Maharashtra Breaking News 29 march 2022 Highlights : खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 18 एप्रिल रोजी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Mar 2022 12:35 PM
दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा आढावा जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

दिवसभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा आढावा जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा


https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-30-march-2022-today-sunday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1045760

गावदेवी पोलीस ठाण्यासमोर भाजपचं ठिय्या आंदोलन

गावदेवी पोलीस ठाण्यासमोर भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांचासह स्थानिकांनी ठिय्या आंदोलन केलं. हे आंदोलन एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित कार चालकावर कारवाई न केल्याने करण्यात आले.     

पार्थ पवार यांच्या नावाचा वापर करून पोलिसांवर टाकण्यात आला दबाव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाचा वापर करून हिंजवडीच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यात आलाय. गुन्ह्यात खोटी साक्ष आणि चुकीच्या पद्धतीने तपास करावा यासाठी दबाव टाकल्याचे पोलीस अधिकारी नकुल न्यामने यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अश्रफ मर्चंट नावाच्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार सोमवारी घडलाय. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? पार्थ पवारांच्या नावाचा त्याने का वापर केला? हे अटकेनंतर स्पष्ट होणार आहे.

Amravati : खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 18 एप्रिलला

Amravati : खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 18 एप्रिलला होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता संदर्भातील अंतिम सुनावणी होती. 

राऊतांवर बोलण्यात काही पॉइंट नाही: चंद्रकांत पाटील

कधी-कधी मौन हे प्रकृतीसाठी चांगलं असतं आणि मौनातून मनःशांती मिळते, असं ट्विट शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. यावरच बोलताना भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ''सध्या सामना वाचायचं नाही आणि संजय राऊत यांच्यावर बोलायचं नाही असे मी ठरवलंय. एकवेळ सामना वाचण्याचा विचार पुन्हा करू, पण सामनामध्ये सगळे एकांगीच लिहिणाऱ्या राऊतांवर बोलण्यात काही पॉइंट नाही.

Uddhav Thackeray : अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार एकरकमी लाभ, एलआयसीला शंभर कोटी रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मान्यता

अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्ती, राजीनामा, सेवेतून काढून टाकणं, मृत्यूनंतर एकरकमी लाभ देण्यासाठी एलआयसीला शंभर कोटी रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray ) यांनी मान्यता दिली आहे. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाने प्रस्ताव सादर केला होता. या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो अंगणवाडी सेविकांना होणार आहे. 

Pune News Update : पुण्यातील देहू येथील संत तुकोबांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण

Pune News Update : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हावं, यासाठी पुण्यातील देहू देवस्थानच्या विश्वस्तांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी सुद्धा शिळा मंदिराचं लोकार्पण माझ्या हस्ते झालं तर ते माझं भाग्य असेल, असं म्हणत होकार दिल्याची माहिती विश्वस्थांनी दिली आहे. देहू देवस्थानच्या अध्यक्षांसह सात विश्वस्थ पंतप्रधांना निमंत्रण देण्यासाठी दिल्लीला गेले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देहू शिष्टमंडळाची आज सकाळी साडे अकरा वाजता भेट झाली. यावेळी मोदींना तुकोबांची पगडी, गाथा, मूर्ती, विना, चिपळी, तुळशीचे हार आणि शाल देत लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं. देवस्थानकडून दिलेला सन्मान आणि निमंत्रण मोदींनी स्वीकारलं आहे.

गुढीपाडवा आणि रामनवमी मिरवणुकांना परवानगी द्या: आशिष शेलार

''आमचा सरकारला थेट सवाल आहे. हिंदू सण म्हटलं की तुमच्या हाताला लकवा का मारतो आणि राम भक्तांचा कार्यक्रम म्हटल्यावर शिवसेनेची बोटचेपी भूमिका का होते'', असा प्रश्न भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी सरकारला केला आहे.  

