Maharashtra Breaking News 20 July 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Jul 2022 11:33 PM
INS विक्रमादित्य युद्धनौकेवर आगीची घटना

समुद्रात युद्धनौकाच्या चाचण्या आयोजित करण्यात अलेल्या असताना आज 20 जुलै 22 रोजी INS विक्रमादित्य युद्धनौकेवर आग लागल्याची घटना घडली. युद्धनौका कारवारपासून पुढे येत असताना ही घटना घडल्याची माहिती आहे. जहाजावरील अग्निशमन यंत्रणांचा तातडीने वापर करून युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल संपुष्टात आल्याची घोषणा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनुसार पक्षातील सर्व विभाग आणि सर्व सेल संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांच्या सहीच पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यामध्ये शरद पवार यांच्या संमतीनच निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 


 


 

Solapur News :  सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पातील एका चिमणीस आग

Solapur News :  सोलापुरातील एनटीपीसी प्रकल्पातील एका चिमणीस आग लागली आहे. एफजीडि प्लांटमध्ये काम सुरु असताना आग  लागली. संध्याकाळी 6.10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एनटीपीसीतल्या सुरक्षा यंत्रणेने तात्काळ आग विझवली, सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी  झाली नाही

ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेत कर्मचाऱ्याची आत्महत्या, बागलाण तालुक्यातील घटना

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील एका ग्रामपंचायतील कर्मचाऱ्यांने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. समाधान निंबा पाटील असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 
आर्थिक विंवचेनेतुन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

26 कोटीचा दंड ठोठवून ही कारवाई नाही, महसूल प्रशासनाची भूमिका संशयाच्या गर्तेत

वसईच्या राजवली आणि वाघराळ पाडा येथे भूमाफियांनी डोंगर पोखरुन चाळी वसवल्या आहेत. त्यामुळेच १३ जुलै रोजी दरड कोसळून दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. महसूल विभागानं त्याच्याच शेजारील १४६-३ या डोंगरावरील उत्खननाप्रकरणी २६ कोटीचा दंड लावला होता. या कारवाईलाच सात महिन्याचा काळावधी लागला. ना दंड वसूल झाला. ना उत्खनन थांबलं. त्यामुळे दरड कोसळल्याप्रकरणी  पालिका, महसूल आणि वन विभागाच्या अधिका-यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सामान्य नागरीक करत आहेत. 

पुण्यात पोलिसांकडून आठ लाख रुपयांचे अफीम जप्त

पुण्यात पोलिसांकडून आठ लाख रुपयांचे अफीम जप्त करण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती टिळक रस्त्यावर युनिट १ ची कारवाई


उमेद कानाराम देवासी या तस्करी करणाऱ्याला  पोलिसांनी हडपसर येथून अटक केली आहे.  


 काही दिवसांपूर्वी पोलिसांनी हिराबाग चौकातून राजू गुर्जर याला याच प्रकरणी ताब्यात घेतले होते त्याच्या चोकशीत मुख्य आरोपी असलेल्या उमेद देवासी याचं नाव उघड


दोन्ही आरोपींना न्यायालयाने सुनावली 25 जुलै पर्यंतचे पोलीस कोठडी

JEE Main 2022 : जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा २५ जुलैपासून
नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने  केलेल्या घोषणेनुसार जेईई मेन 2022 दुसऱ्या सत्राची परीक्षा सोमवार २५ जुलै २०२२ पासून सुरू होणार आहे. आधी जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा गुरुवार २१ जुलै २०२२ पासून सुरू होणार होती. परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचे कारण एनटीएने जाहीर केलेले नाही. पहिल्या सत्राची परीक्षा २३ ते २९ जून दरम्यान झाली होती त्यानंतर नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

 

 

जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा भारताबाहेरच्या १७ शहरांसह देशातील ५०० शहरांमध्ये वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे. ही परीक्षा ६.२९ लाख विद्यार्थी देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेनच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी jeemain.nta.nic.in वरून अॅडमिट कार्ड २१ जुलै पासून डाऊनलोड करण्यात येतील. परीक्षेबाबतची अधिकृत माहिती याच वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 
Nana Patole : 'तो' व्हिडीओ माझी वैयक्तीक बदनामी करण्यासाठीच, पक्षाच्या लिगल सेलकडून कारवाई सुरु

नागपूरः महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालवली असून माझी वैयक्तीच बदनामी करण्यासाठी 'तो'  व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. यावर आमची लिगल टीम तपासणी करत असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याची आमची तयारी असल्याची प्रतिक्रीया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. मुंबई जाण्यासाठी निघाले असताना त्यांनी नागपूर विमानतळावर पत्रकारांशी  संवाद साधला.

