Maharashtra Breaking News 06 July 2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या शेगाव दौऱ्यावर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
गुजरात विधानसभेसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला एक एक मंत्री आणि काँग्रेसचा ज्येष्ठ नेता प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आला आहे
महाराष्ट्रातल्या यशोमती ठाकूर सुनील केदार नितीन राऊत या तिघांवर गुजरातमध्ये जबाबदारी
यशोमती ठाकूर यांच्याकडे बडोदा, सुनील केदार यांच्याकडे नवसारी तर नितीन राऊत यांच्याकडे वलसाड लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी
मुंबईत शिवसेनेलाही संघटनात्मक पातळीवर खिंडार, पदाधिकाऱ्यांचे राजीनामास्त्र
मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
२ शाखाप्रमुख, ३ शाखा संघटकांचा राजीनामा
प्रकाश पुजारी, कौस्तुभ मामुणकर ह्या शाखाप्रमुखांचा राजीनामा
महिला संघटक सुषमा गायकवाड, विद्या पोतदार, हेमलता नायडू यांचा राजीनामा
आमदार प्रकाश सुर्वे यांना पाठिंबा देत राजीनामास्त्र
एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल डोंबिवलीत शिंदे समर्थकानी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला .गणेश मंदिर येथे मुख्यमंत्र्यांची पुढील कारकीर्द यशस्वी होण्यासाठी साकडे घालण्यात आले .ढोल ताशे , बँजो ,फटाक्यांची आतिषबाजीत डोंबिवली फडके रोड ते इंदिरा चौक दरम्यान भव्य रॅली काढण्यात आली होती. विशेष म्हणजे या रॅलीत डोंबिवलीतील शिवसेनेचे १२ ते १५ माजी नगरसेवक ,पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता .या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते .यावेळी नगरसेवक पदाधिकऱ्यांनी ढोल ताशा बँजो च्या ठेक्यावर डान्स करत आनंद व्यक्त केला .या रॅली च्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळालं .जोरदार पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्री पद लाभले असून एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल डोंबिवलीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला असून डोंबिवली मधील शिवसैनिक आम्ही एकनाथ शिंदे सोबत असल्याचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पालघर : आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत असल्याचं प्रकार पुढे येत असून विक्रमगड तालुक्यातील आश्रमशाळा साखरे येथील 12 वीत शिकणाऱ्या विध्यार्थीनीने आज दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत विक्रमगड पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे. शासकीय आश्रमशाळा साखरे येथे खुडेद (कुडाचा पाडा) येथील इयत्ता 12 वी मध्ये शिकणाऱ्या विध्यार्थीनीने आश्रमशाळेतील वसतिगृहात आज 12 ते 3 च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.
राज्यपाल भगतसिंह कोशारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या सायंकाळी 4.00 वाजता शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत.
डायलॉगमागे काही राजकारण नव्हते.. तो कसा व्हायरल झाला हे माहित नाही. पण त्या डायलॉगमुळेच आज मी इथे आहे. सगळे आमदार फोन करत होते, त्यामुळे मलाही फोन करु वाटला. बायकोला फोन केला. पण फोन बंद होता. मग मी रफिक नावाच्या कार्यकर्त्याला फोन केला. त्याच्यासोबत बोलताना ओघानं हा डायलॉग निघाला. माझी रुम प्रशस्त होती. डोंगर-झाडी दिसत होती. त्याच्यासोबत बोलताना ओघानं हा डायलॉग निघाला. ठरवून काही केले नाही.
हे ग्रामीण भागात कुठेही झाले नाही... मुंबईमध्ये झाले फक्त. सुर्वे यांच्या इथे झाल्यानंतर आम्ही गोळा झालो होतो. त्यावेळी ते जाऊ दया म्हणाले. इथून गेलो की दोन तासांत सगळे रान भरुन काढतो. हे माझेच चेले आहेत. पाया पडत येतील, असे शहाजीबापू म्हणाले. काही जणांची दु:ख वेगळी होती. यामिनी जाधव यांना कॅन्सर आहे. त्या म्हणाल्या की, मला कॅन्सर आहे. मला कुणाचा फोन नाही. कोण भेटायला नाही. जिव्हाळाच नाही, तर यांच्यापाशी का राहू?
मला सभागृहातच बोलायचं होतं. पण संधी मिळाली नाही. आता इथं सांगतो. फूटबॉलपटू मॅराडोना यांनी ज्यावेळी फूटबॉल खेळायचं सोडलं तेव्हा जागतिक स्पर्धा झाली होती. त्यामधील मॅराडोना याने केलेला गोल, आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे. त्याने कसा गोल केला हे कुणालाच नाही समजले. मॅराडोना गेला कसा, आला कसा अन् वळला कसा अन् गोल केला कसा... हे कुणालाच नाही कळलं. एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील राजकारणातील मॅराडोना आहेत.
बंडखोरीचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांनी करावं, असं आमचं म्हणने होते. मग हो नाही.. हो म्हणत त्यांनी अखेर निर्णय घेतला. ज्यावेळी आपण युद्धाला जातो, तेव्हा घरी काय होतेय हे पाहतो का? ही लोकशाही लढाई आहे. आपण पडलो तरी घराकडे जाते अन् जिंकलो तरीही घराकडेच जातो. आम्ही जिंकायचं म्हणूनच गेलो होते. अन् आम्ही जिंकलो.
सूरतला मी आणि शंभूराजे पहिल्यांदा पोहचलो होतो. तुम्ही बंडखोरी करणाऱ्या कोणत्याही आमदारांना विचारा... पण बंडखोरीची ठिणगी नेमकी कुठे सुरु झाली? शिवसेनच्या वर्धापन दिन होता.. हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. आम्ही सर्व आमदार बसलो होतो.. स्टेजवर मान्यवरांच्या खुर्च्या होत्या. संजय राऊतांचे भाषण सुरु होते. तेवढ्यात उद्धव ठाकरे आले. त्यांनी सर्वांना नमस्कार वैगरे केला. त्यावेळी ते दोन मिनिटांसाठी बाहेर जाणार होते.. ते बाहेर जात होते. तेव्हा संजय राऊतांचे भाषण सुरु होते. ते त्यांच्याकडे पाहून म्हणाले की, बाजीप्रभूंना सोडून गेल्यासारखं तुम्ही आम्हला सोडून चाललात का? हे वाक्य मला खटकलं. याचा गर्भीत अर्थ कसाय पाहा तुम्हीच... म्हणजे बाजीप्रभूंना सोडून शिवराय गेले.. येथे तुम्ही शिवाजी महाराजांचा अवमान करताय.. ज्याने बलिदान दिलेय त्या महापराक्रमी बाजीप्रभू यांचाही अवमान तुम्ही करताय.... त्यानंतर उद्धव ठाकरे जाऊन माघारी आले.. त्यांचं भाषण सुरु झालं. ते रागाने बोलायला लागले.. एवढा चांगला दिवस असताना ते रागाने बोलायला लागले. मला माहितेय... कोण बाजारात दूध विकतेय.. जे गद्दार आहेत. त्यांना पुन्हा शिवसेनेत स्थान नाही. बाहेर आल्यानंतर आम्ही विचारतच पडलो..
या कार्यक्रमात शिंदे साहेबांना लांब बसवले होते. आदित्य ठाकरेंना जवळ बसवले होते. एकनाथ शिंदे गटनेते आहेत. ते आमचे नेते.. नेमानं उद्धव ठाकरे यांच्याशेजारी शिंदे यांना बसवायला हवं होतं. पण त्यांना सर्वात कोपऱ्यात बसवले होते. बाहेर आल्यानंतर आम्ही शिंदे साहेबांना सरळ म्हटले.. साहेब घडतेय का पाहा? नाहीतर पक्ष सोडयाला बरा... आम्हाला खूप वाटा आहेत. आम्हाला हे नवे नाही... अनं खरे तेथूनच सुरुवात झाली. सर्व आमदार शिंदेसाहेबांना विचारत होते. तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. हे बरोबर नाही... पुढचं काही खरे नाही. अन् शिवसेनेतील बंडखोरीला तेथूनच सुरुवात झाली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माझा कट्ट्यावर बंडखोर आमदारांना वैयक्तिक मोठा आर्थिक लाभ झाल्याचा आरोप केला होता. या प्रश्नाच्या उत्तरावर बोलताना शहाजीबापू यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, हा एक राजकारणाचा भाग आहे. आम्ही गेल्यानंतर माघारी येणार नाही, हे समजल्यानंतर आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. सुडाचं राजकारण सुरु झालं. यांना पैसे मिळाले, घबाड मिळाले, असे आरोप करण्यात आले. 1974 पासून आतापर्यंत राजकारणात इतक्या खालच्या दर्जाची भाषा कधीच आली नव्हती. संजय राऊत यांनी भाषेची मर्यादा ओलांडली. अलिबागच्या भाषणात त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. एका बाजूला तुम्ही परत बोलवता अन् दुसऱ्या बाजूला प्रेत येतील म्हणून धमक्या दिल्या जातात. असे असताना निर्णय काय घ्यायचा?
157 कोटी रुपयांचा निधीचा आकडा अजित पवार आणि जयंत पाटील यांनी जाहीर केला. पण मी आतापर्यंत 300 कोटी रुपयांपर्यंत निधी नेहलाय. पण मंत्री असून या दोघांनाही माहित नाही. मला मिळालेल्या निधीचा प्रश्न नाही.. पण आतापर्यंत बारामतीचा निधी 1500 कोटी रुपयांचा झालाय. साडेसातशे कोटी रुपयांचा निधी झालाय रोहित पवारांचा... जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांचा निधी किती आहे? मग ही तफावत कशासाठी.. निधीचं समान वाटप का नाही झाले? सर्वांना निधी मिळाला पाहिजे... विरोधकांनाही निधी मिळालाय हवा. निधीचं समान वाटप व्हायला हवं. भाजपला निधी कमी दिला जात होता. इतकेच नाही तर सत्तेत असूनही शिवसेनाला निधी पुरेसा दिला जात नव्हता.. राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहजासहजी निधी मिळत होता. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मी उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट सांगितली.
शिवसेनेतील बंडाची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असताना झाली होती. कुणालाही हे आवडले नव्हते.. तिथे कुठलेही स्वातंत्र नव्हते. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर घराकडे जाईपर्यंत फोन आला. त्यानंतर इकडून तिकडे नेहण्यात आले. कोण काही बोलत नव्हते... उद्धव ठाकरे संध्याकाळी येणार.. त्यानंतर आमदारांपुढे त्यांचं भाषण व्हायचे. पाचसहा मिनिटांत ते पुन्हा जायचे. हे नेमकं काय घडतेय... याबद्दल आम्ही तडपडायचो. ज्यांच्याविरोधात लढलो, तीच माणसे आता आपल्यासोबत सत्तेत..आता आपली कामं कशी होणार? अशी सगळीच काळजी होती. माझ्यामते शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 50 आमदारांना हे आवडले नव्हते, असे शहाजीबापू यांनी माझा कट्टयावर स्पष्टच सांगितले.
आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून शिवसेनेत आलो होते. आता जर त्यांचे मंत्री झाले तर रागात आपली कामे करणार नाहीत. आपलं वाटोळं करुन टाकणार, असे मला वाटले. अशीच भिती इतरांनाही होती, असे शहाजीबापू म्हणाले.
सांगोला हा शिवसेनेचा नाही. 2009 मध्ये सांगोल्यात शिवेसेनेला 1600 मते होती. मी 2013 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मला अनेकांनी पक्ष चुकला म्हणून सांगितलं. आबासाहेबांनीही मला पक्ष चुकल्याचं सांगितलं. त्यावेळी आबांना सांगितलं की, माझा पक्ष चुकला नाही. हे मी निश्चित सिद्ध करुन दाखवीन. शिवसेनेत मी स्वार्थाने, राजकारणासाठी अथवा आमदार होण्यासाठी आलो नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाले. हे मी बातम्यात पाहत होते. त्यांची अंत्ययात्रा निघाली.. तुफान गर्दी होती. त्यावेळी त्यांच्या बाळासाहेबांच्या प्रेताला अग्नी देताना उद्धव ठाकरे यांना पाहिलं अन् माझ्या डोळ्यात अश्रू आले. हा प्रसंग सोडल्याशिवाय मी जिवनात कधीच रडलो नाही... आई-वडिलांच्या निधनानंतरही माझ्या डोळ्यातून अश्रू आले नव्हते... पण त्या दिवशी मी रडलो. बायकोलाही आश्चर्य वाटले... तेव्हाच मी बायकोला सांगितलं मी शिवसेनाचा आमदार होणार... त्यानंतर मी शिवसेनेत प्रवेश केला.
राजकीय जिवनाचा प्रवास बालपणात झाला. तिसरीमध्ये असताना तानाजी मालुसरे यांच्या सिंहगडावरील स्वारीवर भाषण केले. मला लिहून दिलेलं.. मी न वाचता... मला जे माहित आहे, जे मी वाचलेय... त्यानुसार मी भाषण केले. त्यावर टाळ्याचा कडकडाट झाला. या भाषणानंतर गुरुजींनी मला वक्ता होऊ शकतो, असे सांगितलं. त्यानंतर वाचन सुरु झालं. सातवीमध्ये असताना महात्मा गांधी यांच्यावर भाषण केले. याला सोलापूर जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळाला. तेथून काँग्रेसबद्दलची आपुलकी वाढत गेली. कराडला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या महाविद्यालयात शिकायला गेतो. तेथून काँग्रेसचे संस्कार माझ्यावर पडले. त्यानंतर भाऊसाहेब पालकर यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. त्यावेळी काँग्रेसचा माहोल होता..त्यातून काँग्रेससाठी काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसमध्ये आलो. त्यानंतर मी काही काळानंतर शिवसेनेत प्रवेश केला.
1990 पासून सात निवडणूका झाल्या. सर्व अटीतटीच्या झाल्या. सहा मिहिने आम्ही दोघेही तयारी करत होतो. प्रत्येक गावात दिवसरात्र काम केले. पण या सातवर्षात आमच्या तालुक्यात एकही केस झाली नाही. हा माझा आणि आबासाहेबांमधील (गणपतरावजी देशमुख ) सुसंवाद होता. निवडणूक हरल्यानंतर मी त्यांचे आशिर्वाद घ्यायचो. अभिनंदन करायचो. ते माझ्या पाटीवरुन थाप टाकायचे, अन् म्हणायचे थांबायचं नाही, पुढे चालायचे..निराश होऊ नका. मला जाताना काही वाटयचं नाही.. पण गाव जवळ आल्यावर मला भिती वाटायची. कारण, घरी गेल्यावर बायकोचं रडण, ओरडं-आरडे अन् राडा वैगरे या गोष्टी मनात यायच्या. याला कसं सामोरं जायचं... याची भिती वाटायची. 'याला उभं राहायला कुणी सांगितलं. सारखं उभा राहतेय, सारखं पडतेय.. आमचा आपमान करतेय... असे बायको म्हणायची..' मग तिची कशीतरी समजूत काढायची. अन् वेळ मारुन न्यायचो, असे शाहजीबापू म्हणाले.
डाव्या विचारसरणीचे गणपतरावजी देशमुख यांनी 11 वेळा आमदाराकीची निवडणूक जिंकली. 11 वेळा निवडणूक जिंकल्यामुळे ते प्रसिद्ध झाले होते. मी सात वेळा निवडणूक लढलो... पाच वेळा पडलो.. माझाही रेकॉर्ड सांगा.. असे मी म्हटलो होतो, असे शहाजीबापू म्हणाले.
Nanded News : नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह समोर असलेल्या देवगिरीच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीमध्ये क्लासेस चालकाच्या भावाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय.सदर घटना आज दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आलीय.दरम्यान मोठी कसरत करत अग्निशामन दलाच्या जवानांनी हा मृतदेह बाहेर काढलाय. तर या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झालीय.शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या देवगिरी विश्रामगृहाला लागूनच एका विहिरीमध्ये हा मृतदेह आढळून आलाय. ही माहिती महानगरपालिकेच्या पथकांना मिळाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी रईस पाशा व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोपवेद्वारे मृतदेह बाहेर काढला असून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे पाठविण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळं डहाणू तालुक्यातील पळे बोरीपाडा येथील जि.प शाळेची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. रात्री ही घटना घडल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेच्या इमारती या नादुरुस्त झालेल्या पाहायला मिळतात. परंतु अशा इमारतींकडे संबधित प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
Aurangabad News: इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेल्या एका चारचाकी गाडीने पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. कर्मचारी गाडीत पेट्रोल टाकणार तेच कारच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. पट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच खबरदारी घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. ही घटना फुलंब्री तालुक्यातील पालफाटा येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. तर हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जोराचा पाऊस झाला आहे. मूल तालुक्यातील राजोली गावात लोकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी शिरले आहे. ग्रामपंचायतीच्या चुकीचा नियोजनामुळं घरात पावसाचे पाणी घुसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. राजोली गावात आज सकाळी या मौसमातील पहिलाच जोरदार पाऊस झाला. शेकडो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
मुंबईतील दादरमधील हिंदू कॉलनी परिसरात 0.5 फुटापर्यंत पाणी साचल्यानं वाहतुकीची गती मंदावली आहे.
पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळ्यातील भुशी धरण अखेर ओव्हर फ्लो झाल आहे. धरणाच्या पायऱ्यांवरुन पाणी आता ओसंडून वाहू लागलं आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने तुफान बॅटिंग केली आणि 250 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रस्थान असलेलं भुशी धरण तुडुंब भरलं आहे. आता पायऱ्यावरून ओसंडून वाहणार धरण पर्यटकांना आकर्षित करत आहे.
उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर शहरातील 10 जणांना धमक्या आल्या आहेत. धमक्या देणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सिटी कोतवाली पोलिसांकडून चौघांची चौकशी सुरु आहे.
Nashik News : नाशिकच्या येवला तालुक्यात एका अफगाणी युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेय. येवला तालुक्यातील चिंचोडी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती असं या अफगाणी नागरिकाचं नाव आहे. हत्येनंतर चार अज्ञात इसमांनी चारचाकी गाडीतून पळ काढलाय. सय्यद जरीब चिस्ती हा अफगाण धर्मगुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणि आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.
LPG Gas Price Hike : आधीच महागाईने बेजार झालेल्या सामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसणार आहे. इंधन कंपन्यांनी घरगुती गॅसच्या दरात 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे 14.2 किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडर दराने एक हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1052.50 रुपये मोजावे लागणार आहेत. Oil Marketing Companies(OMCs) यांनी आज नवीन गॅस दर जाहीर केले आहेत.
Maharashtra News : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही एक सदिच्छा भेट असल्याची माहिती मिळत आहे.
Pandharpur Wari : ज्ञानेश्वरांची पालखी आज माळिशरसहून निघून वेळापूरला पोहचेल. खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल. तुकोबांची पालखी आज अकलूजहून निघेल आणि बोरगावला मुक्कामी असेल. माळीनगर येथे उभं रिंगण होणार आहे.
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयात येऊन कामकाजाचा आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे सरकाने घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात आढावा घेतला जाऊ शकतो अशी माहिती आहे.
Maharashtra News : राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांचाही उद्धव ठाकरेंवर भाजप प्रणित उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यासाठी दबाव वाढतोय. यात पहिलं पाऊल टाकलंय शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी. आता एकनाथ शिंदेच्या भूमिकेशी सहमत असलेले 11 खासदार शिंदेच्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे, ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसू शकतो.
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात पुढचे 5 दिवस हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे, पुढचे 5 दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. काल संध्याकाळपासून सिंधुदुर्गात पावसाचा जोर कमी झाला होता. चिपळूणमध्ये मात्र पावसाचा जोर वाढत आहे. वाशिष्ठी नदी इशारा पातळीवर वाहत आहे.
पावसाचा जोर असाच राहिल्यास आज पंचगंगा, कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडणार
कोल्हापुरात गेले दोन दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढला. आजही कोल्हापूरला रेड अलर्ट आहे. कोल्हापूर शहराबरोबरच शिरोळ, हातकणंगले करवीर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा असं आवाहन प्रशासनानं नदी किनाऱ्यावरील नागरिकांना केलं आहे. जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सांगलीतही कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला असून नदीकाठी काही बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे 11 खासदार शिंदेंच्या संपर्कात?
राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांचाही उद्धव ठाकरेंवर भाजप प्रणित उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यासाठी दबाव वाढतोय. यात पहिलं पाऊल टाकलंय शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी. आता एकनाथ शिंदेच्या भूमिकेशी सहमत असलेले 11 खासदार शिंदेच्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे, ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसू शकतो.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाकरे सरकारच्या कामाचा आढावा घेण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयात येऊन कामकाजाचा आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे सरकाने घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात आढावा घेतला जाऊ शकतो अशी माहिती आहे.
शिंदे समर्थक आमदार मतदारसंघात परतणार... कुठे स्वागत, कुठे विरोध?
आमदार संतोष बांगर सकाळी 7 वाजता हिंगोलीत पोहचणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना शिवसौनिकांच्या रोषाला सामोर जावं लागू शकतं. मुंबई- शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते अशोक वन परिसरात स्वागत रॅली काढली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह या शक्ती प्रदर्शनात सेना खासदार श्रीकांत शिंदे यांची हजेरी असेल. जळगाव- बंडखोर आमदार गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील जळगावमध्ये पोहोचणार आहेत. मंत्रीपद मिळाल्यानंतरच जल्लोष केला जाणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. तर पाचोरा आमदार किशोर पाटील समर्थक मात्र आयत्या वेळी जल्लोष करण्याची शक्यता आहे.
धुळे- एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळा गावित आणि त्यांचे पती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित हे आज धुळ्यात येणार आहेत. त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
पाऊले चालती पंढरीची वाट...
ज्ञानेश्वरांची पालखी आज माळिशरसहून निघून वेळापूरला पोहचेल. खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल. तुकोबांची पालखी आज अकलूजहून निघेल आणि बोरगावला मुक्कामी असेल. माळीनगर येथे उभं रिंगण होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -