नाशिक : नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव आणि त्यांचा 17 वर्षाचा मुलगा प्रणव जाधव या दोघांचा 19 एप्रिल 2022 ला पहाटे राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगदीश यांनीच आपल्या मुलाचा खून केला आणि त्यानंतर स्वतः फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जगदिश यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार जगदीश यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी परिसरात सीतागुंफा जवळील रेवास्वामी सोसायटीमध्ये महापालिका कर्मचारी तथा गुरुदत्त सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक जगदीश जाधव हे आपल्या कुटुंबीयासमवेत वास्तव्यास होते. बुधवारी रात्री जगदीश, त्यांचा 17 वर्षीय मुलगा प्रणव आणि पत्नी शोभा यांनी जेवण केले. जेवणानंतर गार गार आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेऊन एक वाजेच्या दरम्यान जगदीश आणि प्रणव हे हॉलमध्ये तर शोभा या दुसऱ्या खोलीत झोपी गेल्या होत्या. मात्र गुरुवारी सकाळी 7 च्या दरम्यान शोभा या हॉलमध्ये आल्या असता त्यांना जगदीश हे सिलिंग फॅनला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत लटकलेल्या अवस्थेत दिसले त्यानंतर बेडवर झोपलेल्या प्रणव जाधवला त्यांनी आवाज दिला असता त्याने काही एक प्रतिसाद दिला नाही तसेच त्याचे शरीरही थंड पडलेले दिसताच त्यांना धक्काच बसला. दरम्यान ही बातमी समजताच काही वेळातच जगदीश यांचे मित्र मंडळी आणि पंचवटी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दरम्यान जगदीश यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली असावी असा पोलिसांना प्राथमिक संशय होता. मात्र प्रणवच्या मृत्यूमागील कारण काय? याचे गूढ कायम होते, पोलिसांच्या तपासाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतांनाच शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांच्या चौकशीत जे काही समोर आले ते धक्कादायक होते.
शवविच्छेदन अहवालात जगदीश यांचा गळफास घेतल्याने तर प्रणवचा गळा आवळून खून झाल्याचे समोर आले. त्यानंतर जगदीश यांच्या पत्नी शोभा जाधव यांनी पोलिसांकडे तक्रार देताच मयत जगदीश जाधव यांच्यावर शुक्रवारी (20 एप्रिल 2022 ला) पंचवटी पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रणवचा स्वभाव हट्टी होता तसेच तो वडिलांना उलटून बोलायचा, हात उगारायचा, घरात शिवीगाळ करायचा आणि याच सर्व प्रकारामुळे जगदीश हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. या सर्व प्रकाराला कंटाळून प्रणवला गळा आवळून त्यांनी जीवे ठार मारले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेत जगदीश यांनी आपले जीवन संपवले.
मनमिळाऊ स्वभावाचे तसेच प्रत्येकाच्या सुख दुःखात धावून जाणारे म्हणून जगदीश जाधव यांची पंचवटी परिसरात ओळख होती. मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता, मित्रपरिवाराकडून तो जल्लोषात साजरा करण्यात आला होता मात्र त्यानंतर दोनच दिवसांनी जगदीश यांच्या मृतदेहाला खांदा देण्याची वेळ मित्रपरिवार आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जगदीश यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलण्याआधी नातेवाईक तसेच मित्रपरिवारासोबत संवाद साधला असता तर त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता अशीच भावना मित्र परिवाराकडून व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
कर्जात बुडला... पण कन्यादानाचं कर्तव्य करून जीवन संपवलं; मुलीच्या लग्नानंतर सातच दिवसात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या