वणी तालुक्यातील 84 नागरिकांना बोटीद्वारे आणले सुरक्षित स्थळी

वणी तालुक्यातील भुरकी, जुनाड, कवडशी, सावनगी, शिवणी,चिंचोली, जुगाद या गावाना पाण्याचा वेढा आहे.  घरातील पाणी शिरले आहे   आज शेलू येथील 10 आजारी लोक, कवडशी 4, शिवणी 18 चिंचोली -52 लोकांना बाहेर बोटी द्वारे काढण्यात आले व शिवणी गावात डॉक्टर ला पाठवण्यात आले होते व शिवणी व चिंचोली च्या गावातील लोकांची व्यवस्था कैलासनगर येतील सांस्कृतिक सभागृहात  मेडिकल तपासणी व राहण्याची व्यवस्था केली आहे.

शिवसेनेच्या “शिव वाहतूक सेनेची” घोषणा

एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटात पक्षांतर्गत लढाई सुरू असताना गेले २ वर्षांपासून स्थगित असलेली शिवसेना अंगीकृत शिव वाहतूक सेनेची मुख्य कार्यकारिणी आज पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. अध्यक्षपदी मोहन गोयल, सरचिटणीस निलेश भोसले, कोषाध्यक्ष विनय मोरे आणि उपाध्यक्ष पदी सुपारीवाला यांची नियुक्ती सामना मुखपत्रातून जाहीर करण्यात आली आहे. मोहन गोयल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विश्वासू निकटवर्तीयांपैकी एक असून अलीकडील सत्तांतर नाट्यात एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी त्यांच्या मालकीच्या बस वाहनाद्वारे केलेल्या प्रवासामुळे चर्चेत आले होते.

मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून भुषण गगरानी यांची नियुक्ती

मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून भुषण गगरानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेला भगदाड

गोंदियात आता शिवसेनेला भगदाड पडला असून गेल्या 25-30 वर्षापासून शिवसेनेत असलेले शिवसेनेचे जिल्हा सहप्रमुख मुकेश शिवहरे हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात किरण पांडव यांच्या उपस्थितीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात  शिवसेनेला मोठा झटका लागलेला आहे.





धुळे : एक एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला, दुसरं एटीएम फोडलं

धुळे जिल्ह्यात दोन विविध ठिकाणी एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. फागणे येथे तालुका पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांचा प्रयत्न फसला मात्र कापडणे येथे गॅस कटरच्या मदतीने चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून पाच लाख रुपयांपेक्षा जास्तीची रोख रक्कम चोरी केल्याचे समोर आले आहे. धुळे जिल्ह्यातील फागणे येथील एचडीएफसी एटीएम मशीन गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र तालुका पोलिसांचे पथक घटनास्थळी तात्काळ पोहोचल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला यामुळे दरोडेखोरांना चोरी करणे या ठिकाणी शक्य झाले नाही परंतु सोनगीर जवळील कापडणे गावातील मुख्य चौकात असलेल्या इंडिकॅश टाटा प्रोटेक्ट एटीएम मशीन फोडून पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे

वर्धा : आजनसरा देवस्थानाला पुराचा मोठा फटका

हिंगणघाट तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या आजनसरा येथील श्री संत भोजाजी महाराज देवस्थानात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्यामुळे मंदिराचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कार्यालयातील कॉम्प्युटर, इलेक्ट्रिक सामान, सीसीटीव्ही मशीन, प्लायवूड यासह अनेक वस्तूंचे नुकसान झाल्यामुळे आता देवस्थानातील कर्मचाऱ्यांकडून मंदिराची साफसफाई केली जात आहे. मंदिराच्या मागे वर्धा आणि यशोदा नदीचा संगम आहे त्यामुळे यावर्षी मुसळधार पाऊस बरसल्यामुळे नद्यांना पूर आला आणि पुराचे पाणी हे थेट मंदिर परिसरात शिरलं आणि परिसराचाही आणि मंदिराच्या कार्यालयाचा देखील मोठं नुकसान केलं आहे.