मुंबई बँक फसवणूक प्रकरणी भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अटकेची आम आदमी पार्टीची मागणी

विरोधी पक्षनेता या पदावरून  दरेकर यांनी राजीनामा द्यावा, तसेच या संबंधी एसआयटीने चौकशी करावी अशी मागणी  आपने केली आहे. 

Pune Blast News : पुणे- गंधर्व लॉन्सजवळ गॅस सिलेंडरचे स्फोट


Pune Blast News :  पुणे - गंधर्व लॉन्सजवळ गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कात्रज, गंधर्व लॉन्स जवळ एका शेडमधे असलेल्या असून किमान 20 सिलेंडरचा स्फोट झाला होता. अग्निशमन दलाची सहा वाहने व जवानांकडून आग आटोक्यात आली असून एक इसम किरकोळ जखमी आहे

Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे एकाच वेळी दोन ठिकाणी छापे, चार कोटी 74 लाखांचे ड्रग्ज जप्त 

Mumbai Police :  मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील माता रमाबाई आंबेडकर मैदानात आणि बांद्रा पूर्वेतील खैर नगर परिसरात छापा टाकला आहे.  या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन किलो 160 ग्रॅम एम. डी (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा बाजार भाव चार कोटी 74 लाख रूपये आहे.  शामसुल्लाह खान, आयुब इझहार आणि अहमद शेख अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.  

राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाचा मृत्यू नाही

आज 107 रुग्ण बरे होऊन घरी परतेल आहे. तर राज्यात आजपर्यंत एकूण 77,24,982 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतेल आहे. तसेच राज्यात आज एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87% एवढा आहे. 

अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण

पुण्यातील धानोरी भागात कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची घटना आज घडली. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर स्थानिकांनी हल्ला करत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या सर्व प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल होण्याचे काम चालू आहे. पालिकेच्या अतिक्रमण व बांधकाम विभागाकडून धानोरीत दुपारी दीडच्या सुमारास संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू करण्यात आली. यामध्ये पदपथावरील, पथारी व्यावसायिक विक्रेत्यांची अतिक्रमणे ताब्यात घेण्यापासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर इमारतींना लागून केलेल्या पत्राशेड व इतर तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणांवरही जेसीबी यंत्राच्या साह्याने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. याचवेळी काही जणांनी जेसीबीवर दगडफेक केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पालिका अधिकारी जागेवरून दूर निघून गेले. तर जेसीबी चालकही जेसीबी सोडून निघून गेला. पालिकेच्या कारवाईत झालेली नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय जेसीबी यंत्राचा ताबा सोडणार नसल्याचा पवित्रा स्थानिक नागरिकांनी घेतला. दरम्यान, या घटनेबाबत पालिकेच्या वतीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांनी अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई होईल असं सांगितलं होतं. या प्रमाणे शहरात अनेक ठिकाणी कारवाई सुरु देखील आहे.

Pravin Parekar : बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांना दोन आठवड्यांचा दिलासा

Pravin Parekar : बोगस मजूर प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोर्टाने  दोन आठवड्यांचा दिलासा दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला दिलासा दोन आठवड्यांसाठी कायम आहे.  

