Maharashtra Breaking News LIVE Updates : कोरोनाचा धोका कमी मात्र शून्य नाही,त्यामुळे काळजी घेण्याची गरज - छगन भुजबळ

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

abp majha web team Last Updated: 22 Jan 2022 06:25 PM
नागपूरात 4 हजार 33 नवे कोरोनाबाधित

नागपूरात 4 हजार 33 नवे कोरोनाबाधित मागील 24 तासांत आढळले आहेत. यामध्ये शहरी भागात 2 हजार 991 तर ग्रामीणमध्ये 909 आणि जिल्ह्याबाहेरील 133 रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय 8 मृत्यू झाले असून 2 हजार 43 कोरोनामुक्त झाले आहेत. 

 मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा चौदा तासांचा मेगाब्लॉक

 मध्य रेल्वेवर या शनिवारी आणि रविवारी पुन्हा एकदा चौदा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक ठाणे आणि दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गिकेवर असणार आहे. डाऊन फास्ट मार्गिकेवर मेगा ब्लॉकची सुरुवात शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजून वीस मिनिटांनी होईल, तर रविवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटंपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. तर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या अप फास्ट मार्गीकेवर दुपारी बारा वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 वाजून 30 मिनिटांनी संपेल. या मेगा ब्लॉकच्या दरम्यान अप आणि डाऊन दिशेला धीम्यामार्गी केवर लोकल धावतील. शनिवारी या ब्लॉगच्या आधी दादर येथून सुटणाऱ्या जलद लोकल आणि एक्सप्रेस अकरा वाजून 40 मिनिटांपासून ते रात्री दोन वाजेपर्यंत माटुंगा आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान डाऊन स्लो लाईन वरून धावतील. तर ब्लॉक सुरू झाल्यानंतर दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सीएसएमटी इथून सुटणाऱ्या एक्सप्रेस, तसेच फास्ट लोकल या मुलुंड आणि कल्याणच्या दरम्यान डाऊन स्लो लाईनवर डायव्हर्ट करण्यात येतील. असे असले तरी मेगा ब्लॉकच्या दरम्यान ठाणे स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर एक्सप्रेस आणि मेल गाड्या थांबणार नाहीत असे मध्य रेल्वेने सांगितले आहे

अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 611 कोरोना बाधित रुग्ण आढळले

अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 611 कोरोना बाधित रुग्ण आढळले


1 जानेवारी पासून रुग्णांमध्ये होतेय वाढ
  
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार अमरावती जिल्ह्यात  
611 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे..


एकूण रूग्णांची संख्या 100 हजार 480 झाली..

कोरोनाचा धोका कमी मात्र शून्य नाही,त्यामुळे काळजी घेण्याची गरज - छगन भुजबळ

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना परिस्थितीबाबत बोलताना नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दर आढवड्याला रुग्णसंख्या दुप्पट होतेय
ही चिंताजनक स्थिती, मात्र रुग्णालयात उपचार घेणाऱ्याची संख्या कमी आहे. प्रशासन चाचण्या वाढविणार असून कोरोनाचा धोका कमी असला तरी शून्य नाही,त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. असं भुजबळ म्हणाले.

यवतमाळमध्ये 27 जानेवारीपासून शाळेची घंटा वाजणार

यवतमाळ जिल्ह्यातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. 9 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग होणार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा

अहमदनगर-अहमदनगरला शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाल्यानंतर , या पदाचा उपयोग आपण फक्त शिर्डी संस्थानसाठीच्या विकासासाठीच करणार असल्याची प्रतिक्रिया काळे यांनी दिली. साईभक्तांसाठी जास्तीत जास्त सुविधा तसेच इथल्या कर्मचाऱ्यांसाठी या राज्यमंत्री पदाचा कसा उपयोग करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच बाबांचं काम करत असतांना या पदाच्या इतर कोणत्याही सुविधा घेणार नसल्याचं काळे यांनी स्पष्ट केलं आहे. काही कर्मचारी मदतीला लागतील तेवढेच कर्मचारी आम्ही घेऊ बाकी सर्व बाबांच्या चरणी अर्पण करून असं त्यांनी म्हटलंय. 

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका महिलेवर आठ जणांकडून बलात्कार

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील एका महिलेवर आठ जणांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय.  मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. 32 वर्षीय ही महिला विधवा असून स्वभावाने भोळसर आहे. शिरुर तालुक्यातील एका गावात ती राहते.  तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन  आठ आरोपींनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला.  त्यातुन ती काही दिवसांपूर्वी गर्भवती राहिली.  ही गोष्ट गावातील लोकांच्या लक्षात आल्यावर त्याची माहिती पोलीसांना देण्यात आली.  पोलीसांच्या निर्भया पथकाने या महिलेला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता आठ आरोपींनी कधी तिच्या घरी तर कधी तिच्या शेतात तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याच उघड झालं. त्यानंतर शिरुर पोलीसांनी  माऊली पवार,  रज्जाक पठाण,  काळू वाळूंज,  विठ्ठल काळे,  राजेश गायकवाड,  आकाश गायकवाड,  संदीप वाळूंज आणि नवनाथ वाळूंज यांना अटक केलीय.

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन

संगीत रंगभूमीवरील जेष्ठ गायिका, अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन झालंय.  त्या सत्तर वर्षांच्या होत्या.  गेल्या काही दिवसांपासून तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.  मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  2018 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष राहिल्या होत्या.

30-30 योजनेतून कोट्यवधी रुपयांची लोकांकडून गुंतवणूक करत फसवणूक करणारा संतोष उर्फ सचिन राठोडला पोलिसांनी घेतलं ताब्यात

30-30 योजनेतून कोट्यवधी रुपयांची लोकांकडून गुंतवणूक करत फसवणूक करणारा संतोष उर्फ सचिन राठोडला पोलिसांनी घेतलं ताब्यात रात्री उशिरा कन्नड येथून घेतलं ताब्यात. काल बिडकीन पोलिस ठाण्यास साडे अठरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोषवर केला आहे गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. एबीपी माझावर दिली होती 30 -30 योजनेत लोकांकडून गुंतवणूक केल्याची संतोषची कबुली.

पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर उत्पल पर्रीकर यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. याबाबतचे पत्र त्यांनी गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना दिले आहे.


 

 
सांगली जिल्ह्यातील एसटीच्या पाच आगारातील 94 कर्मचारी बडतर्फ, एस टी महामंडळाच्या सांगली विभाग नियंत्रकांची कारवाई

सांगली जिल्ह्यातील एसटीच्या पाच आगारातील 94 कर्मचारी बडतर्फ


एस टी महामंडळाच्या सांगली विभाग नियंत्रकाची कारवाई


एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाले पाहिजे या मागणीसाठी  आंदोलनामध्ये सहभागी झाल्याने कारवाई


विटा, पलूस, शिराळा, मिरज आणि आटपाडी या 5  आगारातील कर्मचाऱ्यावर कारवाई


जिल्ह्यातील दहा आगारातील 823 निलंबित कर्मचाऱ्यांपैकी पाच आगारातील या 94 कर्मचाऱ्यांवर कारवाई

मुंबईतील ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग






 #BREAKING : मुंबईतील ताडदेव भाटिया रुग्णालयाच्या बाजूच्या इमारतीमध्ये आग; अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी; लेव्हल 3 ची आग असल्याची माहिती






पार्श्वभूमी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Election 2022 : प्रचार रॅली, सार्वजनिक सभांचं काय? निवडणूक आयोगाकडून आज आदेश जारी होण्याची शक्यता


Election 2022 Guidelines : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज निवडणूक प्रचारांच्या रॅली आणि सार्वजनिक सभांवर बंदी घालण्याबाबत आदेश जारी केले जाऊ शकतात. गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने रॅली आणि सार्वजनिक सभांवरील बंदी 22 जानेवारीपर्यंत वाढवली होती. नुकतीच कोरोना महामारी आणि ओमायक्रॉन संकटामध्ये उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. मात्र वाढत्या कोरोनामुळं आयोगानं आधी 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली होती, नंतर ती 22 जानेवारीपर्यंत कायम ठेवली होती.  



Weather Forecast : मुंबईसह, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाची शक्यता
 
Weather Forecast : मुंबई (Mumbai), पुणे (Pune) सह महाराष्ट्रात काही ठिकाणी 22 आणि 23 जानेवारीला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. शनिवारी आणि रविवारी मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी घट झाली आहे. 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरड्या हवामानाची नोंद करण्यात झाली आहे. तर खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असल्याचं चित्र आहे. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजे 22 आणि 23 जानेवारीला मुंबई, पुण्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.



ग्लोबल टीचरचं लोकल दु:ख! ...तर सरकारी नोकरी सोडणार, डिसले गुरुजी उद्विग्न, अश्रू अनावर
 
सोलापूर : एकीकडे अमेरिकेतील फुलब्राईट स्कॉलरशिपची संधी आणि दुसरीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी कायद्याचा बडगा उगारत दिलेला कारवाईचा इशारा. या सगळ्या प्रकारानं ग्लोबल टीचर अवार्ड (Global Teacher Award) विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी (Ranjitsinh Disale) व्यथित झाले आहेत. इतके की ते शिक्षक म्हणून सरकारी नोकरी सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. ग्लोबर टीचर अॅवार्ड मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला.पैशाची मागणी केली. एवढंच नाही तर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी केलेल्या अर्जावरही अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं फुलब्राईट स्कॉलरशिपही हातातून जाण्याची शक्यता आहे असं डिसले गुरुजींनी एबीपी माझाला सांगितलंय. एबीपी माझाशी बोलताना डिसले गुरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. सरकारी नोकरीत होणाऱ्या त्रासामुळं डिसले गुरुजी उद्विग्न झाल्याचं दिसतं आहे. 


काय म्हणाले रणजितसिंह डिसले?
रणजितसिंह डिसले Abp Majha सोबत बोलताना म्हणाले की, पुरस्कार मिळाल्यापासून शिक्षण विभागातल्या काही अधिकाऱ्यांनी त्रास दिला. पुरस्कार मिळाल्यानंतर खूप मानसिक त्रास झाला. जेवणावळी कराव्या अशी मागणी केली गेली.  ते म्हणाले की, 25 जानेवारीला फुलब्राईटसाठी अंतिम कागदपत्रे दाखल करायची आहेत.14  डिसेंबरला रजेचा अर्ज केला होता, त्यावर अद्याप निर्णय नाही.  फुलब्राईट हातातून जाण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.