Maharashtra Breaking News 30 August 2022 : देशासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Aug 2022 10:38 PM
Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यात पावसाची हजेरी

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. विजांसह पाऊस आल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मंडई, लक्ष्मी रोडवर प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना रस्त्यावर उतरावं लागलं. बापाची मूर्ती खरेदीसाठी आलेल्या पुणेकरांचा चांगलाच खोळंबा झाला.

Ganeshotsav 2022 : आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात गणेशोत्सवामुळे मोठा पोलीस बंदोबस्त

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात गणपती सणानिमित्ताने वरळी पोलिसांनी केली मोठा बंदोबस्त.


वरळी पोलिसांकडून सर्वात मोठा विसर्जन पॉईंट असलेल्या वरळी परिसरात लोटस जंक्शनवर पोलिसांनी आज घेतला विसर्जन स्थळाचा आढावा.


वरळी पोलिसांकडून लोटस जंक्शन समुद्रकिनारावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


मुंबईचा सर्वात हॉट परिसर असणाऱ्या वरळी विधानसभेमध्ये 56 मोठ्या गणपती मंडळाच्या अध्यक्षांना पोलिसांनीकडून कारवाईची नोटीस.


जर काही अनुचित प्रकार घडला तर मंडळाचा अध्यक्षांवर थेट कारवाईचे इशारा. 

औरंगाबाद शहरातील पोलीस ठाणे उडण्याची धमकी, संशयित ताब्यात 

औरंगाबाद शहरातील एक पोलीस ठाणे उडणार अशी धमकी देणारा कॉल औरंगाबादच्या पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. धमकीचा कॉल येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत फोन करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. मात्र तोपर्यंत पोलीस दलात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Nashik Rain : नाशिक शहर परिसरात जोरदार पावसाला सुरवात, बाजारात तारांबळ

Nashik Rain : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेश स्थापनेच्या आदल्या दिवशी नाशिक शहर परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात आलेल्या नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. 

Nashik Rain : नाशिक शहर परिसरात जोरदार पावसाला सुरवात, बाजारात तारांबळ

Nashik Rain : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने गणेश स्थापनेच्या आदल्या दिवशी नाशिक शहर परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गणेश उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात आलेल्या नाशिककरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. 

Kolhapur : कोल्हापूर : मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर : मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्हाधिकारी दालनासमोर प्रकार घडल्याने खळबळ 

Kamal Khan : अभिनेता कमाल खान याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Kamal Khan : आक्षेपार्ह ट्विट करणारा अभिनेता कमाल खान याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कमाल खान याला बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले होते.  

Beed: सिरसाळा -परळी रोडवर दोन कारचा भीषण अपघात, पोलिस कर्मचारी कोमल शिंदे यांच्यासह त्यांच्या 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Beed News : परळी रोडवर आज दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दिंद्रूड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी कोमल शिंदे व त्यांचा 9 वर्षाचा मुलाचा मृत्यू झाला आहे. गाडी चालक पोलीस कर्मचारी नवनाथ लटपटे आणि दुसऱ्या कारमध्ये असलेले परळीचे शासकीय डाॅक्टर डाॅ. इलियास अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ सिरसाळा पोलीसांनी व नागरिकांनी अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात पाठवले आहे

Maharashtra News : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार

Maharashtra News : सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. कर्नाटकच्या वकिलांनी वेळ मागितल्याने पुढील सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. न्या. जोसेफ यांच्या तीन सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

यापुढे कुणाचा नेतृत्व स्वीकारायचं हे समाज ठरवेल: मराठा क्रांती मोर्चा

Aurangabad: औरंगाबादमध्ये आज मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी पत्रकार परिषेद घेत यापुढे कुणाचा नेतृत्व स्वीकारायचं हे समाज ठरवेल अशी भूमिका व्यक्त केली. त्यामुळे यापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा समाजासोबत करावे. तसेच लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांनी राज्यातील मराठा समजासोबत चर्चा करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली.

आरे परिसरात आंदोलनाचा प्रयत्न, सहा आंदोलक ताब्यात; मेट्रोला नाही कारशेडला विरोध, आंदोलकांचं मत

Mumbai News : एकीकडे मेट्रो 3 ची चाचणी सुरु असताना आरे परिसरात मेट्रो कारशेडविरोधात आंदोलनाचा प्रयत्न झाला. आरे परिसरात आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांमध्ये दोन तरुणींचाही समावेश आहे. मेट्रोला विरोध नसून कारशेडला विरोध असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.

ट्रेन बंचिंगमुळे कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश गाड्या दीड ते अडीच तास उशिराने

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर बहुतांश गाड्या उशिराने धावत आहेत. ट्रेन बंचिंगमुळे कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या, मत्स्यगंधा यासह बहुतांश गाड्या दीड ते अडीच तास उशिराने धावत आहेत 


 

 
पर्यावरणापेक्षा राजकीय हेतूनं मेट्रोला विरोध : देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह, मेट्रो 3 ची चाचणी शुभारंभ सोहळा

 



मुंबई : मेट्रो 3 ला हिरवा झेंडा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. मेट्रो 3 च्या ट्रायल रनला सुरुवात झाली आहे. 





Mumbai Metro: मुंबई मेट्रो-3 ची आज चाचणी, आरे आंदोलनातील कार्यकर्ते परिसरात दिसल्यास ताब्यात घेण्याच्या पोलिसांना सूचना 

Mumbai Metro-3 : आज मुंबई मेट्रो-3 ची चाचणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आरे कॉलनीतील बिरसा मुंडा चौकात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. आरे आंदोलनातील कार्यकर्ते परिसरात दिसल्यास ताब्यात घेण्याच्या सूचना पोलिस उपायुक्त सोमनाथ घर्गे दिल्या आहेत. आरे आंदोलनाची पार्श्वभूमी बघता पोलिसांकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे.

