करणारे 'फिट इंडिया' मोबाईल अॅप लॉन्च केले.


ठाकूर म्हणाले की, हे अॅप राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतातील लोकांना सरकारने दिलेली भेट आहे. राष्ट्रीय क्रीडा दिवस हा हॉकीचे दिग्गज मेजर ध्यानचंद यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.


"फिट इंडिया अॅप हे मेजर ध्यानचंद यांना श्रद्धांजली आहे, जे देशातील खेळाडूंचे नायक आहेत," असे गौरवोद्गार ठाकूर यांनी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात काढले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यानेही ऑनलाइन सहभागी होऊन या कार्यक्रमात भाग घेतला.






क्रीडा मंत्री म्हणाले, "खेळाडूंना तंदुरुस्त राहण्यासाठी हे अॅप अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यांनी अॅपचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. तरुण भारत तंदुरुस्त ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. कारण तंदुरुस्त तरुण महान भारत बनवू शकतो."


मनप्रीतने या अॅपचे समर्थन करत म्हटले की, "आम्ही फिटनेसला पुरेसे महत्त्व देत नाही. आम्हाला दिवसातील फक्त अर्धा तास फिटनेससाठी समर्पित करण्याची गरज आहे. हे अॅप मजेदार आणि मोफत आहे. अॅपद्वारे आपण कुठेही आपल्या फिटनेसची चाचणी करू शकतो.


ते म्हणाले, "हे अॅप अतिशय उपयुक्त आणि वापरण्यास सोपे आहे. मी ते आधीच वापरत आहे आणि मला आशा आहे की यामुळे मला माझा फिटनेस आणखी सुधारण्यास मदत होईल."


या कार्यक्रमात क्रीडा राज्यमंत्री निसीथ प्रमाणिक, क्रीडा सचिव रवी मित्तल, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.