Maharashtra Breaking News 17 May 2022 : मंत्र्याच्या बंगल्यांची बत्ती गुल, 15 मिनिटांपासून मंत्र्यांचे बंगले अंधारात

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 May 2022 09:37 PM
Dinkar Dabhade : जेष्ठ साहित्यीक आणि शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दिनकर दाभाडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

जेष्ठ साहित्यीक आणि शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष दिनकर दाभाडे (वय 66) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. आज सायंकाळी साडेसात वाजता जळगाव जामोद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  

Parbhani News Update : परभणीच्या सोनपेठ येथे अवैध वाळू साठ्यावर कारवाई, 6 हजार ब्रास वाळू जप्त

परभणी जिल्ह्यातील नद्यांमधून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरुय. सोनपेठ तालुक्यातील महातपुरी शिवारातील सर्व्हे नं 150/3 मध्ये अवैध साठा करून ठेवलेल्या अशाच एका वाळू धक्क्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांनी कारवाई केली. या कारवाईत 22 सक्शन पंप इंजिन, 10 हायवा, चार जेसीबीसह तब्बल सहा हजार ब्रास अवैध उपसा करण्यात आलेली वाळू असा साडे सहा कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.  

Aurangabad Airport: औरंगाबाद विमानतळ नामांतराच्या मुद्द्यावर सुभाष देसाईंनी घेतली ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट

शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यावरून शिवसेनाविरुद्ध भाजप, मनसे असा वाद पुन्हा सुरू झाला आहे. औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजीमहाराज करण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याचे चित्र आज दिसले. शिवसेना नेते , उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी विमानतळ नामांतराच्या मुद्द्यावर आज नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सुद्धा सोबत होते. 

Pune: पुण्यात विचित्र अपघात; हाईट बॅरियरमध्ये टेम्पो अडकला

पुण्यात नळ स्टॉप चौकाजवळ एक विचित्र अपघात घडला आहे. चौकातील हाईट बॅरियरमध्ये एक टेम्पो अडकून हा अपघात झाला आहे. कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी बघ्यांनी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. हाईट बॅरियर लावलं असतानादेखील टेम्पो चालकाने त्याचा टेम्पो  तसाच नेण्याचा प्रयत्न केला आणि हा विचित्र अपघात घडला आहे. यात टेम्पोच मात्र मोठं नुकसान झालं आहे .

Dapoli Police Station : अनिल परब रिसॉर्ट प्रकरणातील कागदपत्र सुरक्षित, पोलीस दलातील सूत्रांची 'एबीपी माझा'ला माहिती

परिवहन मंत्री अनिल परब  रिसॉर्ट प्रकरणातील सर्व कागदपत्रे सुरक्षित असल्याची  माहिती पोलीस दलातील सूत्रांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत कागदपत्रांबाबत शंका उपस्थित केली होती.

Sindhudurg News Update : सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या  

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आज सायंकाळी दोडामार्ग तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. मान्सूनची चाहूल लागल्याने शेतकरी आपली शेवटच्या टप्प्यातील कामे आवरून घेत आहेत. कोकणात 17 ते 19 या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दोडामार्ग तालुक्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मंत्र्याच्या बंगल्यांची बत्ती गुल, 15 मिनिटांपासून मंत्र्यांचे बंगले अंधारात

 मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्याची लाईट गेली आहे. मंत्रालयासमोर मंत्र्यांचे 16 बंगले आहेत. गेल्या 15 मिनिटांपासून मंत्र्यांचे बंगले अंधारात आहे.

Smriti Irani: स्मृती इराणी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुण्यात त्यानंतर त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांनी विरोधात पुण्यातील चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मृती इराणी पुण्यातील जे डब्ल्यू मॅरियटमध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Beed News Update : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेसह नवजात बालकाचा मृत्यू  

प्रसुती दरम्यान डॉक्टरने हलगर्जीपणा केल्यामुळे एका महिलेचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना बडी जिल्ह्यातील माजलगावच्या जाजू रुग्णालयात घडली आहे. याप्रकरणी जबाबदार असलेल्या डॉक्टर दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. 


बीडच्या माजलगाव येथील जाजू रूग्णालयात सोनाली गायकवाड या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रसूतीदरम्यान तिची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे तिचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला. या मृत्यूला जाजू हॉस्पिटलचे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला. 
याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी माजलगावच्या शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी डॉक्टर जाजू दाम्पत्याला अटक केली आहे. 

भाजप शिवसेनेला बदनाम करण्याचं काम करते : चंद्रकांत खैरे

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, भाजप सेनेचे 5 वर्ष सरकार होते. या काळात मी अनेकवेळा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिली. भागवत कराड मला अज्ञानी म्हणतात. यांना नगरसेवक मी केलं. यांना महापौर ही मी केलं. मग अज्ञानी लोकांकडून मोठे कसे झालात. ते पुढे म्हणाले, निवडणूक आली की भाजप आंदोलन करतात. शिवसेनाला बदनाम करण्याच काम करतात. लोकसभा निवडणुकीतही यांनी पाण्याचं आंदोलन केले. त्याचा काय परिणाम झाला.

शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील, असे निर्देश  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले आहे. 1 मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी 200 रुपये प्रति टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केतकी चितळेवर अंबाजोगाईतही गुन्हा दाखल
 राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल समाज माध्यमातून आक्षेपार्ह्य पोस्ट केल्याप्रकारणी अडचणीत आलेल्या केतकी चितळे हिच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात देखील गुन्हा नोंद करण्यात आला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी देखील चितळेवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

 

केतकी चितळे हिने फेसबुकवर शरद पवार यांच्याबद्दल फेसबुक आणि ट्वीटरवर   बदनामीकारक आणि मानहानी करणारी पोस्ट केली होती. तसेच, संत तुकाराम महाराज यांच्या नावाचा उल्लेख करून बदनामी केली होती. याचे संतप्त पडसाद राज्यभरात उमटले. सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी देखील याचा निषेध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन तिला अटक करण्यात आली. सध्या ती तुरुंगात असून १८ मे पर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही तिच्यावर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरु च आहे.  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांच्या तक्रारीवरून केतकीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी फार पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? सुप्रीम कोर्टाचा सवाल

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण; निर्णय 19 मे रोजी

संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पूर्ण; निर्णय 19 मे रोजी

दापोली पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीनंतर सोमय्यांचं सूचक ट्वीट, दापोली पोलीस ठाण्यात परबांच्या रिसॉर्टबाबतचे पुरावे होते, सोमय्यांचा आरोप

दापोली पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीनंतर सोमय्यांचं सूचक ट्विट, दापोली पोलीस ठाण्यात परबांच्या रिसॉर्टबाबतचे पुरावे होते, सोमय्यांचा आरोप
पुरावे सुरक्षित आहेत का? सोमय्यांचा पोलिसांना प्रश्न,  14  मे रोजी दापोली पोलीस ठाण्यात अग्नितांडव

चूक असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, मग राष्ट्रवादीचे पदाधिकारी असो किंवा भाजपचे पदाधिकारी - दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil LIVE : पुण्याच्या घटनेबाबत महिती घेत आहे. चूक कोणाची आहे ही बाब पडताळून घेत आहोत. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. मग राष्ट्रवादीचे पदाधिकारी असेल किंवा भाजपचे पदाधिकारी असतील.   पुण्यातील मनसे सभेला परवानगी नाकारण्याचं काहीच कारण नाही- दिलीप वळसे पाटील

Aurangabad News : औरंगाबादमध्ये पाणीप्रश्न पेटला, महिला आक्रमक, हंडा मोर्चा काढत सरकारविरोधात घोषणाबाजी

Aurangabad News : औरंगाबादमध्ये पाणीप्रश्न पेटला, महिला आक्रमक, हंडा मोर्चा काढत सरकारविरोधात घोषणाबाजी

शिवसेना खासदार संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकाचवेळी लेहमध्ये, संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अभ्यास दौऱ्यावर दोन्ही खासदार

शिवसेना खासदार संजय राऊत आणि  राणा दाम्पत्य एकाचवेळी लेहमध्ये, संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अभ्यास दौऱ्यावर दोन्ही खासदार


हनुमान चालीसा पठणानंतर झालेल्या गरमा-गरम वादानंतर काश्मीर च्या थंडगार वातावरणात तणाव निवळणार?


संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीचा अभ्यास दौरा, या समितीत महाराष्ट्रातून संजय राऊत, नवनीत राणा आणि प्रकाश जावडेकर यांचा समावेश आहे


समितीच्या अभ्यास दौऱ्यामध्ये खासदारांना कुटुंबातल्या एका सदस्याला नेण्याचीही मुभा, नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे देखील दौऱ्यावर सोबत आहेत

फेब्रुवारी 2024 मध्ये अयोध्येत रामललाची प्रतिष्ठापना होणार, भाविकांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार

फेब्रुवारी 2024 मध्ये अयोध्येत रामललाची प्रतिष्ठापना होणार, भाविकांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार

बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे मुर्दाबाद तर देवेंद्र फडणवीस गो बॅकच्या घोषणा 

 बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे मुर्दाबाद अणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गो बॅक च्या घोषणा बदलापूर पाश्चिम पोलिस ठाण्या बाहेर देण्यात आल्या. इथे सोनिवली भागात उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उद्घाटन तसेच   ग्रंथालय, भिक्खू निवास अणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रम विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडले. मात्र या भूमिपूजन अणि उद्घाटनाला काही आंबेडकर अनुयायांनी विरोध केला होता. ही शासकीय जागा असून शासकीय कार्यक्रम न होता भाजप आमदारांनी खाजगी कार्यक्रम घेतला. दरम्यान या कार्यक्रमात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन याला विरोध करणार्‍या काहींना बदलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांनी भाजप आमदार किसन कथोरे अणि फडणवीस यांच्या  विरोधात घोषणाबाजी केली.

उल्हासनगरमध्ये विधवा महिलेवर कारखान्यात घुसून कैचीने वार, हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट

कारखान्यात घुसून एका विधवा महिलेवर कैचीने वार करून जखमी केल्याची घटना उल्हासनगर शहरात घडलीय, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असून या महिलेवर सद्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कॅम्प नंबर ५ च्या गाऊन मार्केट परिसरात आज सकाळच्या सुमारास ही घटना घडलीय. ही महिला गाऊन मशीनवर काम करत असतांना अचानक दयानंद फुगारे या व्यक्तीने कैचीने या महिलेच्या पाठीवर वार केले, यात ही महिला जखमी होऊन खाली पडली. याठिकाणी कामगारांनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहे.

Dhule News : धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपे यांचा महापौरपदाचा राजीनामा

धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपे यांनी काल संध्याकाळी आपल्या महापौर पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत उर्वरित कालावधीचा आपण राजीनामा देत असल्याचे करपे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. धुळे महानगरपालिका आयुक्त व नगर सचिवांकडे हा राजीनामा त्यांनी सुपूर्द केला आहे.


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून आज आज या याचिकेवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे, धुळ्यातील महापौर पदाच्या निवडणुकीत ट्रिपल टेस्टचे पालन केले नाही म्हणून न्यायालयात याचिका दाखल आहे. यावरून न्यायालयाचा आदर करत महापौर प्रदीप कर्पे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

नाशिकच्या सिन्नरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, कुत्र्यांच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा जखमी

Nashik News : सिन्नरमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून कुत्र्यांच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. सिन्नरमधील सार्वजनिक वाचनालय परिसरातून हा मुलगा घरी परतत असताना चार पाच कुत्र्यांनी त्याला घेरलं. बिथरलेला मुलगा खाली पडला, स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र कुत्र्यांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अखेर आजूबाजूचे नागरिक गोळा झाल्याने कुत्र्यांनी पळ काढला. ही संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नगरपरिषदेन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप करपे यांचा राजीनामा

Dhule News : धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपे यांनी काल (16 मे) संध्याकाळी पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत उर्वरित कालावधीचा आपण राजीनामा देत असल्याचे करपे यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे. धुळे महानगरपालिका आयुक्त आणि नगर सचिवांकडे हा राजीनामा त्यांनी सुपूर्द केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल असून आज या याचिकेवर अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. धुळ्यातील महापौरपदाच्या निवडणुकीत ट्रिपल टेस्टचे पालन केलं नाही म्हणून न्यायालयात याचिका दाखल आहे. यावरुन न्यायालयाचा आदर करत महापौर प्रदीप कर्पे यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, नऊ गंभीर जखमी

Dhule News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रात्री बाराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे शहराजवळील फॅमिली ढाब्याजवळ मित्रानगर परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. मालेगाववरुन कांदा घेऊन मध्य प्रदेशला जाणाऱ्या भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या अॅपेरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघाता दरम्यानच क्रूझर वाहन या अपघातग्रस्त प्लॉट आणि रिक्षाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात क्रुझर आणि रिक्षाचा चक्काचूर झाला असून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर नऊ जण जखमी झाले आहेत. जखमी हे पारोळा तालुक्यातील तरडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात असून या अपघातात महेंद्र पाटील सरलाबाई सोनवणे आणि रिक्षाचालक रहीस शेख यांचा मृत्यू झाला.

हिंगोलीत बदनामीच्या भीतीने मुलीने विष प्राशन केले, मुलाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

Hingoli News : बदनामीच्या भीतीने आणि मुलाच्या एकतर्फी प्रेमातून मुलीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना हिंगोलीत घडली आहे. हिंगोली जिल्ह्यातील विशाल पवार हा आरोपी अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडला. गेल्या दोन वर्षापासून शाळेत जात असताना तिला पाठलाग करत होता, मात्र मुलाचं एकतर्फी प्रेम होतं. मुलगा मुलीला वारंवार त्रास देत असे. काही दिवसांपूर्वी मुलगा मुलीच्या घरात शिरला आणि आपण लग्न करु आणि पळून जाऊ, असे म्हणाला. परंतु या लग्नाला मुलीचा विरोध होता. या प्रकारामुळे आपली बदनामी होईल या भीतीने मुलीने रविवारी विषारी औषध पिऊन आत्महत्या करायचा प्रयत्न केला. दरम्यान मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरुन बासंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Khed News : मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खेड तालुक्यातील मौजे भडगांव ते भरणा बाईतवाडी, बौद्धवाडी येथे मंजूर साकव हा मागासवर्गीयांसाठी न बांधता स्वतः इमारतीसाठी जाण्यासाठी या जागेचा वापर केला. पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करताना निधी लाटत शासनाची दिशाभूल आणि प्रशासकीय मान्यतेच्या अटी तसेच शर्ती भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर खेड नगरपरिषदेतही पदाचा गैरवापर करुन शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलेले आहे, अशी माहिती तालुका शिवसेनेचे सचिव सचिन धाडावे यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली.

 
राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण प्रकरणी भाजपच्या तीन जणांवर गुन्हा दाखल

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण प्रकरणी भाजपच्या तीन जणांवर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरा डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रमोद कोंढरे, भस्मराज तिकोणे आणि मयूर गांधी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.त्यांच्यावर कलम 354, 323, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (16 मे) बालगंधर्व रंगमंदिरात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात वैशाली नागवडे यांना मारहाण झाली होती. 

निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता गाभाऱ्यात सुवर्ण पटावर लिहिलेल्या पसायदान आणि गुरुस्तवनाचेही दर्शन घडणार

Nashik News : संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवनी समाधीला 725 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. भागवत धर्माची पताका उंचावणाऱ्या निवृत्ती नाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता गाभाऱ्यात सुवर्ण पटावर लिहिलेल्या पसायदान आणि गुरुस्तवनाचेही दर्शन घडणार आहे. अळंदी येथील चक्रांकित महाराजांचे  सुपुत्र अवधूत चक्रांकित यांच्या संकल्पनेतून सुवर्णाक्षरात पसायदान लिहिण्यात आले आहे. सुवर्णाचा क्षय होत नाही त्यामुळे सुवर्ण धातूचा वापर करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर माऊली यांनी विश्व कल्याणासाठी पसायदान लिहिले त्याचवेळी आपले गुरु वडील बंधू निवृत्तीनाथ याना डोळ्यासमोर ठेवून गुरुस्तवन लिहिले त्यामुळे हा अमूल्य ठेवा सुवर्णाक्षरात लिहिण्यात आल्याचं अवधूत चक्रांकित यांनी एबीपी माझाला सांगितलं.

Loudspeaker Controversy : भोंग्यांबाबतच्या नियमांची पोलिसांकडून कटाक्षानं अंमलबजावणी, काय झाला बदल?

Loudspeaker Controversy : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांचं राजकारण पाहायला मिळालं. भोंग्यांवरुन राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. पण त्यानंतर पोलीस प्रशासनाकडूनही भोंग्यांबाबतच्या सर्वोच्च न्ययालयाच्या नियमांची कटाक्षानं अंमलबजवणी केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर सभेत बोलताना मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. तसेच, मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न धार्मिक नाहीतर, सामाजिक असल्याचं सांगत, सरकारला 4 मे पर्यंतचं अल्टिमेटम दिलं होतं. त्यानंतर मात्र ज्या मशिदींवरील भोंग्यांवर मोठ्यानं अजान होईल, त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा मोठ्या लावू, असा इशारा दिला होता. 


सर्वोच्च न्ययालयाच्या नियमानुसार, सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेतच लाऊडस्पिकरच्या वापरास परवानगी असल्यानं, त्याची आता पोलिसांकडून कटाक्षानं अंमलबजवणी केली जात आहे. यावेळे व्यतिरिक्त लाऊडस्पिकर लावणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. मुंबई पोलीस रात्री 10 नंतर शहरात ध्वनी प्रदुषण होऊ नये, यासाठी सर्वत्र करडी नजर ठेवून आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Accident News : रायगड : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीनजीक अपघात

Accident News : रायगड : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीनजीक अपघात झाला असून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली ही घटना आहे. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. पहाटे 5.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. 

LIC IPO : एलआयसीचा आयपीओ आज शेअर बाजारात

LIC IPO : देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठा आयपीओ असलेल्या एलआयसी आयपीओ आज स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे. अनेक गुंतवणूकदारांनी पहिल्यांदाच शेअर बाजारात एलआयसीच्या आयपीओपासून श्रीगणेशा केलाय. एलआयसीच्या आयपीओला तिप्पट सबस्क्रिप्शन मिळाले. मात्र, एलआयसीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये सवलतीच्या दरात व्यवहार करतायत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Mumbai BMC News : मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांची डेडलाईन जारी

Mumbai BMC News : पावसाळा तोंडावर आला असतांना मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी नालेसफाईची डेडलाईन नव्यानं जाहीर केली आहे. येत्या 25 तारखेपर्यंत मुंबईतली मान्सूनपूर्व नालेसफाई पूर्ण होईल अशी प्रशासनाला खात्री आहे. मुंबईत सध्या पश्चिम उपनगरांत 68 टक्के, पूर्व उपनगरात 62, शहर भागात 40 टक्के, मिठी नदीची 89 टक्के आणि छोटे नाले 74 टक्के नालेसफाई झाली आहे.

Maharashtra Election : महाराष्ट्रातील निवडणुकांसदर्भात आज महत्वाचा फैसला

Maharashtra Election Latest Updates : महाराष्ट्रातल्या निवडणुका (Maharashtra Mahanagarpalika ZP Election) नेमक्या कधी होणार याबाबत महत्वाचा फैसला आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने 13 तारखेला आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली होती.  त्यावर सुनावणीसाठी कोर्टानं 17 मे रोजीची दुपारी 2 वाजताची वेळ निश्चित केली आहे. आयोगाकडून महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्‍टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का? याचे उत्तर आज कळणार आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Assam Flood : आसाममध्ये पावसानं हाहाकार; 20 जिल्हे पाण्याखाली

Assam Flood : उत्तर भारतात सातत्यानं उष्णतेच्या झळा वाढताना दिसत आहेत. संपूर्ण उत्तर भारत उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. पण आसाममध्ये मात्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममध्ये सातत्यानं कोसळणाऱ्या पावसामुळे पूर आला असून भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आसामच्या 20 जिल्ह्यांमध्ये जवळपास 2 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. सोमवारी प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, दिमा हासाओ (Dima Hasao) जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात भूस्खलनामुळे रेल्वे आणि रस्ते संपर्क तुटल्यानं त्याचा उर्वरित राज्याशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राज्यातील निवडणुका कधी याचा आज फैसला
राज्यात निवडणुका नेमक्या कधी होणारं आहेत याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. कोर्टानं याबाबात सुनावणीसाठी दुपारी दोन वाजताची वेळ निश्चित केली आहे. कोर्टाच्या निकालानंतर निवडणुका पावसाळ्यानंतर होणार की त्याच्या आधी घेण्यात येणार याबाबतस्पष्टता येणार आहे. 


ओबीसी आरक्षणामुळे स्थगित करण्यात आलेल्या निवडणुकीची प्रक्रिया ही चार आठवड्यात जाहीर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्यावर राज्यातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या असं राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात विनंती केली होती. आता निवडणूक आयोगाची ही मागणी मान्य होणार का यावर राज्यातल्या निवडणुकांचं भविष्य ठरणार आहे. 


मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांची डेडलाईन जारी
पावसाळा तोंडावर आला असतांना मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी नालेसफाईची डेडलाईन नव्यानं जाहीर केली आहे. येत्या 25 तारखेपर्यंत मुंबईतली मान्सूनपूर्व नालेसफाई पूर्ण होईल अशी प्रशासनाला खात्री आहे. मुंबईत सध्या पश्चिम उपनगरांत 68 टक्के, पूर्व उपनगरात 62, शहर भागात 40 टक्के, मिठी नदीची 89 टक्के आणि छोटे नाले 74 टक्के नालेसफाई झाली आहे.


एलआयसीचा आयपीओ आज शेअर बाजारात
देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठा आयपीओ असलेल्या एलआयसी आयपीओ आज स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होणार आहे. अनेक गुंतवणूकदारांनी पहिल्यांदाच शेअर बाजारात एलआयसीच्या आयपीओपासून श्रीगणेशा केलाय. एलआयसीच्या आयपीओला तिप्पट सबस्क्रिप्शन मिळाले. मात्र, एलआयसीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये सवलतीच्या दरात व्यवहार करतायत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.


दोन युध्दनौका नौदलाच्या ताफ्यात 
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत आज दोन युद्धनौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. माझगाव डॉक परिसरात होणाऱ्या कार्यक्रमातून 'ब्लू वॉर नेव्ही' म्हणून ओळख असलेल्या भारतीय नौदलाचं सागरी सामर्थ आणखीन वाढणार आहे. 


ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल आज न्यायालयात सादर होणार
14 मेपासून सुरू असलेले ज्ञानवापी मशिदीमधील सर्वेक्षणाचे काम संपले आहे. आज, 17 मे रोजी या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विविध पक्षांकडून सर्व प्रकारचे मोठे दावे केले जात आहेत. ज्यामध्ये हिंदू पक्षाने असा दावा केला आहे की, मशिदीत सर्वेक्षण करताना 12 फूट 8 इंच  शिवलिंग सापडले आहे. ज्यानंतर हिंदू पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे. आता शिवलिंग मिळण्याच्या दाव्याबाबत हिंदू पक्ष कोर्टात पोहोचला आहे. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ते ठिकाण तात्काळ सील करावे, तसेच त्या ठिकाणी कोणाच्याही प्रवेशावर बंदी घालण्यात यावी असे आदेश न्यायालयाने दिले. दुसरीकडे, न्यायालयात अहवाल सादर होईपर्यंत मशिदीतील वाजुखानाचे जतन करण्याची तयारी हिंदू पक्षाने केली आहे.


मुंबई वॉर्ड रचनेसंबंधी काँग्रेसची बैठक
मुंबईतील नवीन वार्ड पुर्नरचना ही शिवसेनेच्या फायद्याची असल्याचा आरोप काँग्रेसमधील काही नेत्यांचा आहे. त्यावरून शिवसेनेवर काँग्रेसची नाराजी आहे. संपूर्ण मुंबईत जवळपास 45-50 वॉर्डमध्ये शिवसेनाला फायदा होईल अशाप्रकारे बदल केले आहेत अशी राजकीय वर्तृळात चर्चा आहे. यांपैकी 17 ते 18 वॉर्डमधील बदलांचा थेट फटका काँग्रेसला बसेल अशी स्थिती आहे. यासंबंधी आज मुंबई काँग्रेसच्या नेत्यांची पक्षांतर्गत बैठक होणार आहे. 


मनसे नेते संदिप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी 
मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने आक्रमक भूमिका स्वीकारल्यानंतर शिवतीर्थाबाहेर मनसे नेते संदीप देशपांडे यांची मुंबई पोलिसांशी झालेल्या झटापटीत महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. त्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतष धुरी या दोघांनीही मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर आज सुनावणी निश्चित होणार आहे. हे दोघेही घटनेच्या दिवसापासून फरार आहेत. 


भाजप आ. जयकुमार गोरे यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी
भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या अटकपूर्व जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. एका मृत व्यक्तीच्या नावे बोगस कागदपत्रं तयार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्याकडे तूर्तास अटकेपासून कोणतंही संरक्षण नाही.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.