Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाटीसह पाऊस सुरु
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
राज्यात आज मुंबईसह अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाटीसह पाऊस पडत आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याचं चित्र आहे.
भारतीय जनता पक्ष उद्या राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे. राज्यात अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी आवाज उठवणार आहे. भाजप नेते डॉ अनिल बोंडे यांनी ही माहिती दिलीय. नांदेड मध्ये होणाऱ्या आंदोलनामध्ये डॉ अनिल बोंडे सहभागी होणार आहेत.
धुळे आगारातून आज सकाळी सोडण्यात आलेल्या 4 बसेस अज्ञातांनी फोडल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या चौदा दिवसांपासून धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना न जाणून घेतात प्रशासनातर्फे बसेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, धुळे एसटी आगारातून आज तब्बल 14 दिवसांनंतर लालपरी मार्गस्थ करण्यात आली. परंतु, या बसेस आपल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना अज्ञातांनी या बसेसवर दगडफेक केली. यात एक एसटी चालक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
एस टी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना कामावर बोलावून आज जळगावातून एस टी महामंडळाने सेवा सुरु करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज १५ दिवसांनंतर जळगावहून धुळ्याला निघालेली पहिली बस ( क्रमांक - एम एच २० - बी एल - ३९३६ ) जळगांव आगारातून बाहेर पडली. पोलीस बंदोबस्तात 5 प्रवाशी घेऊन बस बाहेर निघाली आहे. या वेळी एस टी कर्मचार्यांनी जोरदार निदर्शने केली आहेत. एस टी मंडळाचं शासनात विलीनी करण करण्या चे मागणी वरून एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासकीय पातळीवर एस टी कर्मचार्यां शी चर्चा करून ही तोडगा निघत नसल्याने प्रतीक्षा यादीतील नवीन कर्मचार्याची भरती करून पोलीस बंदोबस्तात बस सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या निर्णया नुसार आज जलगाव आगार मधून पंधरा दिवसांच्या प्रतिक्षे नंतर आज पहिली बस पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आली या वेळी एस टी कर्मचाऱ्या नी जोरदार निदर्शने केली. एस टी बस सोडण्या पूर्वी पोलिसांनी आंदोलन कर्त्या एस टी कर्मचाऱ्या सोबत तासभर चर्चा केली. पोलिसांच्या या प्रयत्नाला एस टी कर्मचार्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही बस आगारातील निघणाऱ्या कोणत्याही बस ला अडथळा आणणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांचं कामही सोपे झाल्याच दिसून आले.कोणत्याही अडथळ्यां शिवाय बस रवाना झाल्याने प्रवाशांनी आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आलेले भाजप नेते किरीट सोमैयांची वाट अडविण्याचा शिवसैनिकांकडून प्रयत्न. शहरातील भाजप कार्यालयात पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पत्रकार परिषद घेऊन परतत होते. तेंव्हा अचानक शिवसैनिक तिथं पोहचले, काळे झेंडे दाखवत या शिवसैनिकांना गेट समोर ठिय्या मांडण्याचा प्रयत्न केला. सोमय्या विरोधात शिवसेना या आधी ही आक्रमक झाल्याचं आपण पाहिलंय, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. शेवटी पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला केलं आणि सोमैयांना वाट मोकळी करून दिली.
मुंबई - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले आहे. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे, तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
रत्नागिरी जिल्हा बँकेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अंतिम निकालामध्ये निवडणूक झालेल्या सात पैकी पाच जागांवर सहकार पॅनलनं विजय मिळवला आहे. तर दोन जागांवर परिवर्तन पॅनलचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. दरम्यान, यापूर्वी 14 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यामुळे आता 21 पैकी 19 जागांवर सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आल्यानं जिल्हा बँकेवर सहकार पॅनलची निर्विवाद सत्ता आली आहे.
