महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवेचा निकाल जाहीर, 283 जणांना ऑनलाईन नियुक्तीचे आदेश
Medical and Health Service Officer Exam : आयबीपीएस संस्थेमार्फत 05 सप्टेंबर 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेण्यात आली असून सदर परिक्षेसाठी 18,775 उमेदवार उपस्थित होते.
मुंबई : महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ संवर्गातील 283 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी बीएएमएस शैक्षणिक पात्रता प्राप्त उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले होते. याबाबत 31 जानेवारी 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आज सदर परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून 283 उमेदवारांना ऑनलाईन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आहे.
या भरतीसाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीचे अनुषंगाने बीएएमएस च्या 283 पदांसाठी एकूण 22,981 अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे प्राप्त झाले. पदभरतीला उमेदवारांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिल्यामुळे उमेदवारांची निवड करण्यासाठी आयबीपीएस संस्थेमार्फत 05 सप्टेंबर 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने परिक्षा घेण्यात आली असून सदर परिक्षेसाठी 18,775 उमेदवार उपस्थित होते. सदर ऑनलाईन परिक्षेचा 05 ऑक्टोंबर 2024 रोजी निकाल जाहीर केला असून निवड केलेल्या 283 उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा . डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने ही पदभरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली.
सदर जाहिरातीनुसार महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ पदावर निवडीसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. सदरचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 01 फेब्रुवारी 2024 ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत देण्यात आलेली होती. या पदभरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नियुक्ती पत्र मिळाल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.