Maharashtra Mumbai Rains LIVE : कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली ते नांदगाव यादरम्यानची वाहतूक विस्कळीत

सद्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jul 2022 05:05 PM
Kokan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली ते नांदगाव यादरम्यानची वाहतूक विस्कळीत

Kokan Railway :  कोकण रेल्वे मार्गावरील कणकवली ते नांदगाव यादरम्याने रेल्वेची इलेक्ट्रिक तार तुटल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत. कणकवली ते नांदगावच्या मध्ये मालगाडी रुळावर थांबली असल्याने मुंबईवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.  दुपारी रेल्वे मार्गावरील इलेक्ट्रिक तार तुटल्याने अडीच ते तीन तास कोकण रेल्वे वाहतूक ठप्प होती. मात्र आता कोकण रेल्वे वाहतूक इलेक्ट्रिक तार जोडल्यामुळे पूर्वपदावर येत आहे

निरा खोऱ्यात दमदार पाऊस, वीर धरण 91 टक्के भरले

निरा खोऱ्यात गेली सहा दिवसापासून दमदार पाऊस बरसत असल्याने नीरा नदीवर असलेले वीर धरण हे 91 टक्के भरले आहे. धरणातून आज दुपारी दोन वाजता नीरा नदी पात्रात 4 हजार 418 क्यूसेस विसर्ग निरा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या विद्युत ग्रहातून 300 क्यूसेस आणि डावा कालवा विद्युत ग्रहातून 1 हजार 400 क्यूसेस असे एकूण नीरा नदी पात्रात 6 हजार 118 क्यूसेस  पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गुहागर वेळणेश्वर येथे भरतीचे पाणी लोक वस्तीपर्यंत शिरले

गुहागर वेळणेश्वर येथे भरतीचे पाणी लोक वस्तीपर्यंत शिरले आहे. याबाबत लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या कोणतेही नुकसान झाले नाही. सध्या ओहोटी सुरु झाली आहे.

RTMNU : नागपूर विद्यापीठाच्या आज व उद्याच्या परीक्षा रद्द

नागपूरः सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यापीठाच्या आज (15 जुलै) व उद्या म्हणजेच 16 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षांना स्थगित करण्यात आले आहे. तिन शिफ्ट मध्ये परीक्षा होणार होत्या. या रद्द झालेल्या परीक्षांबाबत विद्यापीठाच्यावतीने नंतर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाच्यावतीने देण्यात आली.

वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामध्ये 27 दरवाजे 1 मिलिमीटर तर 6 दरवाजे हे 0.50 मिलिमीटरने उघडण्यात आले आहेत. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळं वैनगंगा नदीच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळं प्रशासनानं खबरदारी घेत गोसिखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा  दिला आहे.


 
विहिरीत पडला जंगली गवा, बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु

महाबळेश्वर तालुक्यातील मोळेश्वर गावातील विहिरीत जंगली गवा पडला आहे. सुमारे दीडशे फूट खोल विहिरीत पडलेल्या गव्याला बाहेर काढण्यासाठी ट्रॅकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. अति पावसामुळं हा गवा विहिरीत पडला आहे.

Nagpur Rains : नागपूर विभागात सरासरी 45.8 मिमी पाऊस, विभागातील 12 तालुक्यात अतिवृष्टी

नागपूर :  विभागात गेल्या चोवीस तासात सरासरी 45.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विभागात 12 तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हानिहाय अतिवृष्टी झालेल्या तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे 122.9 मिमी,  नागपूर ग्रामीण 101.1 मिमी,  उमरेड 94.5 मिमी, कुही 88.5 मिमी, नागपूर शहर 82.7 मिमी, पारशिवनी 65.1 मिमी, कामठी 64.3 मिमी, भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर  येथे  83 मिमी, , गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया येथे 81.3 मिमी, मोरगांव अर्जुनी तालुक्यात 81 मिमी, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात 78.3 मिमी तर  चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात  70.7 मिमी पावसाची नोंद झाली.

अमरावती : अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 दरवाजे उघडले

अमरावती जिल्ह्यात अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 दरवाजे उघडले. तेरा पैकी नऊ दरवाजे हे 70 सेंटिमीटरने तर चार दरवाजे हे 60 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून धरणाच्या तेराही दरवाजातून आता 1392 क्युसिक पाण्याचा विसर्ग वर्धा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. अप्पर वर्धा धरण 80 टक्के भरले आहे.


विदर्भातील नागपूर, अमरावतीमध्ये आजही मुसळधार इशारा

Nagpur : विदर्भातील नागपूर आणि अमरावती (Amravati) जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याच्यावतीने देण्यात आला आहे. विभागाच्यावतीने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तर अकोला (Akola), चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया (Gondia) आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील विविध जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे होणाऱ्या पावसाळी अपघातांची संख्या वाढली आहे. तर जिल्ह्यातील अनेक गावांचे संपर्क तुटले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

किनवट तालुक्यात पावसाचा कहर, सात जनावरांचा मृत्यू
Nanded rain : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केल्याने घराबाहेर पडणे देखील कठीण झालं आहे. अशा पावसातच सात जनावरे मृत्युमुखी तर तीन जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. तल्हारी तांडा येथे अतिवृष्टीने जनावरांचा गोठाच मोडून जनावराच्या अंगावर पडल्याने जवळपास 10 ते 12 जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना तल्लारी तांडा येथे घडली आहे. या जखमी जनावरांना उपचार भेटावा म्हणून तल्हारी तांडा येथील शेतकरी तुकाराम मुनसिंग राठोड या शेतकऱ्याने संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना काळवली आहे. पण आत्तापर्यंत येथे कुठलीही पशुवैद्यकीय मदत पोहोचली नाही. त्यामुळे उपचाराअभावी ही जनावरे तडफडत आहेत.
अप्पर वर्धा धरण 80 टक्के भरले, धरणाच्या नऊ दारातून विसर्ग सुरु

पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठ असलेलं अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे आज सकाळी अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी नऊ दरवाजे हे 70 सेंटिमीटरने तर चार दरवाजे हे 60 सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, धरणाच्या तेराही दरवाजातून आता 1392 क्युसेकने पाण्याचा विसर्ग वर्धा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. दरम्यान धरण 80 टक्के भरले आहे.

दोन तरुण मोटरसायकसह गेले वाहून, एक जण बचावला तर दुसरा बेपत्ता

सासुरवाडीहून मध्यप्रदेशातील गावी जात असताना दोन तरुण मोटरसायकसह वाहून गेल्याची घटना घडली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील कवलेवाडा-चिखला रस्त्यावरील नाल्यावर घडली. यापैकी एक जण बचावला तर दुसरा बेपत्ता झाला आहे. गोबरवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अंधारामुळं शोधकार्य थांबवण्यात येत आहे. आज पहाटेपासून शोधकार्य सुरु आहे. 

Satara veer Dam : वीर धरणातील कालवा विद्युत गृहातून पाणी सोडले

Satara veer Dam : वीर धरणातील कालवा विद्युत गृहातून पाणी सोडले. धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून 1700 क्युसेक पाण्याचा विसर्ग.नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

Almatti Dam Update: अलमट्टी धरणातून कमी केलेले दरवाजे आणखी उचलले, सांगली, कोल्हापूरला दिलासा

अलमट्टी धरणातून कमी केलेले दरवाजे आणखी उचलले, काल रात्रीपर्यंत पाणी 1 लाख 17 क्युसेक हजारपर्यंत सोडले जात होते. आता पुन्हा  1 लाख 25 हजार क्युक्सेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, सांगली कोल्हापूरला दिलासा, अलमट्टी धरणात सध्या 1 लाख 21 क्युसेकने पाण्याची आवक सुरू, तर धरणात 87 टीएमसी पाणीसाठा

