Ratnagiri Refinery Project:  रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. रत्नागिरीत रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंचा  (Nilesh Rane) ताफा अडवला असून महिलांनी ठिय्या देत याविरोधात निषेध व्यक्त केलाय. रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी निलेश राणे बारसू गावात (Barsu Village) पोहचले. तसेच आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं निलेश राणे यावेळी म्हणालेत.


महिलांचा रस्त्यातच ठिय्या, ग्रामस्थ आक्रमक

स्थानिक रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षण रोखल्यानंतर आज पुन्हा सर्वेक्षण होणार होतं. मात्र निलेश राणेंच्या गाडीचा ताफा येताच ग्रामस्थ आक्रमक होताना दिसले. त्यांनी हा ताफा अडवला. यावेळी महिलांनी रस्त्यातच ठिय्या दिला. दरम्यान, आंदोलकांच्या तीव्र विरोधामुळे पोलीस अधिक सतर्क झाले होते. कोणत्याही परिस्थितीत सर्वेक्षण न करू देण्याचा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला. नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या राणेंचं आता समर्थन कशासाठी? असा सवाल इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. तर रिफायनरीचं सर्वेक्षण तातडीनं थांबविण्याची बारसू येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

 

ऑईल रिफायनरी आमच्या गावासाठी चांगली कशी? ग्रामस्थांचा सवाल

 

नाणारमध्ये होणारी ऑईल रिफायनरी ही विनाशकारक आहे, मग आमच्या गावासाठी चांगली कशी आहे, असा सवाल निलेश राणेंना ग्रामस्थांनी केला. दरम्यान गावकरी काहीही ऐकायला तयार नव्हते. जवळपास अर्धातास गावकऱ्यांनी निलेश राणेंचा ताफा अडवला होता.

 

चर्चेतून मार्ग निघू शकतो - निलेश राणे

निलेश राणेंच्या गाडीचा ताफा अडवताच तसेच ग्रामस्थांचा रोष पाहताच निलेश राणे गाडीतून खाली उतरले, आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही चर्चेसाठी तयार असून या चर्चेतून मार्ग निघू शकतो असे म्हणाले आहेत. 

 

सरकारला स्थानिक जनता महत्वाची की रिफायनरी? ग्रामस्थांचा सवाल

 

नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द केल्यानंतर राजापूर तालुक्यातील बारसू आणि इतर गावांमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या रिफायनरीसाठी जमिनीचे, मातीचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी, रिफायनरीविरोधक आंदोलकांनी ड्रोन सर्व्हे, माती परीक्षणाला विरोध केला होता. यावेळी पोलिसांसोबत मोठी बाचाबाचीदेखील झाली. स्थानिकांचा विरोध पाहता सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले नाही. त्यानंतर आज पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रत्नागिरीहून जास्तीची कुमक मागितली होती. तर, रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलक मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. रिफायनरिला स्थानीक जनतेचा प्रखर विरोध असताना कोणत्या आधारावर ही रिफायनरी आणली जातेय? सरकारला स्थानिक जनता महत्वाची की रिफायनरी, असा प्रश्नदेखील स्थानिकांनी उपस्थित केला आहे. 

 


सध्या रिफायनरीचं भवितव्य काय? 


'एबीपी माझा'ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सौदी अरेबियाची आरमको कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यात बोलणी सुरु आहे. प्रकल्पाला विलंब होत आहे. त्यामुळे कंपनी नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे. पण, आता रिफायनरी उभी राहिल्यास ती 20 मिलियन मेट्रिक टन प्रति वर्षी इतक्या क्षमतेचा असणार आहे. सध्या बारसू-सोलगावमधील रिफायनरीला विरोध असून त्याविरोधात स्थानिकांनी मोठं आंदोलन देखील उभारलं आहे. माती परीक्षण आणि ड्रोन सर्व्हे देखील स्थानिकांनी रोखला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे. बारसू-सोलगावमध्ये रिफायनरी झाल्यास आम्ही त्याला विरोध करु, असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. त्याचवेळी रिफायनरी व्हावी यासाठी देखील आता समर्थक पुढे येत आहेत. अर्थात सध्या सत्ताबदल झाला आहे. त्यामुळे नवीन सरकारच्या हाती कोकणातील रिफायनरीचं भवितव्य असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


विनायक मेटे यांच्या पत्नीला आमदार करा, संभाजीराजेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी


Cyber Fraud : IPS अधिकाऱ्याच्या नावाने पोलिसांनाच गंडा, बनावट व्हॉट्सअॅप प्रोफाईल तयार करुन कनिष्ठ कर्मचाऱ्यांची फसवणूक