Nashik Crime News : आडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgaon Police Station) हद्दीत सय्यद-प्रिंप्री रोडवरील एका वस्तीवरील खेळणी विक्रेत्या पतीचा दुसऱ्या पत्नीने दोन भावांच्या मदतीने जबर मारहाण करत चाकूने वार करुन निघृण खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी पत्नीसह तिच्या भावांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पत्नीस ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयित फरार झाले आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील हिंदुस्थान नगर येथील सिल्व्हर ओक हाऊसमागे शुक्रवारी रात्री आठ वाजता दुहेरी विवाह केलेल्या पतीचा दुसऱ्या पत्नीने मुलबाळ होत नाही, या कारणातून दोन सख्ख्या भावांच्या मदतीने जबर मारहाण करत चाकूने वार करुन निघृण खून केला. भावसार मुलचंद पवार उर्फ बाल्या (45, रा. खिसकुली सर्कल, अटलादरा, बडोदरा, गुजरात) असे मृत पतीचे नाव आहे. याबाबत पत्नी सुनीता नागेश शिंदे, तिचे भाऊ राज नागेश शिंदे, आदित नागेश शिंदे (सर्व रा. हिंदुस्थान नगर, आडगाव) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत मृत भावसार याची पहिली पत्नी नीरमा पवार (30) हिने फिर्याद नोंदविली आहे. शुक्रवारी सकाळी नीरमा ही पती भावसार आणि अकरा वर्षीय मुलगी आलम हिला घेऊन गुजरात येथून आडगाव शिवारातील हिंदुस्थान नगर येथे राहणाऱ्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी भावसारची दुसरी पत्नी व नीरमाची सवत सुनीता हिने भावसार याच्याशी विवाह केल्यासह मूलबाळ होत नाही, या कारणातून सकाळपासून भांडण सुरु केले होते. यावेळी सुनिताचे भाऊ राज आणि आदित हे देखील या भांडणात सहभागी झाले.


दुसरी पत्नी पोलिसांच्या ताब्यात 


दिवसभर वाद सुरु असतानाच संध्याकाळी सात वाजेनंतर, अचानक भावसार याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने पत्नी नीरमा व तिचे कुटुंब आणि नातलग गोंधळात पडले. तेव्हा संशयित सुनीता, राज, आदित, त्यांचा नातेवाईक दीपक आणि एक अनोळखी संशयित मिळून भावसारला जबर मारहाण करत होते. सुनीता, आदित, दीपक आणि अनोळखी संशयिताने भावसार याला धरुन ठेवत राज याने धारदार चाकूने भावसारच्या पोटावर, छातीवर, पाठीत वार केले. तसेच आदितने डोक्यात रॉड टाकून जखमी केले. भावसारच्या वर्मी घाव लागल्याने तो रक्तबंबाळ होऊन पळत पळत पत्नी नीरमाजवळ आला. त्याला नीरमासह इतरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गुन्ह्यातील संशयित सुनीता हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित राज, आदित, दीपक आणि अनोळखी संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.


पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीने केली हत्या


दरम्यान, पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीने पतीची हत्या केली असल्याचे समोर येत आहे. पहिली पत्नी नीरमाची सावत्र बहीण सुनीताशी विवाह केल्यावर भावसार नाशिकला न येता पहिल्या पत्नीसह गुजरातलाच राहत होता. विवाह केल्यावर तिला मुलबाळ होत नसल्याने व अन्य वादातून ती भावसार यांच्याशी सतत भांडण करत असे. दोन दिवसांपूर्वीच सुनीता ही मांडण करून हिंदुस्थान नगर, आडगाव शिवार येथे माहेरी आली होती.


आणखी वाचा 


Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?