भिवंडी : मुंबई नाशिक माहामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली 

भिवंडी : मुंबई नाशिक माहामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली 


साकेत ब्रिज व खारेगाव ब्रिजवरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी 


सकाळपासून खड्डे बुजवण्याचे  काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी


वाहतूक कोंडीत अनेक ॲम्बुलेन्स अडकल्या

मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया

मुळा धरणाचा उजवा कालवा फुटला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात ही घटना घडली आहे. देवगाव येथे सकाळी हा बंधारा फुटला आहे. कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पिण्यासाठी सोडलेले पाणी वाया गेले आहे. शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. राहुरीत मुळा धरणातून पाणी सोडले होते. कालवा फुटल्याने पाणी बंद करण्यात  आले आहे. 



वांग मराठवाडी धरणात सध्या 32 टक्के पाणीसाठा, धरणातून विसर्गही सुरू

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी विभागातील वांग मराठवाडी धरणात सध्या 32 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणक्षेत्रात पावसाची सततधार सुरु असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी धरणातून विसर्गही सुरू ठेवण्यात आला आहे. जलाशयाच्या काठावरील मेंढ आणि उमरकांचन या गावाभोवती पाण्याचा वेढा हळूहळू वाढत चालला असून जुनी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. अनेक धरणग्रस्त कुटुंबांचे सद्या निवारा शेडमध्ये वास्तव्य आहे.

रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये गेल्या 24 तासात 354 मिमी पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात माथेरान येथे 354 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 354 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून माथेरान येथे जोरदार पावसाची हजेरी आहे. 14 जुलै रोजी 243 मिमी, 13 जुलै रोजी 217 मिमी पावसाची नोंद झाली होती. चार महिन्यांच्या सरासरी 3038 मिमी पैकी गेल्या दीड महिन्यात 2574.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.  एकूण सरासरीच्या सुमारे 84.72 टक्के पावसाची आजमितीस नोंद झाली आहे. माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तिथे 84.72 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

जुनापाणी गावातील तलाव फुटला, 15 शेळ्या गेल्या वाहून, शेतीचंही नुकसान

नागपूर ग्रामीण तहसीलमधील जुनापाणी या गावातील लघु पाटबंधारे विभागाचा तलाव आज सकाळी फुटल्याची घटना घडली. त्यामुळे गावातील 15 शेळ्या वाहून गेल्या आहेत. गावकऱ्यांनी वेळीच गावाजवळच्या उंच भागाकडे धाव घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तलावातून पाण्याचा लोंढा गावाच्या दिशेने तसेच शेतीच्या दिशेने आला. यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. गावा लगतच्या शेतीचे  नुकसान झाले असून, माती आणि चिखल सर्वत्र पसरला आहे.

कुही तालुक्यातील देवळी (खुर्द) येथील मामा तलाव फुटला, शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं नुकसान

Nagpur Rain : मुसळधार पावसामुळं नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील देवळी (खुर्द) येथील मामा तलाव फुटला आहे. नागपूर जिल्हा परिषदच्या आखत्यारीत हा तलाव आहे. तलावाची भिंत फुटल्याने तलावाचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरले. त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तलावाला लागून एक ओढा आहे. त्या ओढ्याच्या महापुरानं तलावाच्या भिंतीला तडे गेल्याने ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दमदार पावसामुळे आठवडाभरातच मुंबईतील तलावांमध्ये तब्बल सहा महिन्यांचा पाणीसाठा जमा