Pune : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची बदनामी केल्याप्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Pune News: भाजप नेते अतुल भातखळकर यांच्या विरोधात पुणे सायबर पोलिसांनी सोनिया गांधींची बदनामी केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधींना 'ईडी'ने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सुरुवातीला सोनिया गांधींना चौकशीसाठी बोलावले असता त्यांना कोरोना झाल्याचे कॉंग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले. मात्र अतुल भातखळकर यांनी त्यावर ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हा कोरोनाचा 'ईडी' व्हेरिएंट असल्याच म्हटलं होतं. याबाबत पुण्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर ट्रेलरने घेतला पेट, जीवितहानी नाही

Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर ट्रेलरने घेतला पेट, जीवितहानी नाही. हा कंटेनर ट्रेलर नागपूरहून तळोजाला जात होता. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. 

अभिनेता कमाल आर. खानला मुंबईतून अटक

अभिनेता कमाल आर. खानला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. 2020 मधील वादग्रस्त ट्विटप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.





बेळगाव सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, तब्बल पाच वर्षांनी होणाऱ्या सुनावणीकडे सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष
Belgaum News : बेळगाव सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात आज (30 ऑगस्ट) सुनावणी होणार असून तब्बल पाच वर्षांनी होणाऱ्या सुनावणीकडे समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागलं आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. 2004 साली हा दावा दाखल करण्यात आला आहे. विविध कारणांमुळे ही सुनावणी झाली नाही. मध्यंतरी ऑनलाईन सुनावणी होणार होती पण ती देखील झाली नाही. आता दीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या बाजूने ज्येष्ठ विधीज्ञ राजेश द्विवेदी आणि शिवाजीराव जाधव बाजू मांडणार आहेत.
Shivsena: संदेश देशमुख आणि विनायक भिसे आता हिंगोली शिवसेनेचे नावे जिल्हाप्रमुख, बांगर यांची कोंडी होणार?

Shivsena: हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांची कोंडी करण्यासाठी संदेश देशमुख आणि विनायक भिसे ह्या दोघांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तर बाळासाहेब मगर यांना संघटक पदी नियुक्ती देण्यात आली आहे सहसंपर्क प्रमुख  अजय पाटील संघटक पदी-रवी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दी पत्रकान्वये ही माहिती देण्यात आली आहे  या नियुक्त्या मुळे बांगर गटाला चांगलाच धक्का बसला आहे

Anil Parab Dapoli Resort : रिसार्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची माहिती

Dapoli Resort : दापोलीमधील वादग्रस्त साई रिसार्ट जमीनदोस्त होणार आहे. या रिसार्टसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची बैठक झाली आहे. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली. या रिसार्टप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya)  शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर आरोप केले होते.

Mumbai Metro : आज मेट्रो 3 ची चाचणी, तर आरे कारशेड संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची (Metro 3) आज चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 ची चाचणी होणार आहे. एकीकडे आरे कारशेडला (Aarey Metro Car Shed) पर्यावरणवाद्यांचा विरोध असताना दुसरीकडे आज मेट्रो 3 ची ट्रायल होणार आहे. आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. आरेतील मेट्रोतील कारशेड प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.



राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसंबंधी अनिश्चितता कायम 


राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. या प्रश्नी आज सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजाच्या विषयांमध्ये याचा समावेश नाही. त्यामुळे आज या प्रश्नी सुनावणी होणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. गुरूवारपर्यंत तातडीच्या सुनावणीसाठी कोणतंही प्रकरण थेट खंडपीठाकडे सादर करू नका असा आदेश नवनिर्वाचित सरन्यायाधीश उदय लळित यांनी दिला आहे. तातडीच्या प्रकरणांची माहिती रजिस्ट्रारकडे द्यावी, ते देतील त्या तारखेला सुनावणी होईल असे निर्देशही सरन्यायाधीश उदय लळीत यांनी दिले आहेत. त्यामुळे हा विषय ऐनवेळी न्यायालयाच्या कामकाजाच्या पटलावर येण्याची शक्यता कमी असल्याचं चित्र आहे. 


मेट्रो 3 ची आज चाचणी


कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावरच्या मेट्रो 3 ची आज चाचणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मेट्रो 3 ची चाचणी होणार आहे. आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. एकीकडे आरे कारशेडला पर्यावरणवाद्यांचा विरोध होत असताना दुसरीकडे मात्र ट्रायल सुरु करण्यात आली आहे. या मेट्रोसाठी दोन रेक मुंबईत दाखल झाले आहेत. सकाळी 11 वाजता ही आरेच्या सारीपूतनगर येथील ट्रॅकवरती ही चाचणी होणार आहे. सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरु करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.


सर्वोच्च न्यायालयात आज मेट्रो कारशेडची संदर्भात महत्वाची सुनावणी


सर्वोच्च न्यायालयात आज मेट्रो कारशेडची संदर्भात महत्वाची सुनावणी होणार असून राज्य सरकारला आज कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. 24 ऑगस्टच्या सुनावणीत राज्य सरकारनं आणखी कागदपत्रं जमा करण्यासाठी वेळ मागितला होता. तेव्हा न्यायालयाने अशात आणखी किती दिवस आम्ही सुनावणी पुढे ढकलायची?, असा प्रश्न उपस्थित केला होता. आज पूर्वीच्या सातही याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय राज्य सरकारनं सुरु केलेल्या ट्रायल रनला हिरवा कंदील कायम ठेवतं की लालफितीत अडकवतं हे बघणं महत्त्वाचे असेल. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.