अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन डबल मर्डर प्रकरणातून निर्दोषमुक्त
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं 29 जुलै 2009 रोजी जेजे सिग्नलजवळ झालेल्या शूटआऊट प्रकरणातील आपला निकाल जाहीर सोमवारी जाहीर केला.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला (chhota rajan) मुंबई सत्र न्यायालयानं एका दुहेरी हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं आहे. ठोस पुराव्यांअभावी याप्रकरणातून छोटा राजनविरोधातील तपासयंत्रणेचे आरोप सिद्ध होत नाहीत असं स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय (CBI) कोर्टाचे न्यायाधीश ए.टी. वानखेडे यांनी राजनसह अन्य दोन आरोपींना निर्दोष मुक्त केलं आहे. तर दोन मुख्य मारेक-यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं 29 जुलै 2009 रोजी जेजे सिग्नलजवळ झालेल्या शूटआऊट प्रकरणातील आपला निकाल जाहीर सोमवारी जाहीर केला. छोटा शकील गँगचे गुंड असिफ दाढी आणि शकील मोडक या दोघांची जेजे सिग्नलजवळ बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दोन टोळ्यातील युद्धात झालेल्या या हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात मारेक-यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासाअंती मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अली जलान मोहम्मद शेख, प्रणय राणे, रेहमान हुसैन शेख आणि अदनान सय्यद या चौघांना अटक केली होती. ही हत्या छोटा राजनच्या गुंडांनी त्याच्याच सांगण्यावरून केल्याचा आरोप ठेवत छोटा राजनलाही यात आरोपी करण्यात आलं होतं. याप्रकरणी अली जलान आणि प्रणय राणे या दोघांना जन्मठेप सुनावली आहे, तर छोटा राजनसह रेहमान हुसैन आणि अदनान सय्यद या दोघांना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं आहे.
छोटा राजनला बालीहून भारतात आणल्यानंतर या केसलाही राजनविरोधातील इतर सर्व प्रकरणांप्रामणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं होतं. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात हा खटला चालवण्यात आला. मात्र पुराव्यांअभावी अखेर विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायधीश अरविंद वानखेडे यांनी छोटा राजनला या दुहेरी हत्याकांडाच्या कटात सामील असल्याच्या आरोपातून निर्दोषमुक्त केलं आहे. छोटा राजनसाठी त्यांचे वकील तुषार खंदारे यांच्यासह सुदिप पासबोला यांनी बाजू लढवली तर सीबीआयसाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कामकाज पाहिलं.