ठाण्यात निघणार गुढी पाडवा शोभा यात्रा

 गेल्या दोन वर्ष्याचा कोरोनाच्या काळानंतर  यंदाच्या वर्षी ठाण्यात देखील कोपिनेश्वर ट्रस्टच्या वतीने ठाणे शहरातून शोभा यात्रा काढण्यात येणार आहे .. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर येथून २ एप्रिल रोजी सकाळी  ७ वाजता कोपिनेश्वर महाराजांची पालखी काढण्यात येणार आहे ..तर सहा शोभायात्रा शहरातून देखील निघणार आहेत ..  त्यापूर्वी ३१ मार्च रोजी सूर विठ्ठल या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर १  एप्रिल रोजी सात रत्न या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच मासुंदा तलाव परिसरात हजारो दिव्यांचा दीपोत्सव करण्यात  येणार आहे. यंदाचे स्वागत यात्रेचे २१ वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी यात्रेचे स्वागताध्यक्ष जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर हे आहेत. यंदाच्या वर्षी न्यासाच्या वतीने आयोजित शोभायात्रेत ४० हुन अधिक चित्ररथ दाखल होणार आहेत, अशी माहिती शोभायात्रा आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी कोपिनेश्वर महाराजांची पालखी मान्यवरांच्या समवेत बाहेर आल्यानंतर बाजारपेठ मार्गे चिंतामणी चौक या ठिकाणी शोभायात्रेतील चित्ररथ सहभागी होणार आहेत. त्या नंतर शोभायात्रा आणि चित्ररथ चरई , हारनिवास सर्कल , राम मारुती रोड मार्गे गडकरी रंगायतन येथे सांगता होणार आहे ..

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकावरील असुविधेसाठी माजी नगरसेवकाचं सिडकोविरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

नवी मुंबईतील अद्यावत रेल्वे स्थानकाकडे सिडकोकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या विरोधात माजी नगरसेवकाने एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन केले आहे. रेल्वे स्थानकांवर तिकीटघरांची कमतरता, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची समस्या, रिक्षा स्टँडची दूरवस्था आदी समस्या कायम आहेत. याचबरोबर सुरक्षेसाठी पोलीस बिट चौकी उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सिडकोकडे पाठपुरावा करुनही यावर कारवाई केलेली नाही. मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात सिडको टाळाटाळ करत असून ही सर्व कामे त्वरित सुरु करावीत यासाठी माजी नगरसेवक दशरथ भगत यांच्यामार्फत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.

तळकोकणात हत्तीच्या कळपाची दहशत, बागायतीचे नुकसान

सिंधुदुर्ग : दोडामार्गातील तिलारी खोऱ्यात हत्तीच्या कळपाचे पुन्हा दर्शन झाले आहे. रात्री पाच हत्तींचा कळप दोडामार्गमधील हेवाळे गावात फिरताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हेवाळे गावातील राणेवाडी नारळ पोफळीच्या बागांचे नुकसान केले आहे. हा हत्तीच्या कळपात एक नर, एक मादी आणि तीन पिल्लं असा कळप आहे. मात्र तिलारी खोऱ्यात हत्ती परतल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

प्रवासी आणि बस चालक वादामुळे राष्ट्रीय महामार्गावर एक तास वाहतूक ठप्प
बेळगाव : पुणे-बंगलोर महामार्गावर कोंडसकोप येथे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकाने प्रवाशांबरोबर वाद झाल्यामुळे भर रस्त्यात बस थांबवल्याने एक तासाहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. प्रवासी आणि बस चालक यांच्यात काही कारणामुळे शाब्दिक चकमक झाली. यावेळी प्रवासी आणि बस चालक यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर बस चालकाने राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्ये बस थांबवली. बस चालकाबरोबर प्रवासी वाद घालत आहेत हे पाहून कर्नाटक परिवहन मंडळाच्या तेथून जाणाऱ्या अन्य बस चालकांनी देखील आपल्या बस रस्त्यात थांबवल्या. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर एका बाजूची वाहतूक एक तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती. अखेर ही माहिती कळताच पोलीस तिथे दाखल झाले आणि त्यांनी वाद मिटवून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. एक तास वाहतूक ठप्प झाल्यामुळे दोन किलोमीटरहून अधिक लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

 