रामदास कदम यांना मी योग्य वेळी उत्तर देईन : भास्कर जाधव

रामदास कदम यांना मी योग्य वेळी उत्तर देईन, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. 1 एप्रिल 2021 पासून विविध कामांसाठी दिला जाणारा निधी नवीन सरकार आल्यावर स्थगिती दिली आहे. ज्यावेळेस मंजुरीसाठी गेले त्यावेळी आताच्या सरकारमधील मंत्री होतेच ना, मग त्यांनी चुकीची मंजुरी दिली होती का असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

सिंधुदुर्ग : अपघातात एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली नांगरतास येथे कार आणि दुचाकी यांचा अपघात झाला. या अपघातात आंबोलीमधील सिंधुदुर्ग बँकेचे कर्मचारी निशिकांत पांडुरंग बागडी हे जागीच ठार झाले आहे. तर चौकुळ शाखेचे व्यवस्थापक संतोष बजरंग शिंदे यांचे दोन्ही पाय जायबंदी झाले आहेत. आंबोली नांगरतास दहीचाव्हाळ येथे हा अपघात घडला आहे. गंभीर जखमी असलेल्या संतोष शिंदेवर आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सुरू आहेत.





यवतमाळ : खासदार भावना गवळी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी बंडखोरी केल्यानंतर यवतमाळमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यवतमाळच्या आर्णीमध्ये शिवसैनिकांनी खासदार गवळी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. दरम्यान शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये पुतळा जाळण्याच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे.





यवतमाळ : पुरामुळे राळेगाव तालुक्यातील शेती वाहून गेली

यवतमाळ जिल्ह्याच्या दोन दिवसात कोसळलेल्या पावसामुळे राळेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या रामगंगा नदीला पूर आला. या पुरामुळे झाडगाव परिसरातील शेकडो एकर जमीन खरडून गेली आहे. राळेगाव तालुक्यात मोठी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याचा वेग एवढा होता शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली असून शेतात केवळ मोठ मोठे दगड राहिले आहेत. इतकंच नाहीतर पुराच्या पाण्यामुळे शेतात मोठे दगड येऊन पडले आहेत. शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर हे उभं पीक आणि माती पूर्णपणे वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचून गेला. शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जात आहे. अशीच स्थिती तालुक्यातील सावंगी, धानोरा, चिखली, आष्टा, मेंगापूर,वारा, दापोरी यासह अनेक गावांतील आहे. शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. 

संजय राऊत ईडी प्रकरण:  संजय राऊत ७ ऑगस्टनंतर ईडीसमोर हजर राहणार आहेत

संजय राऊत ईडी प्रकरण:


संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने संजय राऊत ईडीसमोर हजर झाले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वकिलांनी ईडीकडे सूट मागितली. 


संजय राऊत यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांना ७ ऑगस्टपर्यंत सूट मागितली आहे, जी ईडीने मान्य केली आहे.


 संजय राऊत ७ ऑगस्टनंतर ईडीसमोर हजर राहणार आहेत

Aurangabad: महापालिका प्रभाग रचनेच्या अंतिम आराखड्याचा नकाशा प्रसिद्ध

Aurangabad municipal corporation elections 2022 : राज्य निवडणूक आयोगाने औरंगाबाद महानगरपालिकेच्या 42 बहुसदस्यीय प्रभाग रचनेच्या आराखड्याला मंगळवारी अंतिम मंजुरी दिली होती. त्यामुळे प्रभाग रचनेचा अंतीम आराखडा आज प्रसिद्ध केला जाणार होता. त्यानुसार प्रभाग रचनेचा अंतिम नकाशा जाहीर करण्यात आला आहे. ज्यात 42 प्रभाग करण्यात आले आहेत. तर 12 लाख 28 हजार 32 मतदारांसाठी प्रारूप प्रभागरचना नकाशा जाहीर करण्यात आला आहे.


 

पुण्यात स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला, व्हॅन पूर्णपणे जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

Pune School Van Fire : पुण्यात एका स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतला. कात्रज कोंढवा रोड भागातील यशवंत विहारमध्ये ही घटना घडली. आगीत स्कूल व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली होती. स्कूल व्हॅनमध्ये त्यावेळी कुणी नसल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. गाडीतील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. अग्निशामन दलाच्या प्रयत्नाने अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आली.

उजनी धरण हे 53 टक्के भरलं, सध्या धरणात 92.13 टीएमसी इतके पाणी

Indapur News :  पुणे, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेलं उजनी धरण हे 53 टक्के भरलं आहे. मागच्या काही दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने उजनी धरण हे 12 जुलै रोजी प्लसमध्ये आलं होतं. अवघ्या 7 दिवसात उजनी धरण हे 53 टक्के भरलं आहे. सध्या उजनी धरणात 92.13 टीएमसी इतके पाणी आहे. उजनी धरणाची एकूण क्षमता ही 117 टीएमसी इतकी आहे. अवघ्या 7 दिवसात उजनी धरण हे 53 टक्के भरलं आहे. 

यवतमाळच्या वणी तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा, एक हजार नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर

Yavatmal Flood : यवतमाळच्या वणी तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा पडला आहे. लगतच्या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी वर्धा नदीला आलेल्या पुराचे पाणी या गावांमध्ये घुसले आहे. सर्व नागरिक सुरक्षित असून प्रशासन त्यांच्या संपर्कात आहे. झोला आणि कोना गावचे सुमारे एक हजार नागरिकांना वणी आयटीआय येथे त्यांचे पशुधनासह स्थलांतरित करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात असून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण लक्ष आहे. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनच्या तीन पथके तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या नागपूर इथल्या एका पथकाच्या सहकार्याने परिस्थितीवर नियंत्रण आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे पथकं छोट्या बोटीने कोना गावातील एका सिकलसेल रुग्णाला वणी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील  उकणी, जुनाड, शिवणी (ज), सेलू (खु), भूस्की, कवडशी, रांगणा, चिंचाली, सांवगी (नवीन), झोला, कोना) गावांना पडला होता पुराचा वेढा जिल्हाधिकारी यांनी रांगण येथून ड्रोन कॅमेराद्वारे 11 गावातील पूर परिस्थिती पाहणी केली. नागरिकांना वणी इथल्या आयटीआय येथे सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. रात्री उशिरापर्यंत हे बचाव कार्य सुरु होते.

Sanjay Raut Press Conference : ब्ल्यूसी हॉटेलमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता, 2019 मध्ये भाजपनं शब्द पाळलेला नाही : संजय राऊत

Shiv Sena MP Sanjay Raut Press Conference : शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. त्या सर्व आरोपांचं संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना खंडन केलं आहे. ब्ल्यूसी हॉटेलमध्ये 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. 2019 मध्ये भाजपनं शब्द पाळलेला नाही, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच, शिंदे गटाला मान्यता मिळाल्यानंतर संजय राऊतांनी टीका केली आहे. आमच्या पत्राला उत्तर नाही, मात्र फुटीर गटाला मान्यता दिली जाते, असं ते म्हणाले. तसेच, शिंदे गटाकडून वारंवार केल्या जाणाऱ्या दाव्यांवर बोलताना बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलं असाही दावा ते करु शकतात, असाही खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे. 

सेन्सेक्स 625 अंकांनी तर निफ्टी 190 अंकांनी वधारला, तर डाॅलरच्या तुलनेत रुपया 79.94 वर
Share Market News : सेन्सेक्स 625 अंकांनी वधारला तर निफ्टीत 190 अंकांनी वर आहे. तेल कंपन्यांना विन्डफाॅल टॅक्सवर सरकारकडून सूट देण्यात आल्यानंतर बाजारात तेजीचं वातावरण आहे. सोबतच जागतिक बाजारपेठांच्या चांगल्या स्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. सरकारच्या निर्णयानंतर तेल कंपन्यांना प्रोसेसिंगसाठी लागणाऱ्या खर्च कमी होणार आहे. ओएनजीसी, रिलायन्ससारख्या कंपन्यांच्या समभागात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. ओएनजीसी 5.55 टक्के तर रिलायन्सचा शेअर 4 टक्क्यांनी वधारला आहे. डाॅलरच्या तुलनेत रुपया 79.94 वर आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या भावातही तेजी दिसत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव 107 डाॅलर प्रति बॅरलवर आहे.
फुटीर गट चंद्रावर देखील शाखा सुरु करतील : संजय राऊत

Sanjay Raut Press Conference : बाळासाहेबांना आम्हीच पक्षात आणलं असाही दावा करु शकतात; संजय राऊतांचा खोचक टोला

Shiv Sena MP Sanjay Raut Press Conference : आमच्या पत्राला उत्तर नाही, मात्र फुटीर गटाला मान्यता; संजय राऊतांचा हल्लाबोल

ईडीचं समन्स येईल याची मला कल्पना होतीच : संजय राऊत

मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर घाणीचं साम्राज्य, बीचवर प्लास्टिकचा कचरा

Mumbai Beach : मान्सूनमध्ये एकीकडे मुंबईकर उंच समुद्राच्या लाटांचा आनंद घेत असताना दुसरीकडे मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर घाणीचं साम्राज्य बघायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना आदित्य ठाकरे आणि अजित पवारांनी माहिम बीचच्या सौंदर्यीकरणाच्या कामाची पाहणी केली होती. मात्र, सध्या किनाऱ्यावर सर्वत्र प्लास्टिकचं साम्राज्य बघायला मिळत आहे.

शिवसेना नक्की कोणाची? राजकीय पेचावर सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी

जवळपास महिनाभरापासून राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्ष आज निर्णायक टप्प्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पालघर : आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण

डहाणू आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या तलासरी झाई येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना झिका आणि स्वाईन फ्ल्यू झाल्याचे उघड झाले असताना आता गिरगाव आश्रम शाळेतील 15 विद्यार्थ्यांना स्वाईन फ्ल्यूची बाधा झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या वसतिगृहात 228 मुलं-मुली असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून खबरदारी म्हणून वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बंदी केली असून बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविले जात आहे.

औरंगाबाद पालिका प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर, इच्छुकांची धाकधूक वाढली

औरंगाबाद पालिका प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यावर अनेकांना धक्का बसला होता. त्यामुळे आता इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.


 





नागपूर : व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतलं

नागपूरमध्ये एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात ही घटना घडली. एवढंच नाही तर त्याने स्वत:च्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते त्यातून बचावले आहेत. परंतु या घटनेत व्यावसायिकाचा मात्र मृत्यू झाला. रामराज भट असं मृत व्यावसायिकाचं नाव असून आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी घट; देशात स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?

भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्यो कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून देशाती पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सलग 59व्या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र वगळता देशाची राजधानी दिल्लीसह इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत जवळपास 2 महिन्यांपासून कोणताही बदल झालेला नसून किमती स्थिर आहेत.  दरम्यान, 14 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. 


सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


शिंदे गट विरुद्ध उद्धव गटाच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंनी अजय चौधरींच्या नियुक्तीविरोधात आणि झिरवळांच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुभाष देसाई, सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांची निवड, बंडखोर आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेची परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय या बाबींना सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. या सगळ्या याचिकांवर एकत्रितपणे आज सुनावणी होणार आहे चीफ जस्टिस एन व्ही रमण्णा, जस्टिस कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांच्या बेंचसमोर सकाळी 11.30 वाजता ही सुनावणी होणार आहे.


ओबीसी आरक्षणाची सुनावणी आज
राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) फैसला आज होणार आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं त्याकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार का? बांठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्ट ग्राह्य धरणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत. 


ओबीसी आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी पार पडणार आहे. राज्यात ओबीसींची लोकसंख्या 37 टक्के असून त्यांना 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस आयोगाने केली आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारुन न्यायालय ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण मान्य करणार का, या मुद्द्यावर ही महत्वपूर्ण सुनावणी होणार असल्याने न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


संजय राऊतांना पुन्हा ईडीचं समन्स, आज हजर राहण्याचे निर्देश 
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला असून आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवलं आहे. संजय राऊत अधिवेशनासाठी दिल्लीत असल्यानं आज चौकशीला हजर राहणार का हे पाहावं लागेल.


राणा दाम्पत्याच्या संबंधित मुंबई पोलिसांच्या अर्जावर आज सुनावणी
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीनासाठी मुंबई पोलिसांच्या अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोघांनाही खार पोलिसांनी १५३(ए) अंतर्गत अटक केली होती. या प्रकरणात दोघांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अट घातली होती. परंतु पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जामीन अट पाळली नाही.


जीएसटीच्या वाढीविरोधात आज राष्ट्रवादीचे आंदोलन
केंद्र सरकारच्या अन्यायकारक जीएसटी वाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मुंबईत आंदोलन करण्यात येणार आहे. पाकिट बंद खाद्यपदार्थांवर केंद्र सरकारने पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये दही, लस्सी, तांदूळ, रवा यासारख्या दैनिदिन वस्तुंचा समावेश आहे. 


राज्यभर पावसाचा जोर कमी होणार
आज राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती आहे. काही ठिकाणी पूर ओसरला आहे. एकूणच पावसाचा जोर कमी झाला आहे. 


आज श्रीलंकेच्या नव्या राष्ट्रपतींची निवड होणार
रानिल विक्रमसिंघे, डल्लास अल्हाप्पेरुमा आणि अनुरा कुमारा दिसानायके या तिघांमध्ये राष्ट्रपती पदासाठी लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता निवडीची प्रक्रिया सुरु होईल. दुपारी 4 वाजेपर्यंत निकाल हाती येईल. महगाईविरोधातील जन आंदोलनानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळाले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.