Mumbai Dam Water : आठवडाभरातील दमदार पावसामुळे मुंबईसाठी आठवडाभरातच तब्बल सहा महिन्यांचा पाणीसाठा जमा. गेल्या आठवडाभरातील दमदार पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांतील पाणीसाठ्यात तब्बल ५०% ची वाढ. सातच दिवसांत मुंबईकरांकरता  ६ महिन्यांचा पाणीसाठा जमा. मुंबईच्या तलावांतील पाणीसाठा ७५% वर. ७ लाख ७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा वाढला. आठवडाभरापूर्वी ३ लाख ७५ हजार दशलक्ष लिटर  इतकाच पाणीसाठा होता. एकूण पाणीसाठा १० लाख ७८२ हजार दशलक्ष लिटर वर गेलाय. मुंबईतील सातही तलावांमधील पाणीसाठा क्षमता १४ लाख ४७ हजार इतकी आहे. सात तलावांपैकी तानसा, मोडक सागर ही पाणी पुरवठा करणारी मुख्य धरणे भरुन वाहू लागलेत

 त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गडावर 17 जुलैपर्यंत पर्यटकांना प्रवेश बंदी

Nashik Rain : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गडावर 17जुलैपर्यंत पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पावसाचा आनंद लुटण्यासाठी खास करुन विकेंडला गडावर महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने पर्यटक हजेरी लावत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून गड परिसरात जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नाशिक वनविभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशिर कारवाई  केली जाणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात येतय.

किनवट तालुक्यातील थोरा तलावाने ओलांडली धोक्याची पातळी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अप्पारापेठ येथील थोरा तलाव हा निजामकालीन आहे. या तलावाला अतिवृष्टीमुळे मोठे भगदाड पडले आहे. यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याची माहिती संबंधित तलावाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी या अगोदर काही दिवसापूर्वी दिली होती. पण संबंधित अधिकाऱ्यांनी या बाबीला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आज घडीला होणाऱ्या जोरदार पावसामुळे या तलावाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. या तलावाला भगदाड पडले असून त्या भगदाडातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. ज्यामुळे हा तलाव फुटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळं 10 हजार नागरिकांचे स्थलांतर

गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे एकूण 10 हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात पूर परिस्थिती जैसे थे आहे. वैनगंगा-गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांनी आसपासच्या गावांमध्ये पूरस्थिती आणली आहे. दक्षिण गडचिरोलीला चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा आष्टी पूलही पुराच्या पाण्याखाली गेला आहे. सिरोंचा तालुक्यातून सर्वाधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. आलापल्ली ते भामरागड हा रस्ता पर्लकोटा नदीचा पूर ओसरल्याने  खुला झाला आहे. तर गडचिरोली ते आरमोरी मार्गही पाल नदीचे पाणी असल्याने झाला सुरु झाला आहे. गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीत प्रवाहित झाल्यानंतर काही प्रमुख मार्ग अद्यापही बंद आहे. जिल्हा प्रशासन स्थलांतरित नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याकडे देत आहे.

पावसामुळं ठप्प झालेली नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरु

Nandurbar Rain : गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळं नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील विसरवाडी गावाजवळ सरपाणी नदीवरील पर्यायी रस्ता वाहून गेला होता. त्यामुळं महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर वाहतूक नंदुरबारमार्गे वळवण्यात आली होती. वाहून गेलेल्या पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर नागपूर सुरत महामर्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्याने वाहन धारकांनी समाधान व्यक्त केलं आहे.



निम्न वर्धा प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडले, वर्धा नदी पात्रात विसर्ग सुरु

Wardha Rain : वर्धा जिल्ह्यात जवळजवळ आठवडाभरापासून संततधार पाऊस बरसत आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला असून, धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे 17 दरवाजे आज सकाळी 6 वाजता 9 सेमीने उघडण्यात आले. या प्रकल्पातून 1 हजार 253.16 घन.मी/से.पाणी विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. सदर पाऊस सुरु असल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्राच्या दोनही काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

लोणावळ्यात सलग चौथ्या दिवशी 200 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद

लोणावळ्यात पावसाची कृपादृष्टी सुरुच आहे. सलग चौथ्या दिवशी इथं 200 मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात 227 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चार दिवसांत 890 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. आत्तापर्यंतचा 2 हजार 196 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत अवघा 1 हजार 374 मिलिमीटर इतकाच झाला होता.



चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला, इरई धरणाचे सातही दरवाजे 0.25 मीटर्स ने खुले
Chandrapu rain : चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. मात्र, आभाळ ढगाळ आहे. गेले सात दिवस चंद्रपूरकरांना सूर्यदर्शन झाले नाही. तेलंगणा आणि चंद्रपूरला जोडणारा वर्धा नदीवरील राजुरा-बल्लारपूर पूल मात्र अद्याप पाण्याखाली आहे.  गोंडपिंपरी तालुक्यातील आष्टी येथील पुलावर 2 फूट पाणी असल्याने चंद्रपूर-अहेरी मार्ग बंदच आहे. चंद्रपूर शहरातील रहमतनगर -सहारा पार्क- राजनगर भागातील पूर अंशतः उतरण्यास सुरुवात झाली आहे. इरई धरणाचे सातही दरवाजे 0.25 मीटर्स ने खुले करण्यात आले आहेत. वैनगंगा नदीत गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची आवक सुरु आहे.


कोल्हापुरातील भोगावती नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठची शेती पाण्याखाली

Kolhapur Rain : सततच्या पावसामुळं कोल्हापुरातील भोगावती नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं कसबा बीड ते महे बंधाऱ्यावर पाणी आलं आहे. नदीकाठची शेती देखील पाण्याखाली गेली आहे. 



सिंदखेडराजा येथील प्रसिद्ध चांदणी तलावाची भिंत कोसळली

Buldhana Rain : गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसानं सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक अशा चांदणी तलावाची भिंत कोसळली आहे. सिंदखेडराजा हे ऐतिहासिक शहर असून याठिकाणी पुरातन अशा अनेक वास्तू आहेत. काही दिवसांपूर्वी येथील रामेश्वर मंदिराची भिंत मुसळधार पावसाने कोसळली होती आणि आता प्रसिद्द अशा चांदणी तलावाची भिंत कोसळली. यामुळं दिवसेंदिवस एक एक अशा पुरातन वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती येथील नागरिक करत असल्यानं पुरातत्व विभागाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.



मुंबईतील काही भागात काल रात्री मुसळधार पाऊस, शहरात आज यलो अलर्ट, दुपारी हाय टाईडचा इशारा

Mumbai Rains : मुंबईतील परळ, कुर्ला, दादर, वांद्रे, अंधेरी या परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. शहरात आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून ऑरेंज अलर्ट होता. मुंबईतील वर्सोवा बीचवर जोरदार वाऱ्यासह हलका पाऊस देखील बरसत आहे. आज दुपारी 1:22 वाजता हायटाईडची शक्यता आहे. समुद्रात 4.87 मीटर उंच लाटांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 13 जुलैपासून मुंबईत 4.5 मीटरपेक्षा उंच लाटा उसळत होत्या.

बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर खामगाव, मेहकर, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. 

वाशिम जिल्ह्यात चांगला पाऊस

वाशिम जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, काल दुपारपासून पावसानं काही ठिखाणी उघडीप दिली आहे. तर जिल्ह्यात कुठे कुठे पाऊस होत आहे. आज ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Rain Updates LIVE : सद्या राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. एनेक ठिकाणी शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. 


दरम्यान, मागील काही दिवस राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. आज रायगड पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


बुलढाण्यातील कोराडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला


बुलढाणा जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने मेहकर तालुक्यातील कोराडी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरला. कोराडी प्रकल्प तुडूंब भरल्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.  कोराडी प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यावरून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सुरक्षिततेच्या दृष्ठीने धोक्याचा इशारा दिला आहे.गेल्या वर्षी याच प्रकल्पाच्या सांडव्यावर पिकनिक साठी आलेले चार तरुण अचानक पाणी वाढल्याने अडकले होते ज्यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने आता खबरदारी घेतली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.