(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील : संजय राऊत
Sanjay Raut on BJP : संजय राऊत म्हणाले, पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे.
Sanjay Raut On BJP : आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे. कोणत्याही अपक्षाचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
राज्यसभा निकालांबाबत संजय राऊत म्हणाले...
राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल आला. फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीचे 10 अपक्ष फोडण्यात फडणवीसांना यश आलं. यावर संजय राऊतांना पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊतांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या जोरावर ही विनडणुक जिंकल्याचं सांगितलं आहे. तसेच आमच्या हातात जर ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, आम्हाला काय म्हणायचं आहे हे अपक्षांना माहिती आहे. कोणत्याही अपक्षाचा अवमान करण्याचा प्रश्न नाही, त्यामुळे आमच्या हातात केवळ ED द्या, मग बघा असं राऊत म्हणाले.
त्या बैठकीला शिवसेनेकडून प्रतिनिधी हजर राहणार - राऊत
राष्ट्रपतीपदाची निवडणूक जवळ आल्याचे तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) म्हटले असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. फुटीरतावादी शक्तींविरुद्ध मजबूत आणि प्रभावी विरोध करण्यासाठी त्यांनी 15 जून रोजी कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली येथे होणाऱ्या संयुक्त बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी मुख्यमंत्री आणि नेत्यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि इतर म्हणूनही काम केले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह 22 नेत्यांना पत्र लिहिले. या बैठकीला शिवसेनेकडून प्रतिनिधी बैठकीला हजर राहणार असल्याचं संजय राऊत यावेळी म्हणाले.
मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं
महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती टिकवण्याचं श्रेय नक्कीच गोपीनाथ मुंडे यांना जातं. पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे असं राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
महाविकास आघाडीचे 10 अपक्ष फोडण्यात यश
मध्यरात्रीचा हायव्होल्टेज ड्रामा, आक्षेपांमध्ये अडकलेली मत आणि महाविकास आघाडीची वाढलेली धाकधूक हे सर्व पाहिल्यानंतर अखेर राज्यसभेच्या 6 जागांचा फायनल निकाल आला. महाविकास आघाडीच्या 3 तर भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचा दणदणीत विजय झाला. तर भाजपच्या अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांनीही विजयाचा गुलाल उधळला. राज्यसभेची सहावी जागा चुरशीची होती. या जागेवर भाजपचे धनजंय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार उमेदवार होते. धनंजय महाडिकांनी हा विजय खेचून आणला. फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीचे 10 अपक्ष फोडण्यात फडणवीसांना यश आलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.