Maharashtra Breaking News 24 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
येत्या तीन दिवसात राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
पुढचे तीन दिवस राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील काही भागात गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भात कालही काही जिल्ह्यांत पूरस्थिती होती.
WHO कडून मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित
कोव्हिड पॅन्डॅमिकनंतर मंकीपॉबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगातील 75 देशांत मंकीपॉक्सचे 16 हजार रुग्ण आढळले आहेत. भारतातही तीन रुग्ण आढळलेत. ही जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 2007 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून सातवी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे.
आज भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार
देशभरातील भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री/ उपमुख्यमंत्र्यांची बैठक आज पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. देवेंद्र फडणवीस या बैठकीत सामील होण्यासाठी आज दिल्लीला जाणार आहेत. बैठक भाजप मुख्यालयात दुपारी दोन वाजल्यापासून होणार आहे. मोदी 5 वाजता बैठकीत सामील होतील.
आज राष्ट्रपती कोविंद यांचं राष्ट्राला संबोधन
मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल आज संपणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये केंद्रीय मंत्रीमंडळासाठी विशेष भोजनाचं आयोजन करण्यात आलंय. तसेच, राष्ट्रपती भवनाची सफर घडवणाऱ्या 3 पुस्तकांचं प्रकाशनही होणार आहे.
आरे वाचवा मोहिमेसाठी देशभर आंदोलनं
आरेतच मेट्रो कारशेड होणार असं राज्य सरकारकडून स्पष्ट केल्यानंतर आणि कामावरील स्थगिती उठवल्यानंतर पर्यावरणवादी आक्रमक झाले आहेत. आरे वाचवा मोहिमेसाठी आज संपूर्ण देशात आंदोलनं पार पडतील. मुंबई, नागपूर, वाराणसी, हैदराबादसारख्या प्रमुख शहरात आंदोलनं होणार आहेत. अशात मुंबईतील आरे परिसरातही आंदोलन होईल. यावेळी पर्यावरणवादी आक्रमक पवित्रा घेऊ शकतात.
नीरज चोप्राची आज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील अंतिम लढत
ऑलिंपिक सुवर्णपदक विजोता नीरज चोप्राची आज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरी होणार आहे. अमेरिकेत सुरु असलेली ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार सकाळी 7.05 वाजता सुरु होईल.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरी ODI
भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना (2nd ODI) आज अर्थात रविवारी (24 जुलै) खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असल्याने आता भारताला मालिका जिंकण्यांची संधी असून वेस्ट इंडीजला मालिकेत बरोबरी मिळवण्याची संघी आहे.
मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी मुंबईसह नागपुरात आंदोलन
मुंबईतील आरे जंगल वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी मुंबईसह नागपुरात आंदोलन केले आहे. अजनी वन परिसरात आहे हे आंदोलन करण्यात आले.
एस टी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये
सोलापूर - गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट जवळ आज सकाळी झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.
अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पेट्रोल डिझेल प्रमाणे सीएनजीचा दर सुद्धा कमी करा, रिक्षा-टॅक्सी चालकांची राज्य सरकारकडे मागणी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक जिल्हा प्रशासनाला निर्देश
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह इतर अधिकारी यांनी आज पाहणी केली. या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी मागवून घेतला होता. त्यानुसार लगेचच पाऊले उचलत नवीन पुलाच्या उभारणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सावरपाडा गावातील गावकऱ्यांच्या पूल, रस्ते आदी समस्यांची गंभीरपणे दख़ल घेतली जाईल. पुढील काही दिवसांत गावांत सकारात्मक बदल दिसतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी गावकऱ्यांना दिला आहे.
Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात
Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा विद्यापीठ परिसरात मोफत बससेवा देण्यास सुरुवात,
- कोरोनानंतर विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाचा उपक्रम,
- यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टळणार आहे,
- ही बस विद्यापीठाच्या मुख्यद्वारापासून ते विद्यापीठात असणाऱ्या सर्व मुख्य ठिकाणापर्यंत सेवा देते