Nashik Water Source 'Geo Tagging' : दुषित पाण्यापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने यावर्षीही जिल्ह्यातील जलस्त्रोतांची मोबाइल ॲपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. 11 एप्रिलपासून सुरु झालेल्या या अभियानात आतापर्यत 98 टक्के काम पूर्ण झाले आहे. सदर अभियान 31 मे पर्यत असून जिल्हयातील सर्व 7354 स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करुन त्याचे जिओ टॅग करण्यात येत आहे. 


दरम्यान, इगतपूरी तालुक्यातील 7 पाण्याचे स्त्रोत हे धरणांच्या पाण्यात असल्याने पाण्यातून जात सदर स्त्रोतांपर्यत पोहचून सदरच्या पाण्याचे नमूने घेऊन जिओ टॅग करण्यात आले. नाशिक जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्ष हा उपक्रम राबवित असून, या कक्षाच्या पाणी गुणवत्ता शाखेकडून शुद्ध निर्जंतुक पाणी ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यात सुमारे 7354 जलस्त्रोत असून, या सर्व स्त्रोतांच्या पाणी नमूण्यांची तपासणी भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेमार्फत करण्यात येत आहे.


रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात 100 टक्के पूर्ण करण्यात यावे. या बाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व  संबंधित विभागाला दिल्या असून त्यानुसार हे अभियान यशस्वी करण्यासाठी पाणी व स्वच्छता विभाग व आरोग्य विभाग यांच्यामार्फत काम करण्यात येत आहे. सध्यस्थितीत जिल्हयाचे 98 टक्के काम पूर्ण झाले असून महाराष्ट्रात नाशिक जिल्हयाचे सर्वाधिक काम झालेले आहे. 


या अभियानात जलसुरक्षकांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांच्या सहकार्याने जिओ फेन्सिंग मोबाईल ॲपद्वारे नमुने गोळा  करण्यात येत असून गोळा करण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी उपविभागीय प्रयोग शाळांतून करण्यात येत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी दिली.



जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड म्हणाल्या कि, रासायनिक तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जलस्त्रोतांच्या पाण्यामध्ये असलेल्या कमतरतेची माहिती मिळण्यास मदत होत असून त्यावर  जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियानाचे काम जिल्ह्यात 100 टक्के पूर्ण करण्यासाठी इगतपूरी तालुक्यातील भरवस, निरपण व भाम धरणात असलेल्या 7 पाणी स्त्रोतांचेही जिओ टॅग करण्यात आले आहे. जिल्हयातील ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकांना शुध्द पाणी मिळावे हाच प्रशासनाचा मुख्य हेतू असून त्यानुसार जिल्हयात पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सध्यस्थितीत जिल्हयाचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.


अशी होते तपासणी
सार्वजनिक पिण्याच्या स्त्रोतांचे सॅटेलाईट द्वारे टॅग करणेसाठी शासनाने नागपूर येथील MRSAC  या संस्थेला जबाबदारी दिली आहे.  जिओफेन्सिंग हे एक मोबाईल अँप असून हे अँप सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने गोळा करणेसाठी वापरतात. स्रोतांच्या १० मिटर परिघात गेल्यावर अँप सुरु करून त्याद्वारे स्रोत जिओ टॅग करण्यात येऊन फोटो घेऊन नमुना घेणेत येतो. याद्वारे जिल्ह्यात किती पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी झाली, किती पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत रासायनिक तपासणीसाठी शिल्लक राहिले याची माहिती मिळते.