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन स्थगित होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने धुळे आगारातून पोलीस संरक्षणात बसेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभाग नियंत्रक मनीषा सपकाळे यांच्या आदेशानुसार धुळे आगारातून नरडाणा आणि धनुर येथे जाण्यासाठी बसेस काढण्यात आल्या. बसेस बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच आवर घातल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी भरती झालेले मात्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या चालक आणि वाचकांच्या मदतीने बस काढण्यात आली...यावेळी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्याने गांधीगिरी करत चालकाचा सत्कार केला
राज्यभरातून एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानात येत आहेत. उद्या आम्ही या सरकारचा तेरावा घालणार आहोत आणि परवा एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरासमोर जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत. आम्ही सर्व कर्मचारी आझाद मैदानात तर कुटुंबीय अनिल परब यांच्या घरासमोर बसतील. परिवहन मंत्र्यांच्या मनात खोटं आहे. त्यांचे मन साफ नाही. त्यांच्या मनात कामगारांबद्दल आस्था नाही. सत्ता आज आहे उद्या नाही. शिवसेनेची लोक लाठ्या काठ्या घेऊन हा संप मोडायला निघाली आहेत. एस टी कामगार मराठी नाहीत का ?मागणी मान्य नाही झाल्यास सर्व एस टी कामगार वांद्रे इथल्या परिवहन मंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन सहकुटुंब बसणार आंदोलन करणार, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार असतानाही पराभवाच्या भीतीने भाजपा ने पळ काढला असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे एकवीस पैकी एकवीस जागा आमच्या येणार असून महविकासा आघाडीचा च अध्यक्ष होणार असल्याचं मत एकनाथ खडसे यांनी मतदान प्रसंगी मुक्ताई नगर येथे व्यक्त केले आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज निवडणूक होत आहे राष्ट्र वादी चे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्व खाली महविकास आघाडी कडून सहकार पॅनल उभे करण्यात आले आहे या पॅनल मधील अकरा जागा या अगोदरच बिन विरोध झाल्या आहेत उर्वरित दहा जागा साठी आज मतदान होत आहे या दहा जागा ही आम्हालाच मिळतील असा दावा करीत सर्व चे सर्व एकवीस जागा वर सहकार पॅनल ला यश मिळेल असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. मुक्ताई नगर येथे मतदान केल्या नंतर एकनाथ खडसे यांनी भाजपा वर टीका करताना म्हटल आहे की या निवडणुकीत भाजप कडे दिग्गज उमेदवार होते मात्र त्यांना आपला पराभव डोल्या समोर दिसू लागल्याने त्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेऊन पळ काढला आहे. उर्वरित दहा जागा ही महाविकास आघाडीला मिळणार असून आमचाच अध्यक्ष होईल असा विश्वास ही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ मतदार संघातील 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज सतरा पैकी दहा जागांसाठी मतदान होत आहे. 17 पैकी सात जागांवर बिनविरोध निवड झाली असून आता शिल्लक राहिलेल्या दहा जागांसाठी वीस उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीदरम्यान 983 मतदार आपला हक्क बजावणार आहेत तर या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच माजी आमदार शरद पाटील यांच्यासह नंदुरबार चे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्षपदी असलेले माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेल्या पूर्वी प्रवेश केला, तसेच या निवडणुकीमध्ये मोठा चेहरा मानले जाणारे माजी मंत्री अमरीश भाई पटेल यांचादेखील भाजपमध्ये प्रवेश झालेला असल्यामुळे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तसेच माजी मंत्री अमरीश भाई पटेल या दोघा दिग्गज नेत्यांमुळे या निवडणुकीत भाजपच वर्चस्व राहण्याची दाट शक्यता आहे,
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मतदानाला सुरुवात. 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे 10 जणांसाठी आज मतदान. जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1964 मतदार मतदानाचा हकक बजावणार. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,आ.शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या होणाऱ्या मतदानामध्ये थोडा तणाव पाहायला मिळत असून जावली तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुडाळ येथे वाद झाल्यामुळं या ठिकाणी तणाव निर्माण झालाय पोलिसांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणाव कायम आहे. पोलीसांचा फौजफाटा घटणास्थळी दाखल झाला आहे.
नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १२ ठिकाणी पोलिसांनी गांज्याची शेती नष्ट करत १० हजार किलो गांजा जप्त करत दोन कोटीचा मुदेमाल जप्त केला असून २८ जणांना अटक केली आहे .मात्र दुर्गम भागात शेती का केली जात आहे या मागिल करणे काय कारण आदिवासी भागात इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त होणे हि काळजीची बाब आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणाच्या मुळाशी जावे अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे . गेल्या वर्ष भरापासून नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी अमली पदार्थांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरु केली आहे पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी या प्रकरणाचे खोलवर जाऊन चौकशीचे आदेश सर्व प्रकरणात दिले आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन ने ह्या कारवाया केल्या आहेत यात ११ महिन्यात १२ ठिकाणी होणारी गांजा शेती नष्ट केली त्यातून जप्त करण्यात आलेल्या १० हजार ३९८ किलो गांजा जप्त केला असून २८ आरोपींना अटक करण्यात आली आहे जिल्हा पोलीस दल अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम सुरु करण्यात आली असून अश्या अजून कारवाया करण्यात येतील अशी माहिती पोलीस अधीक्षक पी .आर पाटील यांनी दिली आहे .
