Ganeshotsav 2022: कोरोना महासाथीचे सावट दूर झाल्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होणार आहे. मुंबई व परिसरातील अनेक कोकणवासिय गणेशोत्सवात गावी जाणार आहेत. कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळानेदेखील तयारी केली आहे. एसटीकडून गणेशोत्सवानिमित्त 2310 जादा बसेस (MSRTC Extra Buses) सोडण्यात येणार आहेत.
यंदा बाप्पाचे आगमन 31 ऑगस्ट रोजी होणार असून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. एसटी महामंडळाकडून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत जादा बसेस चालवण्यात येणार आहे. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून 1268 बसेस असणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी 872 बसेस असणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून 667, पालघर विभागातून 313 आणि ठाणे विभागातून 288 बसेस असणार आहेत.
अतिवृष्टी, दरड कोसळणे अशा घटना घडल्यास अथवा रेल्वे प्रवासात अडचणी निर्माण झाल्यास कोकणातील प्रमूख स्थानकात 100 अतिरिक्त गाड्यांचं नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. त्याशिवाय, अतिवृष्टीमुळे कोकणातील खराब झालेले रस्ते आणि त्यामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मुंबई-गोवा महामार्गावरील आगार आणि दुरुस्ती पथकामध्ये नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान 10 अतिरिक्त टायर ठेवण्याची सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याशिवाव, घाटात सुरक्षितपणे वाहतूक चालवावी अशी सूचनाही देण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर पाच सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान कोकणातून मुंबईसाठीच्या अधिक बसेस असणार आहेत.
>> जादा बसेस असणारे बसस्थानके आणि वाहतूकीचे ठिकाणे
> मुंबई सेंट्रल आगार : मुंबई सेंट्रल साईबाबा, काळाचौकी, गिरगांव, कफ परेड, केनेडी ब्रीज, काळबादेवी, महालक्ष्मी
> परळ आगार : सेनापती बापट मार्ग दादर, मांगल्य हॉल जोगेश्वरी
> कुर्ला नेहरूनगर आगार : कुर्ला नेहरूनगर बर्वे नगर/सर्वोदय हॉ.(घाटकोपर), टागोरनगर विक्रोली, घाटला (चेंबूर), डि.एन नगर अंधेरी, गुंदवली अंधेरी, सांताक्रुझ (आनंदनगर), विलेपार्ले, खेरनगर वांद्रे, शीव (सायन)
> पनवेल आगार : पनवेल आगार
> उरण आगार : उरण आगार
> ठाणे 1 आगार: भाईंदर, लोकमान्य नगर, श्री नगर, विटावा, नॅन्सी कॉलनी (बोरिवली), मालाड, डहाणूकरवाडी/चारकोप (कांदिवली), महंत चौक (जोगेश्वरी), संकल्प सिद्धी गणेश मंदीर (गोरेगाव)
> ठाणे 2 आगार: भांडूप (पश्चिम) व (पूर्व), मुलुंड (पूर्व)
> विठ्ठलवाडी आगार: विठ्ठलवाडी बदलापूर, अंबरनाथ
> कल्याण आगार: कल्याण डोंबिवली (पश्चिम) व (पूर्व)
> नालासोपारा आगार: नालासोपारा
> वसई आगार: वसई आगार
> अर्नाळा आगार: अर्नाळा आगार