Beed : बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नामदेव आसाराम जाधव असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. नामदेव जाधव यांना एकूण दोन एकर शेती असून त्यांनी शेतामध्ये 265 जातीचा ऊस लागवड केला होता.
त्यासाठी त्यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आला होता. मात्र हा ऊस आता तोडणीला येऊनदेखील रिसरातील एकही कारखाना तो ऊस घेऊन जात नव्हता. गेल्या अनेक
दिवसांपासून ऊस घेऊन जाण्यासाठी मदेव जाधव हे कारखान्याकडे चकरा मारत होते. मात्र त्यांना कारखान्याकडून निराशाच मिळाली. यामुळे नैश्यात आलेल्या आसाराम जाधव यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.
हिंगणगावातील नामदेव जाधव यांनी ऊसाच्या फडाला पेटवून देत फडातिलचं लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे. संतप्त शेतकऱ्याने ऊस पेटवून देत ऊसाच्या फडातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. राज्यातील अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक आहे. दरम्यान, राज्यातील अतिरीक्त उसाचे गाळप पूर्ण होईल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे उसाच्या उताऱ्यावरील घट आणि वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा निर्णय देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच तोडणी यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे उताऱ्यात घट होत आहे. अनेक ठिकाणी ऊस शिल्लक आहे. त्यामुळे उसाचे लवकरात लवकर गाळप व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
अद्याप अनेक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच असल्याचे चित्र दिसत आहे, त्यामुळे मे महिना पूर्ण कारखाने सुरु राहणार आहेत. अद्याप राज्यात 33 लाख टन ऊसाचे गाळप शिल्लक राहिले आहे. त्यामुळे साधारणत 10 जूनपर्यंत काही साखर कारखाने सुरु राहणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या