Beed News : शिवसंग्राम संघटनेला (Shiv Sangram) राजकीय ताकद देण्यासाठी विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नीला आमदार करा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी आज (21 ऑगस्ट) विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी संभाजीराजेंनी विनायक मेटे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या कामाच्या आठवणीला उजाळा दिला. मी सदैव मेटे कुटुंबियांच्या सोबत असून विनायक मेटे यांचा अपूर्ण राहिलेला मराठा आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाणार असल्याचंही त्यांनी कुटुंबीयांसोबत चर्चा करताना सांगितलं.
...अन् बहिणीने टाहो फोडला
मेटे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती मेटे यांच्या घरामध्ये दाखल होताच त्यांच्या बहिणीने टाहो फोडला. "माझ्या भावाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य खर्ची घातलं. त्याचा लढा आता तुम्ही पुढे चालू ठेवा, अशी भावनिक साद यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपतींना घातली.
'विनायक मेटेंच्या पत्नीला आमदार करा'
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, "विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेला राजकीय ताकद देण्यासाठी त्यांच्या पत्नीला तात्काळ आमदार करण्यात यावं. मेंटेनी मराठा समाजासाठी, मराठा आरक्षणासाठी आणि शिवस्मारकासाठी हयातभर काम केलं आणि त्यांचे हेच काम आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत."
'तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना योजना दिल्या पाहिजे'
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन संभाजीराजे यांना विचारला असता ते म्हणाले की, "तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना ज्या काही योजना मिळत आहेत तशाच योजना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिल्या पाहिजेत. अनेकदा आर्थिक विवंचनेतून नापिकी आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी आत्महत्या करतात तर त्यांना तेलंगणाच्या धर्तीवर ज्या योजना ते सरकार पुरवते त्याच योजना महाराष्ट्र सरकारने जर दिल्या तर महाराष्ट्रातल्या शेतकरी सुजलाम सुफलाम होतील."
डॉ. ज्योती मेटेंना राज्यपाल नियुक्त आमदार करावं, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची मागणी
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर शिवसंग्राम पक्षाची जबाबदारी डॉ. ज्योती मेटे यांच्याकडे देण्यासंदर्भाचा ठराव शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची परळीमध्ये भेट घेतली आणि राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीमध्ये डॉ. ज्योती मेटे यांचा समावेश करावा अशी मागणी केली होती.
विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू आणि मुख्यमंत्र्यांकडून सीआयडी चौकशीचे आदेश
विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात मेंदूला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 15 ऑगस्ट रोजी बीडमधील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल, असं जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले.
संबंधित बातम्या