Maharashtra Mumbai Rains LIVE : पुणे -पानशेत रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प
राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
केज तालुक्यातुन वाहणाऱ्या केजडी नदीला माशांचा महापूर आला असून नदी पात्रातील जिवंत मासे पाहण्यासाठी आणि धरण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. केज तालुक्यांतील शेलगाव गांजी येथील गावा लगतच्या वाहणाऱ्या केजडी नदीच्या फरशी पुला जवळच्या नदी पात्रात प्रचंड प्रमाणात जिवंत मासे वाहत आहेत. जणू काही माशांचा महापूर आल्यासारखे दिसत आहे. हे दृश्य म्हणजे नुसता जिवंत माशांचा खच पडलेला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. मासे पकडण्यासाठी गर्दी होत असून अवघ्या गुडघाभर पाण्यात एवढे प्रचंड मासे आणि त्यांचे विलोभनीय दृश्य म्हणजे जणू काही नदीला माशांचा पूर आल्या सारखे अत्यंत मनमोहक आणि मनाला मोहून जाणारे दृश्य आहे.
पुणे -पानशेत रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. ओसाडे व सोनापूर या गावांच्या शिवेवर मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. एका खाजगी जागा मालकाने बांधलेली संरक्षक भिंत आणि दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवण्याचे काम सुरु केलं आहे. शनिवारची सुट्टी असल्यानं पानशेतकडे निघालेले अनेक पर्यटक अडकून पडले आहेत. या घटनेमुळे अवैध उत्खनन व बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Satara rain : वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात 6 हजार 168 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणातील पाणी पातळी सातत्यानं वाढत आहे. त्यामुळं धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून 9 हजार 144 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. नीरा नदीच्या पात्रात एकूण 15312 क्युसेक विसर्ग राहील. आज दुपारी 4 वाजता विसर्ग वाढवण्यात येणार आहे. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पूल खचले आहेत. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भाग असणाऱ्या नांदेड जिल्ह्यालगत असणाऱ्या तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेचा पार खोळंबा झाला आहे. किनवट-हिमायतनगर-नांदेड राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्र,तेलंगणा, आंध्र प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. पण याही राष्ट्रीय महामार्गावर खैरगाव बुरकुलवाडी येथे पर्यायी पूल पुराच्या पाण्याने पूर्णतः वाहून गेला आहे. दरम्यान नव्याने काम सुरु असलेल्या पुलावरील खैरगाव व बुरकुलवाडी या दोन्ही बाजूंनी ट्रक फसल्याने वाहनांच्या रंगांच रांगा लागल्या आहेत. ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक मात्र सकाळपासून ठप्प झाली आहे.
अलमट्टी धरणातील विसर्ग आणखी वाढवला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून अलमट्टी धरणातून 1 लाख 50 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याआधी धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु होता. धरणाखालील गावांना अलमट्टी धरण प्रशासनाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अलमट्टीचा विसर्ग वाढविणार असल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणी पातळी कमी व्हायला मदत होणार आहे.
अलमट्टी धरणातून काही वेळात 1 लाख 50 हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. अलमट्टी धरणाचे दरवाजे आणखी उघडणार आहेत. सध्या 1 लाख 25 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे सांगली कोल्हापूरला मोठा दिलासा मिळणार आहे. कर्नाटक राज्याकडून महाराष्ट्र सरकारला सहकार्य केले जात आहे.
कोयना धरणाच्या विद्युत केंद्रातून 12 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्यानंतर आता कोयना नदीचे पात्र वाढत चालले आहे. त्यामुळं जुना संगमनगर धक्का पूल हा पाण्याखाली गेलेला आहे. त्याचबरोबर या परिसरातील अनेक छोटे-मोठे फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर आणि कोयना धरणात येणारी मोठ्या प्रमाणात आवक यामुळं कोयना धरण हे 50 टक्के भरले आहे. असा जर पाऊस राहिला तर अवघ्या काही दिवसातच कोयना धरण हे भरायला मदत होणार आहे. सध्या कोयना धरणामध्ये 53 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
कृष्णावंती नदीच्या पात्रात क्रेटा गाडी वाहून गेल्याने दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना अकोले तालुक्यातील कळसुबाई जवळील वारंघुशी परिसरात घडली. एकाला वाचविण्यात यश आलं आहे. मध्यरात्री स्थानिकांच्या मदतीने गाडी बाहेर काढली आहे. हे दोन्ही पर्यटक औरंगाबाद जिल्ह्यातील होते. तर अन्य एका घटनेत तोल जाऊन पर्यटक कृष्णावंती नदीत पडला आहे. हा पर्यटक नाशिक जिल्ह्यातील असून शोद सुरु आहे. त्यांचे वय 72 वर्ष आहे.
रायगड जिल्ह्यातील तरुणांना अतिवृष्टी व महापुराची परिस्थितीमध्ये बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात आलं. रोहा येथील कुंडलिका नदीपात्रात बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात आलं. एकूण 50 तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलं. जलजीव रक्षक प्रशिक्षण सहकारी संस्था रायगड, महाराष्ट्र व ऑस्ट्रोलिया लाईफ सेविंग अॅकेडमी यांच्या माध्यमातून बचाव कार्याचे प्रशिक्षण देण्यात आले. नरवीर तानाजी मालुसरे रेस्क्यू टीमचे प्रमुख रामदास कळंबे यांच्या उपस्थितीत 50 युवकांना प्रशिक्षण दिलं गेलं. आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक दत्ता तरे व वाईलडर वेस्ट रेस्क्यू अकॅडमी कोलाडचे महेश सानप यांनी प्रशिक्षण दिले.
Chandrapur rain : चंद्रपूर जिल्ह्यात पावसानं विश्रांती दिली आहे. त्यामुळं चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती सुधरण्याची शक्यता आहे. वर्धा, अमरावती, भंडारा जिल्ह्यातून आणि चंद्रपूरच्या इरई धरणातून होणाऱ्या जलविसर्गात मोठी घट झाली आहे.
कोयना धरण 50 टक्के भरले आहे. सध्या 2 हजार 100 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोयनेत प्रतिसेकंद तब्बल 61 हजार क्युसेक्सने पाण्याची आवक सुरु असल्यानं पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. 105 टीएमसी पाणी साठा असलेल्या कोयना धरणात 52 टीएमसी पाणी साठा झाला आहे. गेल्या 24 तासात कोयनेत 153 मिलिमीटर पाऊस तर महाबळेश्वररात 178 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Parbhani rain : परभणीत काल दुपारपासून पावसाने उसंत घेतली आहे. सलग 7 दिवस पडलेल्या पावसानं प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. गंगाखेडचा मासोळी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. तसेच लोअर दुधना प्रकल्पात 67.88 टक्के पाणीसाठा झाला आहे तर, येलदरीत 62 टक्के पाणीसाठा झाला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Updates LIVE : राज्याच्या अनेक भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूर आल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंबीर स्थिती आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या भागात देखील पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत असल्याचं चित्र दिसत आहे.
आंबोली घाटात झाड कोसळलं
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या तिथे एकेरी वाहतूक सुरु आहे. दरम्या, झाड बाजूला करण्याचे प्रयत्न सरु आहेत.
अमरावती जिल्ह्यातही जोरदार पाऊस
अमरावती जिल्ह्याला वरदान असलेल्या अप्पर वर्धा धरणाची 13 गेट उघडण्यात आली आहेत. तेरापैकी 9 गेट 70 सेंटिमीटरने तर चार गेट 60 सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून 1 हजार 392 दश लक्ष घन मीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
चंद्रपूर शहरात परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. वर्धा, अमरावती, भंडारा जिल्ह्यातून आणि चंद्रपूरच्या इरई धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. शहराला वळसा घालणाऱ्या इरई नदीचे बॅक वॉटर सखल भागात शिरण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -