सुप्रीम कोर्टाच्या दट्ट्यानंतर तारखा, तरीही नार्वेकरांकडून वेळकाढूपणा; आमदार अपात्रतेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक
आमदार अपात्र होतील यामुळे वेळकाढूपणा केला जातोय. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे टाईमटेबल दिलं जाईल त्यावेळी आम्ही आमची बाजू मांडू, असे अनिल पराब म्हणाले.

मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या ( Mla Disqualification) सुनावणीचं वेळापत्रक ठरलं आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आमदार अपात्रतेप्रकरणी नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे.
अनिल परब म्हणाले,अध्यक्षांचे वेळापत्रक ही धूळफेक आहे. सुप्रिम कोर्टाच्य दट्ट्यानंतर आता तारखा पडत आहेत. आम्ही एक प्रतिज्ञापत्र दिलं आहे पुरावे पाहण्याची गरज नाही. वेगवेगळी सुनावणी घेण्याची गरज नाही. 23 नोव्हेंबरपर्यंतच्या तारखा कळवल्या आहे. त्यानंतर उलट तपासणी सुरु होणार आहे परंतु उलट तपासणी किती वेळ चालणार काही माहिती नाही. एक महिन्याच्या कालावधीत हे प्रकरण संपवायला हवे. आतपर्यंत निकाल लागला पाहिजे होता. आमदार अपात्र होतील यामुळे वेळकाढूपणा केला जातोय. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे टाईमटेबल दिलं जाईल त्यावेळी आम्ही आमची बाजू मांडू.
अध्यक्षांनी पक्षपात न करता निर्णय द्यावा
विधानसभा अध्यक्ष हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे विधासभा अध्यक्षांमोर सर्वांचा गुन्हा सारखाच आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री आमदार प्रतोद यांच्या चुका सारख्याच आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी पक्षपात न करता निर्णय द्यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे.
पुढील सुनावणी ठाकरे गट वेळापत्रकावर आक्षेप घेणार
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्हीही गटाच्या आमदारांना पाठवलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतल्यास अंतिम सुनावणीसाठी एवढा वेळ का? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. त्यामुळे पुढील सुनावणीमध्ये ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गट आक्षेप घेणार आहेत.
आमदार अपात्रतेचं संपूर्ण वेळापत्रक
13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार तर 23 नोव्हेंबरनंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणर आहे. 25 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी करण्यात आली. तर या सर्वांना स्वतंत्र पुरावा द्यायचा असल्याने त्याची वेगवेगळी सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली होती. या सर्व गोष्टींचा विचार करून विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सर्व आमदारांना हे वेळापत्रक आज सकाळी पाठवण्यात आले आहे.
हे ही वाचा :
