 
सांगली महापालिकेच्या 50 शाळातील 5500 विद्यार्थ्यांना ऐतिहासिक 'पावनखिंड' चित्रपटाची भेट
सांगली, मिरज कुपवाड महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या  शौर्याचा इतिहास अनुभवता यावा हा उद्देश डोळयासमोर ठेऊन 50 शाळातील 5500 विद्यार्थ्यांना'पावनखिंड' चित्रपट दाखवण्यात आला. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेनुसार 29 मार्च 2022 पासून मनपाच्या 50 शाळेतील 5500 विद्यार्थ्यांना  पावनखिंड चित्रपट दाखवण्यात येत आहे.   आज पहिल्याच दिवशी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवगेळ्या चित्रपटगृहात 'पावनखिंड' पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आवाहनानंतर अनेक संस्था संघटना व्यक्ती आणि दानशूर पुढे आले आहेत.  तर 2000 विद्यार्थ्यांच्या खर्चाची जबाबदारी ही महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उचलली आहे. आज 29 मार्च रोजी महापालिकेच्या सात शाळातील 1548 विद्यार्थी औरम, न्यू प्राईड मल्टिफ्लेक्स, देवल चित्रपटगृह आणि मुक्ता सिनेमा याठिकाणी पावनखिंड चित्रपटाचा लाभ घेत इतिहास जवळून अनुभवला. तर उर्वरित शाळातील विद्यार्थीही 30 आणि 31 मार्च रोजी  चित्रपट पाहणार आहेत. मनपा शाळातील विद्यार्थ्यांना पावनखिंड चित्रपट पाहता यावा यासाठी आयुक्त नितीन कापडणीस यांनी दानशूर व्यक्तींना आवाहन केले होते . याला प्रतिसाद देत 29 मार्च रोजी सांगलीत चित्रपट पाहणाऱ्या विद्यार्थ्याच्या खर्चाची जबाबदारी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी उचलली आहे. आज मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी न्यु प्राईड मल्टिफ्लेक्स येथे विद्यार्थ्यांसमवेत पावनखिंड चित्रपट पाहिला. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, आणि मनपा अधिकारी , शिक्षक उपस्थित होते.

 
हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
मुंबई : उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. सरासरी कमाल तापमानापेक्षा 4.6 ते 6.4 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीतही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. विदर्भातही आज अकोला, बुलढाणा आणि नागपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागातील वैज्ञानिकांचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन, बढती मिळत नसल्याने काळ्या फिती बांधून काम

मुंबई : केंद्र सरकारविरोधात भारतीय हवामान विभागातील वैज्ञानिकांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील सहाय्यक वैज्ञानिक आणि प्रशासकीय कर्मचारी एकवटले आहेत. मागील 25 वर्षांपासून कामात बढतीच मिळत नसल्याने काळ्या फिती बांधून सर्व कर्मचारी काम करत असल्याचं दिसतं. ग्रुप ए मधील कर्मचाऱ्यांनाच फक्त बढत्या मिळत असल्याने हा इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना व्यक्त केली. मागील 10 मार्चपासून पुकारलेलं हे आंदोलन जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, 11 एप्रिलनंतर आंदोलन तीव्र करत आक्रमक पवित्रा घेण्याचं देखील कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जात आहे.

मुंबईकरांना नववर्षाची भेट, गुढीपाडव्याला 'मुंबई मेट्रो 7, 2A'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मराठी नवीन वर्षाच्यानिमित्ताने मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे. अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई 'मेट्रो 7' च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत. 

भाजपची काळी जादू चालणार नाही : नाना पटोले

सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. भाजपची काळी जादू चालणार नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी टोलाही लगावला आहे. तसेच, राज्यातील आघाडीची सत्ता 5 वर्ष टिकेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. 

PMPML च्या वाहकाकडून अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

पुणे : एमपीएमएलच्या स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा वाहकाने विनयभंग केला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत किसन गोडगे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वाहकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तक्रारदार तरुणी स्वारगेट ते विश्रांतवाडी या मार्गावर बसने प्रवास करत होती. यावेळी आरोपी वाहक तिच्या बाजूला थांबून मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडला. परंतु तक्रारदार काहीच न बोलता बाजूलाच उभ्या राहिली. दरम्यान काही वेळानंतर बसमध्ये आलेल्या तिकीट चेकरकडे या तरुणीने वाहकाच्या वर्तनाविषयी तक्रार केली. दरम्यान तिकीट चेकर निघून गेल्यानंतर तरुणीचा राग मनात धरुन आरोपीने तिच्या कमरेला हात लावला. आरोपीने हा प्रकार तीन वेळा केला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनीही या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला तातडीने अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सीएसएमटीच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिराने

Mumbai Local:  मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सीएसएमटीच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे उशिराने, ठाणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती 

नागासोबत जीवघेणे व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट, तरुणाच्या मुसक्या सांगली वन विभागाने आवळल्या

सांगली : नागासोबत जीवघेणे व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या सांगली वन विभागाने आवळल्या. वाळवा तालुक्यातील मौजे बावचीमधील प्रदीप अशोक अडसुळे (वय 22 वर्षे) या तरुणाचे नागासोबत जीवघेणे धाडस अन् प्रताप सोशल मीडियावर अनेकांनी पाहिले असतील. नागाला पकडून त्याच्यासोबत अनेक व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर तो व्हायरल करत होता. या प्रकरणी वन विभागाने वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत प्रदीप अशोक अडसुळेवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपासासाठी तरुणाला वन विभागाने ताब्यात घेतलं आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी राजापुरात रिफायनरीविरोधात बॅनर

राजापूर, रत्नागिरी : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी राजापुरात रिफायनरी विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात हे बॅनर लावले आहेत. राजापुरात प्रदूषणकारी रिफायनरी आणू नका, अशी विनंती बॅनरद्वारे आदित्य ठाकरे यांना करण्यात आली आहे. आज आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. रिफायनरीला विरोध आणि समर्थन देखील पुढे येत असताना शिवसेनेची भूमिका महत्त्वाची आहे.

Petrol Diesel Price : देशातील महानगरांतील दर जाणून घ्या




























शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर)डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई114.9899.19
दिल्ली100.2191.47  
चेन्नई104.9095.00
कोलकाता 108.5393.57
Petrol Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच, आज किती रुपयांची वाढ?

Petrol Diesel Price Today 29 March : भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. मंगळवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) कडाडलं आहे. आज पेट्रोलच्या दरांत 84 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपयांवर पोहोचलं आहे. 


गेल्या 7 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणं सुरूच ठेवलं आहे. अशाप्रकारे सात दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 4.55 रुपयांनी महागलं आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


Petrol Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले, एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?


Petrol Diesel Price Today 29 March : भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. मंगळवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) कडाडलं आहे. आज पेट्रोलच्या दरांत 50 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 55 पैशांची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपयांवर पोहोचलं आहे. 


गेल्या 7 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणं सुरूच ठेवलं आहे. अशाप्रकारे सात दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 4.55 रुपयांनी महागलं आहे.


Russia Ukraine Conflict : नाटोच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचं मोठं पाऊल, नौदलाची सहा विमानं केली तैनात


Russia Ukraine Conflict : नाटोच्या (NATO) सुरक्षेसाठी अमेरिकेने मोठं पाऊल उचललं आहे. अमेरिकेने नौदलातील सहा विमाने नाटोसाठी तैना त करण्यातचि निर्णय घेतला आहे. यूएस संरक्षण विभाग पेंटागॉनने सांगितले आहे की, नाटो (NATO) म्हणजेच पूर्व युरोपमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची सुरक्षा मजबूत करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धात तज्ज्ञ असलेली सहा नौदल विमाने तैनात करत आहेत. याशिवाय अमेरिका पूर्व युरोपमध्ये सुमारे 240 नौदल सैनिकांनाही तैनात करणार आहे.


पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, वॉशिंग्टन राज्यातील नौदल तळ असलेल्या व्हिडबे बेटावर आधारित EA-18G 'ग्रॉलर' विमान सोमवारी जर्मनीतील स्पॅंगडाहलम विमानतळावर पोहोचेल. हे विमान येथे तैनात असेल. पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने रशिया-युक्रेन युद्धात वापरली जाणार नाहीत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.