उरण तालुक्यातील गव्हाण फाटानजीक कंटेनर ट्रेलर पुलावरून कोसळला. जेएनपीटी- पनवेल रेल्वे मार्गावर कंटेनर ट्रेलर कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. जेएनपीटी आणि पनवेलकडे जाणारी रेल्वे मालवाहतूक सेवा विस्कळीत. सुमारे ९ तास मालवाहतूक सेवा विस्कळीत. कंटेनर ट्रेलर रेल्वे रुळावर कोसळल्याने जेएनपीटी बंदरातील मालवाहतूक विस्कळीत.रात्री १० च्या सुमारास कंटेनर ट्रेलरचा अपघात, ट्रेलर चालकाचा मृत्यू. सकाळी ७ च्या सुमारास रेल्वे मालवाहतूक सुरळीत..
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली मधील ओसरगाव येथे गोवा बनावटीची ४८ लाखाची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पहाटे जप्त केली. टेम्पोत ठेवलेल्या मैद्याच्या पिठाच्या पोत्याच्या आड दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी तिघांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए), ( ई ) ८०, ८१, ८३, व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक कणकवली यांनी ही कारवाई केली. मालवाहू टेम्पो आणि विविध ब्रॅन्डच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारू अशी ४८ लाख २३ हजार ८९४ व दारु जप्त करण्यात आली. तर वाहनांची किंमत १६ लाख मिळून एकूण रु ६४ लाख २३हजार ८९४ किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
एमआयएमच्या मुंबईतील 27 नोव्हेंबरच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली
मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमकडून चलो मुंबईची हाक देण्यात आली होती
यासाठी 27 नोव्हेंबरला मुंबईतील एमएमआरडीए मैदानात एमएमआयएमकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते
कोरोना आणि नांदेड-अमरावतीची परिस्थिती पाहता बी. के. सी. पोलिसांनी परवानगी नाकारली
स्वाभिमानीच आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी रविकांत तुपकर ,शर्वरी तुपकर यांच्यावर गुन्हे दाखल.
शुक्रवारी आंदोलन हिंसक झाल्यामुळे बुलढाणा शहर पोलीसात गुन्हे दाखल झाले आहेत.
अनेक ठिकाणी स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोखो , तोडफोड केल्याने गुन्हे दाखल.
पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी उपोषण सोडतेवेळी ग्राहमंत्र्यांशी चर्चा करून गुन्हे मागे घेण्याच दिलं आश्वासन.
राष्ट्रीय पातळीवरच्या स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्रानं सर्वाधिक पुरस्कार जिंकून देशात दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला असून सांगली जिल्ह्यातील विटा, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व सासवड नगरपालिकांनी अनुक्रमे पहिले तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी या नगरपालिकांचं विशेष अभिनंदन केले आहे. नवी मुंबई महापालिकेनं विशेष पुरस्कार जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचंही कौतुक केले आहे. ‘स्वच्छेतेतून आरोग्याकडे, आरोग्यातून विकासाकडे’ सुरु असलेली राज्याची वाटचाली अशीच सुरु राहिल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
पार्श्वभूमी
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटकाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन यासोबतच विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर उपस्थिती लावणार आहे. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे.
तोडगा नाही, एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांची बैठक संपली
मागील एक तासापासून सुरू असलेली बैठक संपली. बैठकीत तूर्तास तरी काहीच तोडगा नाही. कर्मचारी मात्र संपावर ठाम आहे. अनिल परब यांच्याकडून सरकार विलीनीकरणाबाबत पॉझिटिव्ह असल्याबाबतचे संकेत दिले आहे. लवकरच पुन्हा एकदा बैठकीचं आयोजन करण्यात येणार आहे
आझाद मैदानावरील संपकरी आक्रमक, अनिल परबांच्या घरावर मोर्चा काढण्यावर ठाम
आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांकडून संप सुरु असून मोर्चेकरी आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावह मोर्चा धडकणार आहेत. त्यामुळे अनिल परबांच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक
एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल ऑफिस येथे परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक होणार आहे. बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर उपस्थित राहणार आहे. कर्मचारी संघटना अजूनही एसटी महामंडळाच्या विलीनीकरणावर ठाम आहे. बैठकीसाठी सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर यांना निमंत्रण नाही. एसटी महामंडळाकडून सुरुवातीला संपाची नोटीस देणाऱ्या एसटी कर्मचारी संघटनेला चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे,
तारक मेहता का उल्टा चष्माच्या 'या' कलाकाराच्या मुलानं दिली मुंबई उडवण्याची धमकी
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील एका कलाकाराच्या मुलाकडून मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अंधेरी पोलिसांना फोन करुन मुंबई उडवण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्याला अंधेरी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vikram Gokhale Controversy : अभिनेते विक्रम गोखले 'त्या' विधानावर ठाम
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. त्यानंतर विक्रम गोखले यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले. परंतु स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्यावर अभिनेते विक्रम गोखले ठाम आहेत. खरं स्वातंत्र्य 2014 पासूनच मिळालं यावर ठाम असून ते बदलणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -