Maharashtra Breaking News 20 June 2022 : मध्य रेल्वे विस्कळीत, खर्डी आणि तानशेत दरम्यान मालागडीचे इंजिन फेल

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Jun 2022 09:05 PM
Mumbai Local : मध्य रेल्वे विस्कळीत, खर्डी आणि तानशेत दरम्यान मालागडीचे इंजिन फेल

 Mumbai Local : मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. खर्डी आणि तानशेत दरम्यान मालागडीचे इंजिन फेल झाले आहे.  एक तासापासून कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक लोकल खोळंबल्या असून गोरखपूर एक्सप्रेस देखील आसनगावला थांबली आहे. 

sangli suicide news सांगलीतील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या, एका मृताच्या खिशात सापडली चिट्टी 

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळमध्ये नऊ जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली असून यातील एका मृतदेहाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. या चिट्टीतून नऊ जणांच्या आत्महत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही जणांची नावे देखील या  चिठ्ठीत आहेत. या चिठ्ठीच्या आधारे योग्य तो तपास सुरू आहे.  मृतदेहाचे सर्व  नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. ही घटना कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.  

Presidential Election 2022: गोपाळकृष्ण गांधी यांनी विरोधकांची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारली

राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून सलग तिसऱ्या उमेदवाराने उमेदवारी नाकारली


आधी शरद पवार, त्यानंतर फारुख अब्दुल्ला आणि आता गोपाळकृष्ण गांधी


तिघांनीही उमेदवारीसाठी जाहीर नकार दिला 


त्यामुळे विरोधक या निवडणुकीसाठी कुणाला बाशिंग बांधणार याची उत्सुकता

Sonia Gandhi : सोनिया गांधी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Sonia Gandhi has been discharged : सोनिया गांधी यांना सर गंगा राम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढचे काही दिवस त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही ट्विट करत माहिती दिली आहे.





अग्निपथ योजनेविरोधातीस आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त

Jalgaon News : उत्तर भारतात अग्निपथ योजनेविरोधात सुरु असलेले आंदोलन आणि भारत बंदच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल तसंच लोहमार्ग पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर पथसंचलन केले.

RPF जवानानं तरुणाला मरणाच्या दारातून खेचून आणलं

वर्धा : धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात युवकाचा पाय घसरला... मरणाच्या दारातून RPF जवानानं आणलं खेचून...  वर्धा रेल्वे स्थानकावरून अकोल्याला जाण्याकरिता धावत्या रेल्वेगाडीत चढण्याच्या प्रयत्नात युवकाचा पाय घसरला आणि एक युवक रेल्वे आणि प्लेटफार्म मधील गॅप मध्ये अडकला गेला. यावेळी आरपीएफ जवान भागवत बाजड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता युवकाला मरणाच्या दारातून खेचून आणलं


 





नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठा समोर विद्यार्थ्यांचे आंदोलन

नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येत आंदोलन केलंय. कोरोना काळात महाविद्यालये बंद होती. त्यामुळे शैक्षणिक वर्ग ऑनलाइन पद्धतीने चालू होते. दरम्यान फार्मसी, MBA, LAW, MSC ह्यासह विद्यापीठात विविध शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑफलाईन वर्ग हे केवळ दोन महिने घेण्यात आले आहेत. आता केवळ दोन महिन्यांच्या ऑफलाईन शिक्षणानंतर लगेच उन्हाळी सत्र परीक्षा ह्या ऑफलाईन घेण्यात येत आहेत. दरम्यान केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नसल्याने SRT विद्यापीठातील विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी उन्हाळी सत्र परीक्षा ह्या जळगाव, अमरावती, विद्यापीठाप्रमाणे ऑफलाईन MCQ पद्धतीने घेण्याची मागणी करत आंदोलन केलंय. या आंदोलनात विद्यापीठात विविध शाखेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय.तर ह्या आंदोलनात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला होता.

विषप्राशन करून एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये 2 कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन घरात जवळपास नऊ मृतदेह सापडले असल्याची माहिती आहे. मिरज पोलिस थोडयाच वेळात घटनास्थळी पोहोचतील. म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा व्हनमोरे आणि पोपट यल्लपा होनमोरे या दोन भावाच्या कुटुंबातील 9 जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.


येथे वाचा सविस्तर बातमी

राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण

मुंबईतील लीलावती रुग्णालयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. डॉ. जलील पारकर टीम दुपारी 4 वाजता यासंदर्भात माहिती देणार आहे. राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.





Sangli News : सांगली: मिरज तालुक्यात दोन कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याची घटना, विष पिऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

Sangli News : सांगली: मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये दोन कुटुंबातील नऊ जणांनी आत्महत्या केल्याची माहिती; दोन घरात जवळपास नऊ मृतदेह सापडले, विष पिऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती

संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम कायमस्वरुपी श्री नारायणदार रामदास हायस्कूलमध्ये ठेवण्यासाठी पायी वारी करत इंदापूरवासियांचं तहसिलदारांना निवेदन

Indapur News : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा इंदापूर शहरात 3 आणि 4 जुलै रोजी मुक्कामी येत आहे. शहरातील पालखी मुक्काम कायमस्वरुपी परंपरागत श्री नारायणदास रामदास हायस्कूल या ठिकाणी ठेवावा म्हणून आज शहरातील सिद्धेश्वर मंदिरापासून पायी भजन टाळ मृदुंगाच्या गजरात इंदापूरवासियांनी प्रशासकीय भवनापर्यंत पायी वारी करत तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचे इंदापूर शहरातील नवीन प्रस्तावित मुक्काम तळ हे शहराचे बाहेर केल्याने सर्व शहरवासीय नाराज आणि दुःखी झाले आहेत. नवीन प्रस्तावित मुक्कामाचे ठिकाण हे शहराबाहेरील आयटीआय कॉलेजच्या मैदानावर मुक्काम करण्याचा विचार आहे.  गेल्या दोनशे वर्षापेक्षा जास्त कालावधीचे परंपरा असलेले हे इंदापूर शहरातील मुक्कामाचे स्थळ बदलल्याने सर्वत्र असंतोष पसरत चालला आहे. गैरसमजातून बदललेल्या मुक्कामामुळे वारकऱ्यांना आणि प्रशासनाला सुद्धा अनेक गैरसोयीचा सामना करावा लागणार असल्याचे निवेदनात म्हटलं आहे. प्रशासनाने मुक्काम तळाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास रास्ता रोको, लाक्षणिक उपोषण, मोर्चा, इंदापूर बंद अशा आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला आहे.

सरडेवाडी टोल नाक्यावर स्थानिकांचं आंदोलन

इंदापूर तालुक्यातील पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सरडेवाडी टोल नाक्यावरील सरडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक वाहनांना करमुक्त करण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांना लोखंडी उड्डाणपुलाच्या मागणीसह इतर रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांसह टोल नाक्यावर टोल वसुली बंद आंदोलन केलं. सरडेवाडी ग्रामपंचायतीकडून गावातील वाहन टोल फ्री करावे. गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी लोखंडी उड्डाणपूल द्यावा तसेच सेवा रस्ता संरक्षक भिंत करावे या मागण्यांसंदर्भात टोल प्रशासनाला लेखी निवेदन सादर करण्यात आलं होतं. मात्र सरडेवाडी टोल प्रशासनाकडून कोणताही निर्णय न झाल्याने गावकऱ्यांनी आज विद्यार्थ्यांसह टोलवर आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.

वाशीम पालिकेची अनधिकृत पोस्टर विरोधात कारवाई
वाशीम पालिकेनं शहरात लावल्या जाणाऱ्या अनधिकृत बॅनरस आणि पोस्टर काढण्यास सुरुवात केली आहे. शहरात अनेक महत्वाच्या ठिकाणी पोस्टर लावून अनेक राजकीय पक्ष किंवा व्यापारी शहरास विद्रूप करत असल्याने अनधिकृतपणे लावलेल्या पोस्टरवर पालिकेनं कारवाई केली आहे. मात्र नगर पालिका आणि राजकीय पक्ष यांची सांगड असल्याने नेमकी कारवाई पुढे सुरु राहते का थांबवली जाते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे .   
'स्वाभिमानी' आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने 'अग्निपथ' योजनेविरोधात महाआक्रोश मोर्चा

'अग्निपथ' योजनेविरोधात शासनाला जागे करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. या मोर्चात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. सैन्य भरतीसाठी नव्याने केलेली अग्निपथ योजना रद्द करून पूर्ववत भरती प्रक्रिया राबवावी, महाराष्ट्रात रिक्त असलेल्या 2 लाख 75 हजार पदाची त्वरित भरती प्रक्रिया राबवावी. खाजगी कंपनी मार्फत भरती प्रक्रिया न घेता जिल्हा निवड.समितीमार्फत घेण्यात यावी, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करा, जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, कृषी विभाग, आरोग्य भरती तत्काळ सुरू करा, पोलीस भरतीच्या 65 हजार जागा त्वरित भरा, टीईटीचा निकाल लवकरात लवकर लावावा, 31 हजार पदांची तलाठी भरती प्रक्रिया सुरू करा, यासह आदी अनेक युवकाच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मात्र आक्रमक आणि धिंगाणा घालणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी काही मोर्चेकरी तरुणांवर लाठीचार्ज केला. तर काही आंदोलनकर्त्या तरुणांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामोदर इंगोले यांच्यासह संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.


 

 
नाल्यात सापडला 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुंबई पोलीस दलातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह रविवारी नाल्यात सापडला. मुलुंड पूर्वे येतील म्हाडा कॉलनी, साईराम सोसायटीत कुमावत कुटुंबियांसोबत राहायचे. कुमावत ते पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त अधिकारी होते. शिवदास भोजराज कुमावत (वय 87 वर्ष) असं मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी नवघर पोलीस अधिक तपास करत आहे. ते 15 जूनपासून बेपत्ता होते.

 

'अग्निपथ'वर केंद्र सरकार ठाम; आजपासून लष्करामध्ये अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू

Agniveer Recruitment : सैन्य भरतीसाठी केंद्र सरकार अग्निपथ योजनेवर ठाम आहे. आजपासून भारतीय लष्करात अग्निपथ योजनेनुसार आजपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने यासाठी अर्ज करता येणार आहे. एका बाजूला अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत असताना दुसरीकडे आता भरती प्रक्रियेला कसा प्रतिसाद मिळतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या अग्निवीर भरतीसाठी दोन वर्षांची अट शिथील करण्यात आली आहे. मागील दोन वर्षी सैन्य भरती न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 


वाचा सविस्तर बातमी

Aurangabad: 'अग्निपथ'च्या विरोधात औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीकडून आंदोलन

Aurangabad News: केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीकडून आज औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी 'अग्निपथ बेरोजगारी पथ' या आशयाचे होर्डिंग यावेळी आंदोलकांच्या हातात पाहायला मिळाले.  तर केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी सुद्धा आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.  



Agneepath Scheme : नाशिक शहरातील लष्करी केंद्र परिसरात संचारबंदी

केंद्र सरकारने घोषणा केलेल्या व आजपासून ही भरती प्रक्रिया सुरू होणाऱ्या अग्निपथ योजना चांगलीच गाजत आहे. यामुळे देशभरात आंदोलने करण्यात येत आहेत. तर देशातील अनेक भागात जाळपोळ, दगडफेक करण्यात येत असल्याने तणावाचे वातावरण आहे. देशातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि लष्करी ट्रेनिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या देवळाली कॅम्प, नाशिकरोड, गांधीनगर येथील तीनशे मीटर परिघात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबत कलम 144 प्रमाणे अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

शंभर फूट दरीत कोसळली महिला, डॉक्टर बनले 'देवदूत'

नाशिक : नाशिक शहराजवळील चामरलेणीवर पर्यटनासाठी गेलेली महिला पाय घसरून पडल्याने खोल दरीत कोसळली. यावेळी घटनास्थळावर असणाऱ्या दोन डॉक्टरांच्या समयसुचतेमुळे महिलेला वाचविण्यात यश आले आहे. रविवारची सुट्टी घालविण्यासाठी चामरलेणीवर फिरताना अरुंद वाटेवरून जात असताना पाय घसरून एका महिला खोल दरीत कोसळली. यावेळी महिलेसोबत असणाऱ्या नातेवाईकांसह इतर पर्यटकांना काय करावे सुचत नव्हते. अशी परिस्थिती असतानाच या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेल्या दोन डॉक्टरांना हा प्रकार समजला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत दोन्ही डॉक्टरांनी धाडस करीत दरीत उतरले. दरीत उतरल्यानंतर त्यांना महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. या महिलेच्या हातापायाला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्वरित प्राथमिक उपचार देत महिलेला शुध्दीवर आणले. नातेवाईकांनी तात्काळ माहिती देत रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावली आणि महिलेला रुग्णालयात नेलं.



देहूमधून आज संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान
देहूमधून आज संत तुकाराम महाराज यांच्या 337 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार असून संध्याकाळी साडेसहा वाजता हा पालखी सोहळा इनामदार वाड्यात पहिला मुक्काम करणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून पंढरपूरची वारी रद्द करण्यात आली होती. मात्र यावर्षी कुठलेही निर्बंध न लावता पंढरपूरची वारी होत आहे. देहूमधून संत तुकाराम महाराजांनी आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी विठूनामाचा गजर करत देहू आळंदीत दाखल झाले आहेत. देहू येथून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून उद्या आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकर्‍यांनी देहू आणि आळंदीच्या इंद्रायणी तीरावर गर्दी केली आहे.
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे परभणीत आगमन

शेगावहून पंढरीनाथाच्या भेटीला निघालेली संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आज परभणीत आगमन झालं. भगवी पताका घेतलेले 700 वारकरी, 3 अश्व आणि टाळ मृदूंगाचा गजर करत श्रीची पालखी शहरात दाखल झाली. यावेळी परभणी करांनी मोठ्या उत्साहात पालखीचे ठिकठिकाणी स्वागत केलं. कुठे पुष्पवृष्टी, कुठे प्रसाद, फळे वाटप भाविकांनी केले. श्रीच्या दर्शनासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली होती. आज पालखीचा मुक्काम रोकड हनुमान मंदिर येथे असणार आहे. उद्या सकाळी पालखी मार्गक्रमण करून दैठणा येथील ठाकूरबुवा मंदिरात मुक्काम करून परवा बीड कडे प्रस्थान करणार आहे. 

अग्निपथ योजनेविरोधात आज 'भारत बंद'ची हाक, पोलीस हाय अलर्टवर

लष्कर भरतीसाठी केंद्र सरकाकडून घोषणा करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध कायम आहे. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांच्याकडून हिंसक निदर्शनं सुरुच आहेत. आज अग्निपथ योजनेविरोधात 'भारत बंद'ची (Bharat Bandh) हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. बिहारमधील तरुण आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह देशभरातल पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.


येथे वाचा सविस्तर बातमी

राज्यात यंदा विक्रमी 137.28 लाख टन साखरेचं उत्पादन

यंदाच्या ऊस गाळप हंगामाची सांगता झाली आहे. यंदा राज्यात उसाचं विक्रमी गाळप झालं आहे. तसेच साखरेचं विक्रमी उत्पादन झालं असून, साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे.  महाराष्ट्राने 2021-22 मध्ये 137.28 लाख टन साखरेचे उत्पादन करुन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. मागील वर्षीच्या हंगामाच्या तुलनेत जवळपास 31 लाख टन साखरेचं अधिक उत्पादन केलं आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

रायगड : माणगाव येथे जिवंत गावठी बॉम्ब आढळले

रायगडच्या माणगाव येथे जिवंत गावठी बॉम्ब आढळले. पाणसई करंजवाडी आदिवासी वाडीवर आठ जिवंत गावठी बॉम्ब सापडले. आज पहाटे बॉम्ब शोधक पथकाने कारवाई केली. गोपनीय माहितीनुसार 50 वर्षीय बाबू दगडू जाधव यांचेकडे गावठी बॉम्ब आढळले. रानडुक्करांच्या शिकारीकरिता गावठी बॉम्ब वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. गावठी बॉम्ब तयार करण्याचे रसायन देखील जप्त करण्यात आलं आहे.

अहमदनगर : माजी सैनिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

अहमदनगरमध्ये माजी सैनिकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. कोपरगाव नगरपरिषद कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. माजी सैनिकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. घराशेजारील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा तक्रार करुनही प्रशासन कारवाई करत नसल्याने माजी सैनिकानं टोकाचं पाऊल उचललं. दिवाकर मकासरे (वय 74 वर्ष) यांचा आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी जवळच असलेल्या नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.





अनिल देशमुख यांच्या डीफॉल्ट जामिनावर सुनावणी तहकूब 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या डीफॉल्ट जामीनावर सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. तिघांच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी सुनावणी होणार आहे. सीबीआयतर्फे या प्रकरणात दाखल करण्यात आलेलं आरोपपत्र पूर्ण नाही, असा दावा करत तिघांनी मुंबई सत्र न्यायालय विशेष सीबीआय कोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती.

अकोला : अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादीचा रेल्वे रोको

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेविरोधात अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रोको रेला. कार्यकर्त्यांनी जम्मूतावी-नांदेड हमसफर एक्सप्रेस रोखली. केंद्राच्या योजनेविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी करत सुमारे आठ मिनिटं रेल्वे थांबवली. मात्र रेल्वे वाहतूकीवर आंदोलनाचा कोणताही परिणाम झालेला नाही.

पुण्यात अप्पर चौकात एटीएमला आग

पुणे : पुण्यातील अप्पर चौकात एटीएमला आग लागली. व्हीआयटी कॉलेज रोड गजानन बुक डेपो समोरील ऍक्सिस बँकेच्या एटीएमला आग लागली असून आग विझविण्याचं काम सुरु आहे. आगीच कारण अद्याप अस्पष्ट असून शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतं आहे.


#Breaking : पुण्यात अप्पर चौकात एटीएमला आग... व्हीआयटी कॉलेज रोड गजानन बुक डेपो समोरील ऍक्सिस बँकेच्या एटीएमला आग...आग विझविण्याच काम सुरु#BreakingNews #Pune #Maharashtra #LiveUpdates pic.twitter.com/X1Pqnze4xU


— ABP माझा (@abpmajhatv) June 20, 2022




रायगडमधील कलोते धरणात तरुणाचा बुडून मृत्यू, 17 तासांनी मृतदेह सापडला

Raigad News : रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील कलोते धरणात तरुणाचा बुडून मृत्यू झाला. आकाश नाईक असं या तरुणाचं नाव असून तो 26 वर्षांचा होता. रविवारी (19 जून) सायंकाळच्या सुमारास आकाश नाईक बुडाला तर आज (20 जून) सकाळी त्याचा मृतदेह सापडला. खोपोली इथल्या रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याचा मृतदेह शोधण्यात यश आलं. सुमारे 17 तासांनी त्याचा मृतदेह सापडला.

Aurangabad: हर्सूल येथील कचरा डेपोला भीषण आग

Aurangabad News: हर्सूल येथील जकात नाका भागातील कचरा डेपोलो आज सकाळी मोठी आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आग एवढी भीषण आहे की, धुराचे लोंढे दूरपर्यंत पाहायला मिळत आहे. 



आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरपुरात 'योग शोभायात्रा'

पंढरपूर : आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंढरपुरात आयुष मंत्रालय भारत सरकार, पतंजली योगपीठ आणि पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने योगविषयक शोभायात्रा सोमवारी काढण्यात आली. यामध्ये महिलांसह विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. विविध शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. आशा स्वयंसेविका, आरोग्यदूत, योगशिक्षक यांचीही उपस्थिती होती. ढोल-ताशांच्या गजरामध्ये संपूर्ण नगरप्रदक्षिणा मार्गावर योग प्रात्यक्षिक करत ही शोभायात्रा निघाली. मंगळवारी 21 जून रोजी पंढरपुरात दहा हजार लोकांच्या उपस्थितीत योग महोत्सव होत आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत होणाऱ्या देशातील 75 ठिकाणच्या योग महोत्सवांमध्ये पंढरपूरचा समावेश असल्याने पंढरपुरात सध्या योग दिनाची मोठी तयारी सुरू आहे.





जळगाव : पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थाना जवळील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर

जळगाव शहरातील काव्य रत्नावली चौक परिसरात पोलीस अधीक्षक निवास स्थान आहे. या निवास स्थान शेजारी असलेली भिंत ही नेहमीच सामाजिक संदेश देण्यासाठी मानवतेची भिंत म्हणून ओळखली जाते. मात्र या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर या भिंतीवर लिहिण्यात आला. ही बाब पोलीस अधीक्षकांच्या कानावर पडताच त्यांनी तातडीने हा मजकूर पुसण्याचा सूचना दिल्या. त्यानंतर आता पोलिसांनी हा मजकूर पुसला आहे. दरम्यान मजकूर लिहीणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय आणि त्या व्यक्ती कोण याचा पोलीस आता शोध घेत आहेत.

उल्हासनगर : रिक्षा चालकावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला, पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती

उल्हासनगरच्या माणेरे गांव परिसरात एका रिक्षाचालकावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आलाय. त्याच्या ओळखीच्या एका तरुणाने त्याच्यावर हा हल्ला केला आहे. यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी तानाजी लष्कर याच्या विरोधात कलम 324 अन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नसून तो फरार आहे. याप्रकरणी मात्र विठ्ठलवाडी पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती परीक्षा शांततेत पार

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2022 ची लेखी परीक्षा शांततेत पार पडली आहे. गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील 136 जागांसाठी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 16 हजार 848 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 16 परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली.  

चारित्र्याच्या संशयावरुन भिवंडीत भंगारविक्रेत्याकडून पत्नीचा गळा आवळून खून

Bhiwandi News : चारित्र्याच्या संशायावरुन एका भंगार विक्रेत्याने पत्नीचा राहत्या घरी गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना काल्हेर इथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती भंगार विक्रेत्याने नारपोली पोलीस ठाण्यात हजर राहून दिली. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. मोहम्मद मुस्ताक हयातुल्ला शाह (वय 35 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या भंगार विक्रेत्याचे नाव आहे. तर आबिदा शाह (वय 32 वर्षे) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मोहम्मदने पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देताना सांगितले की, तो काल्हेर इथे वास्तव्यास असून रात्री जेवण करुन त्याच्या पत्नीसह सर्व कुटुंबीय झोपलेले होते. त्यानंतर उठल्यानंतर त्याला त्याची पत्नी अंथरुणावर दिसली नाही. त्यामुळे त्याने पत्नीचा शोध सुरु केला. त्यावेळी त्याला ती दुसऱ्या माळ्यावर दुसऱ्या पुरुषासोबत दुष्कर्म करताना आढळली. त्यामुळे त्याने वायरने तिचा गळा आवळून खून केला. घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत.

चिपळूण जिल्ह्यातील एसटी आगारांचे वेळापत्रक कोलमडले, टायर अभावी लांजा आणि गुहागर डेपोत अनेक गाड्या जागीच उभ्या
Chiplun News : चिपळूण जिल्ह्यातील एसटी आगारांचे वेळापत्रक कोलमडले आहे. टायरअभावी लांजा आगारातील 11 बस 15 दिवसांपासून आगारात उभ्या असून गुहागर आगारात 28 गाड्या जागीच उभ्या आहेत. सुरुवातीला कोरोनामुळे आणि एसटी आंदोलनानंतरच्या मोठ्या कालावधीनंतर एसटी सेवा पूर्वपदावर येत असताना टायर तुटवड्यामुळे लांजा आणि गुहागर आगारात अनेक एसटी बस फेऱ्या उभ्या आहेत. याचा थेट परिणाम नियमित फेऱ्यांवर झाला आहे. गाड्यांना आवश्यक असणारे पुढील आणि मागील टायरच वरिष्ठ कार्यालयातून उपल्ब्ध होत नसल्याने दोन्ही आगारातील गाड्या कित्येक दिवस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Agneepath Scheme : अग्निपथ योजनेविरोधात आज 'भारत बंद'ची हाक, पोलीस हाय अलर्टवर

Agneepath Protest : लष्कर भरतीसाठी केंद्र सरकाकडून घोषणा करण्यात आलेल्या नवीन अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरतून विरोध कायम आहे. देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले असून त्यांच्याकडून हिंसक निदर्शनं सुरुच आहेत. आज अग्निपथ योजनेविरोधात 'भारत बंद'ची (Bharat Bandh) हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. बिहारमधील तरुण आणि विद्यार्थी संघटनांनी बिहार बंदची हाक दिल्यानंतर भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह देशभरातल पोलीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा नाशिक दौरा रद्द
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बहुचर्चित नाशिक दौरा रद्द झाला असून त्यांच्याऐवजी आता नाशिक दौऱ्यावर गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिकला येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द होऊन त्यांच्याऐवजी आता केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नाशिक दौऱ्यावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून गेल्या आठ दिवसांपासून तयारी सुरु होती. यासाठी जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी 14 पथकं देखील कार्यान्वित करून विविध जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या. मात्र रविवार सायंकाळी उशिरा अमित शाह यांचा दौरा रद्द झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नाशिक शहरातील मास्टर मॉलला भीषण आग, लाखो रुपयांचे नुकसान

नाशिक शहरातील गंजमाळ परिसरात असणाऱ्या मास्टर मॉलला रविवारी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखोंचा माल जाळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. नाशिकच्या गंजमाळ परिसरातल्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मास्टर मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. यावेळी तिसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट येत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांसह महापालिकेच्या अग्निशामक दलाला कळविण्यात आली. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझविण्यासाठी अग्निशनम विभागाच्या दोन गाड्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेत जीवितहानी नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती- 2022 ची लेखी परीक्षा शांततेत संपन्न, 136 जागांसाठी परीक्षेचं आयोजन

Gadchiroli News : गडचिरोली जिल्हा पोलीस भरती-2022 च्या 136 जागांसाठी रविवारी (19 जून) गडचिरोली पोलीस दलामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा शांततेत पार पडली. यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 16848 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. लेखी परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात सामान्य क्षमता चाचणी तर दुसऱ्या टप्प्यात गोंडी भाषेचा प्रश्नपत्रिका देण्यात आली. गडचिरोली पोलीस दलामार्फत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शासकीय कृषी महाविद्यालय, पोलीस मुख्यालय यासह 16 परीक्षा केंद्राची व्यवस्था करुन, केंद्राच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. बंदोबस्ताकरता 2000 च्या आसपास पोलीस अधिकारी आणि अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती. गडचिरोली जिल्हा पोलीस भरती-2022 पासून कोणतेही उमेदवार वंचित राहू नये म्हणून वेळोवेळी सोशल मीडियामार्फत गडचिरोली पोलीस दलाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बहुसंख्य उमेदवारांनी लेखी परीक्षेकरता आपली हजेरी लावल्याचे दिसून आले.

जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रस्थान सोहळा

Sant Tukaram Palkhi : जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता प्रस्थान सोहळा पार पडेल. मुख्य मंदिर, पालखी अन् रथ फुलांनी सजवण्यात आल आहे. इंद्रायणी नदीच्या काठी वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच ठिकठिकाणी वैष्णवांचा मेळा भरला आहे. दोन वर्षानंतर पायी सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे.

मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले इथे डंपरचा अपघात, दोन जण जखमी

Mumbai Accident : मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले या ठिकाणी भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरचा भीषण अपघात झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज पहाटे चारच्या सुमारास रेतीने भरलेला डंपर भरधाव वेगाने अंधेरीच्या दिशेने जात होता. मात्र त्याच दरम्यान विलेपार्ले या ठिकाणी डंपर चालकाचे नियंत्रण सुटले आणि डंपर डिव्हायडरला धडक देऊन पलटी झाला. या अपघातात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र डंपर पलटी झाल्यामुळे वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विलेपार्ले इथे वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळावर वाहतूक पोलीस दाखल होऊन डंपर हटवण्याचे काम सुरु आहे.

पालघर : जव्हार येथील अंबिका चौकात एका घराला भीषण आग

पालघरमध्ये जव्हार येथील अंबिका चौकात घराला भीषण आग लागली. आगीत संपूर्ण घर जळून खाक झालं आहे. भगवान शेठ जोशी यांच्या मालकीचे घराला आग लागली होती. रात्री दोन वाजताच्या सुमारास आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या एका गाडीच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली असून आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.


 





पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


विधानपरिषदेसाठी आज मतदान आणि निकाल
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.  राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू रहाणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996, 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार काय याची उत्सुकता दिसून येतेय. 
 
खरी लढत रंगणार भाजप विरूद्ध कॉग्रेस
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध प्रसाद लाड अशी रंगणार आहे. भाई जगताप मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शिअल व्होटिंग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ 44 आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता 26 मते मिळू शकतील. मात्र भाई जगतापांना जिंकण्याकरता 8 मते कमी पडत आहेत. या 8 मतांकरता काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
 
राज ठाकरे यांच्यावर आज शस्त्रक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हीप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. कोरोनाचे डेड सेल्स आढळल्यामुळे मागच्या वेळी शस्त्रक्रिया पुढे ढकलली होती. राज ठाकरे शस्त्रक्रियेसाठी लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी कार्यकर्त्यांकडून पूजा केली जात आहे.
 
राहुल गांधींची आज चौथ्यांदा ईडी चौकशी होणार
ईडीने समन्स पाठवल्यानंतर राहुल गांधी 13 जूनला पहिल्यांदा चौकशीला समोर गेले. त्यानंतर सलग तीन दिवस राहुल गांधीची चौकशी झाली. पहिल्या दिवशी 50 प्रश्न, दुसऱ्या दिवशी 36 प्रश्न आणि तिसऱ्या दिवशी साधारण 24 प्रश्न विचारल्याची माहिती आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण 2012 मध्ये प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल केली. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसच्या 2000 कोटी रुपयांच्या इमारतीवर कब्जा करण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामींनी केला. सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांना या प्रकरणी लवकर सुनावणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 19 डिसेंबर 2015 रोजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ट्रायल कोर्टाने जामीन मंजूर केला. 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द करण्यास नकार दिला आणि सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस आणि सुमन दुबे यांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट दिली होती. आज राहुल गांधीच्या ईडी चौकशीच्या वेळी कॉग्रेस कार्यकर्ते देशभर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत.
 
कोकण रेल्वेचे विद्युतीकरण 100 टक्के पूर्ण....मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
26 जानेवारी 1998 पासून डिझेलवर धावणाऱ्या कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे. कोकण रेल्वेच्या 741 किमी मार्गावर आजपासून पुर्णपणे इलेक्ट्रिकल गाडी धावणार आहे. 22 फेब्रुवारी 2021 रोजी पहिल्यांदा रोहा ते रत्नागिरी असं वीजेवर चालणाऱ्या इंजिनाची यशस्वी चाचणी झाली. कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी 1287 कोटी रूपये खर्च आला आहे.
 
संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान
संत एकनाथ महाराजांची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे. सकाळी 11 वाजता नाथांच्या गावातील वाड्याकडून समाधी मंदिराकडे पालखी प्रस्थान करेल. सूर्यास्ताच्या वेळी पैठणकर पालखीला निरोप देतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.