Mumbai Cyber Fraud : अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या आयपीएस (IPS) अधिकाऱ्याचं नाव आणि फोटोंचा आधार घेत व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) वापर करुन अनेक पोलिसांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराचा शोध महाराष्ट्र सायबर पोलीस (Maharashtra Cyber Police) घेत आहेत
मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांचा फोटो आणि नाव वापरुन कोणीतरी व्हॉट्सअॅप चालवत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या व्यक्तीने अनेक पोलिसांना मेसेज करुन अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करुन पाठवण्यास सांगितले. ही बाब दाते यांना समजताच त्यांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि महाराष्ट्र सायबर सेलला तपास करण्यास सांगितलं.
महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, "आम्हाला तक्रार मिळाली असून आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. हा आरोपी पोलीस, रेल्वे किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागात काम करणाऱ्या कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांची फसवणूक करतो."
"हा सायबर गुन्हेगार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा फोटो, बनावट मोबाईल नंबर वापरुन व्हॉट्सअॅप चालवत आहेत आणि ते त्या नंबरचा वापर करुन त्या विभागातील सर्वात कनिष्ठ लोकांना अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी आणि त्यांना त्वरित पाठवण्यासाठी मेसेज पाठवत आहेत," असं संजय शिंत्रे यांनी पुढे सांगितलं.
शिंत्रे म्हणाले की, "एखाद्या कर्मचाऱ्याने एकदं गिफ्ट कार्ड खरेदी केलं आणि ते त्या नंबरवर पाठवलं की त्याचा वापर फ्रॉड शॉपिंगसाठी करतात किंवा त्याचं रोख रकमेत रुपांतर करतात. महाराष्ट्रात अशी 144 प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये अनेक आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोटो वापरुन बनावट व्हॉट्सअॅप प्रोफाइल तयार करुन आपल्या कनिष्ठांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे."
गुन्हेगार कसे यशस्वी होतात?
बर्याच वेळा सरकारी खात्यांमध्ये विशेषत: पोलीस विभागात काम करणारे कनिष्ठ दर्जाचे कर्मचारी प्रोटोकॉलमुळे त्यांच्या वरिष्ठांशीथेट बोलू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुन्हेगाराने त्यांना त्यांच्या वरिष्ठांच्या नावाने मेसेज केला तर त्यांना आनंद होतो. वरिष्ठांनी त्यांच्याकडून काहीतरी मागितलं आहे याने हरखून जातात. वरिष्ठांच्या नजरेत चांगले स्थान निर्माण होईल, असा विचार ते करतात. परंतु ते गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात हे त्यांना कळत नाही, असं पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी नमूद केलं.
कशी फसवणूक करतात?
शिंत्रे यांनी सांगितलं की, आपण मीटिंगमध्ये आहे आणि खूप व्यस्त असल्यामुळे ते अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी जाऊ शकत नाही, असा मेसेज गुन्हेगार कनिष्ठांना करतात. हे ठक त्यांच्या मेसेजमध्ये लिहितात की आपल्याला हे गिफ्टकार्ड लवकरात लवकर हवं आहे आणि 5 ते 10 हजार रुपयांचे गिफ्ट कार्ड विकत घेण्यास सांगून ते तातडीने पाठवून देण्यासाठी सांगतात, जेणेकरुन कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्याला ही गोष्ट कोणाकडून तरी तपासावी लागण्यासाठी वेळ मिळू नये आणि तोपर्यंत त्याची फसवणूक होईल.
बचाव करण्यासाठी काय करु शकता?
जर पोलीस कर्मचाऱ्यांना असे मेसेज आल्यास त्यांनी तातडीने याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी, जेणेकरुन त्यांच्याकडे करण्यात आलेली मागणी ही खरंच त्या व्यक्तीने केलीय की फसवणूक आहे, याबाबत काही मिळू शकेल," असं शिंत्रे यांनी सांगितलं. तसंच "आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आवाहन करतो की त्यांनी आपल्या कार्यालयाला सूचना करुन सांगावं की, "आपण असा कोणताही मेसेज पाठवत नाही तसंच कोणाला असा मेसेज आला तर त्याकडे दुर्लक्ष करा."
बीड पोलीस अधीक्षकांचा फोटो व्हॉट्सअॅपला ठेवत पोलिसांकडूनच पैशांची मागणी
काही दिवसांपूर्वी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांचच फेसबुक अकाऊंट हॅक करुन त्याद्वारे पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. बीडचे पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झालं एवढंच नाही तर व्हॉट्सअॅपला त्यांचा फोटो डीपी ठेवून एका सायबर गुन्हेगाराने चक्क पोलिसांकडेच पैशाची मागणी केली. नंदकुमार ठाकूर यांचं स्वतःचं फेसबुकवर अकाउंट आहे आणि त्याची प्रोफाइल त्यांनी लॉक केलेली आहे. मात्र त्यांच्या नावाचे दुसरे एक अकाऊंट तयार करुन त्यांच्या फोटोचा आणि अकाऊंटचा वापर करुन पोलिसांकडेच पैशाची मागणी केली. ही गोष्ट नंदकुमार ठाकूर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सायबर विभागात याप्रकरणी तक्रार दाखल केली.