sugarcane season : ऊस गाळप हंगामाची सांगता, महाराष्ट्रात विक्रमी गाळप, ब्राझीलला मागं टाकत भारत अव्वल
यावर्षीच्या ऊस गाळप हंगामाची सांगता झाली आहे. यंदा राज्यात विक्रमी उसाचं गाळप करण्यात आलं आहे.
Sugarcane Season : यंदाचा 2021-22 चा उसाचा गाळप हंगाम संपला आहे. या हंगामात उसाचं विक्रमी गाळप झालं असून, मोठ्या प्रमाणावर साखरेचं उत्पादन झाल्याची माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. राज्यातील सहकारी आणि खासगी 200 पैकी 198 साखर कारखान्यांनी गाळप थांबवले आहे. यंदा राज्यातील कारखान्यांनी 1 हजार 320 लाख टन उसाचे यशस्वी गाळप केलं आहे. तर आतापर्यंत 137.28 लाख टन साखर तयार झाली आहे. यामुळं साखर उद्योगाची उलाढाल एक कोटीच्या पुढं गेली आहे.
शेतकऱ्यांना 42 हजार कोटी रुपये मिळणार
यंदाच्या हंगामात सरासरी साखर उतारा हा 10.40 टक्के मिळाला आहे. यावर्षीचा गाळप हंगाम हा सरासरी 173 दिवस चालला. एफआरपीपोटी शेतकऱ्यांना 42 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. कारखान्यांनी यंदा इथेनॉलमध्ये 9 हजार कोटींची, सहविजेच सहा हजार कोटींची तर मद्यनिर्मितीतून 12 हजार कोटींची उलाढाल केली आहे. जरम्यान, कोल्हापूर विभागातील सर्व म्हणजे 36, पुणे विभागातील 30 पैकी 29, सोलापूर विभागातील 47, नगर विभागातील 28 तर औरंगाबाद विभागातील 25 पैकी 24 साखर कारखाने बंद झालेले आहेत. नांदेडमधील सर्व म्हणजे 27, अमरावतीमधील 3 तर नागपूरमधील चारही कारखाने बंद झालेले आहेत.
देशात महाराष्ट्र प्रथम, भारतानं ब्राझीलला टाकलं मागं
महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आला आहे. या हंगामात महाराष्ट्रात 13 लाख 67 हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लावण्यात आला होता. राज्यात साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग आघाडीवर असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उसाचं गाळप झालं. यंदाच्या गाळप हंगामात भारतानं साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत जगात पहिला क्रमांक मिळवला आहे. भारतात महाराष्ट्र अव्वल ठरला असून उत्तर प्रदेश पिछाडीवर गेला आहे. देशात यंदा 350 लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून महाराष्ट्राचा त्यातील वाटा 51 टक्के म्हणजे १३८ लाख टनांचा आहे.
ऊस गाळपात विठ्ठलराव शिंदे अव्वल क्रमांक
ऊस गाळपात माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यानं अव्वल क्रमांक मिळवला आहे. या कारखान्यानं पावनेपंचवीस लाख टन उसाचं गाळप केलं आहे. साडेपंचवीस लाख क्विंटल इतकी विक्रमी साखर देखील या कारखान्यानं तयार केली आहे. तर कालगलच्या दुधगंगा सहकारी साखर कारखान्यानं 12.99 टक्के इतका साखर उतारा मिळवला आहे. राज्यात हा सर्वाधिक साखर उतारा आहे. सर्वात कमी उसाचं गाळप हे किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Dadaji Bhuse : आंतरराष्ट्रीय पातळीवरील मागणी विचारात घेवून पिकांचं वाण विकसित करा : कृषीमंत्री दादाजी भुसे
- Vidarbha Monsoon : विदर्भात मान्सून दाखल, 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरण्या करा, कृषी विभागाचं आवाहन