Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पावसाची जोरदार हजेरी
Maharashtra Monsoon Rain LIVE : राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. मात्र, काही ठिकाणी पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
LIVE
Background
Maharashtra Monsoon Rain LIVE : मुंबईसह उपनगर ठाणे आणि पालघर परिसरात रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात कालपासूनच मान्सून सक्रिय झाला असून, जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. आज पावसाचा जोर कायम असून जिल्ह्याच्या विविध भागात तुरळक पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्याच्या इतर भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र आहे.
एकीकडे हवामान खात्याकडून भाकितांचा पाऊस पडतोय, तर दुसरीकडे राज्यभरात पावसाअभावी पेरणी रखडली आहे. मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आलाय, तरी राज्यभरात केवळ 1 टक्का इतकीच पेरणी झाली आहे. राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी 17 जूनपर्यंत केवळ एक लाख 47 हजार हेक्टरवर (एक टक्का) पेरणी झाली आहे. गतवर्षी 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे. राज्यात खरीप हंगामातील तृण धान्याखालील क्षेत्र 36 लाख 37 हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र 41 लाख 58 हजार हेक्टर तर कापसाचं क्षेत्र जवळपास 42 लाख हेक्टरपर्यंत आहे.
जून महिना अर्धा सरला तरी पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नसल्यानं शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. राज्यातील मुंबईसह, ठाणे आणि उत्तर कोकणात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण कोकणात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि किनारपट्टीच्या आसपासच्या भागातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे..
पुढच्या तीन दिवसात उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा
जूनच्या अखेरीस हरियाणा, पूर्व राजस्थान, पंजाबचा काही भाग आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ राज्यांमध्येही मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. पुढच्या तीन दिवसात उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता
आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सध्या पुण्यात ढगाळ वातावरण आहे.
सिंधुदुर्गमध्ये पावसाची दमदार हजेरी..
हवामान खात्याने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज सिंधुदुर्गमध्ये दमदार हजेरी लावली. तालुक्यातील कोळकेवाडीतही पावसानं वादळी वाऱ्यासह दमदार हजेरी लावल्याने बळीराजा चांगलाच खुश झाला आहे. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांनी शेतात भाताच्या बियाणांची पेरणी केली होती. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळं आता या शेतात भाताची रोपे वर येऊ लागली आहेत. सकाळपासूनच दमदार सुरुवात केलेल्या पाऊस पाउणतास पडतच राहिल्याने पावसामुळे शेतात पाणी साचले.
आसाममध्ये 42 लाख नागरिकांना पुराचा फटका
Assam Floods : आसाममध्ये मुसळधार पावसामुळं गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पूर आल्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. आसाममध्ये या पुराचा जवळपास 42 लाख नागरिकांना फटका बसला आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. 32 जिल्हे या पुराच्या पाण्यामुळं प्रभावीत झाले आहेत. पुरामुळं शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यानं, नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणं देखील कठीण झाल आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून सातत्याने मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतीकामांना वेग
गेल्या दोन दिवसभारपासून यवतमाळ जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. अखेर त्यांच आज पावसात रुपांतर झालं आहे. पहाटे पाच वाजल्यापासूनच विजेच्या कडकडाटासह यवतमाळ राळेगाव, कळंब तालुक्यात पावसानं हजेरी लावली. तर, मारेगाव, बाभूळगाव, दारव्हा या तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळं काहीकाळ नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली. तर या परिसरातील शेतकरी, सोयाबीनची पेरणी आणि कपाशीच्या टोबणीच्या कामाला लागला आहे.