Beed News : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर (पाटोदा) येथे उघडकीस आला आहे. चक्क महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आम्हाला न्याय मिळाला नाहीतर आत्मदहन करण्याचा इशारा देखील महिला सरपंचाने दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे त्याच गावच्या माजी सरपंचाने एक लाखांची खंडणी मागितली. सरपंच मंगल राम मामडगे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनंतर माजी सरपंच, एक सदस्य तसेच उपसरपंचाचा पती या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विविध कारणे सांगून विकासकामांमध्ये अडथळे सातत्याने आणत होते, खोट्या तक्रारी सुद्धा दाखल करत होते. दुरुस्तीसाठी आलेल्या चार लाखांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली होती, अशी तक्रार सरपंच मामडगे यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
माजी सरपंचाकडून वारंवार खंडणीची मागणी
आता महिला सरपंच मंगल मामडगे यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. त्यांनी म्हटलंय की, आम्हाला कुठलेच काम करू दिले जात नाही. माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख, ज्ञानोबा देशमुख हे सातत्याने आमच्याकडे खंडणी मागतात. पैसे दिले तर तुला काम करू देणार, नाहीतर काम करू देणार नाही, अशी धमकी देतात. 11 जानेवारीला माझ्या मुलाला सायंकाळी पाच वाजता यांनी घरी बोलवून घेतले, त्याला दम दिला. तुझ्या आईला सांग, अर्धवट कामांवर सह्या करा, नाहीतर तुझ्या आईला जेलमध्ये घालू असे धमकवले. आम्हाला सह्या दिल्या नाही तर तुमच्या घराची इज्जत घालवू, तुझी आई कशी जगते ते बघू, असे म्हटले. माझ्या मुलाने घरी येऊन मला सांगितले की, तू राजीनामा देऊन टाक. आपल्या घराला धोका आहे. मी त्याला विचारलं काय झालं तर तो बोलला माजी सरपंचाने मला घरी बोलावून धमकावले, असे मंगल मामडगे यांनी म्हटले आहे.
नाहीतर आम्ही आत्मदहन करणार
तसेच शाळेच्या कामासाठी चार लाखाचा निधी आला आहे, त्यातील एक लाख रुपये द्या, अशी खंडणी माजी सरपंचाने मागितल्याचे देखील त्यांनी सांगितले. आम्हाला कुठल्याही परिस्थितीत न्याय द्या, नाहीतर आम्ही आत्मदहन करणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तर माझ्या मुलाने यांना कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप देखील मंगल मामडगे यांनी केलाय. आता या प्रकरणावर प्रशासन नेमकी काय कारवाई करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा