Maharashtra Breaking News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. अमित शाह उद्या भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांची भेट महत्त्वाची आहे.
देशांचे गृहमंत्री अमित शाह काही तासांत मुंबईला पोहोचणार आहेत. सुरक्षेचे उपाय पाहता मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. शाह हे रात्रभर सह्याद्री गेस्ट हाऊसवर राहणार आहेत. त्यामुळे गेस्ट हाऊसबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सद्यस्थिती तपासण्यासाठी या भागात दौरा केला असून पोलिसांकडून नियमित फेऱ्या मारल्या जात आहेत. मुंबईतील शाह यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सर्व उपाययोजना व काळजी घेत आहेत.
गणेशोत्सवादरम्यान रात्रीच्या वेळेस मुंबईतील विविध भागात असलेल्या सार्वजनिक गणेश मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी गणेश भक्तांची मोठी झुंबड उडते.याचा विचार करून यंदा संपूर्ण रात्रभर गणेश भक्तांच्या प्रवासाची सोय बेस्ट उपक्रमांकडून करण्यात आलेली आहे. सदर विशेष बस सेवेअंतर्गत खुल्या दुमजली बस गाड्या, हो हो बस योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या बसगाड्या तसेच संपूर्ण रात्रभर विविध बस मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष बस गाड्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवा दरम्यान राबविण्यात आलेल्या बेस्ट उपक्रमाच्या या विशेष बस सेवेला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे आढळून आले आहे. या सेवेअंतर्गत हो हो आणि खुल्या दुमजली बस गाड्यांमधून कालच्या रात्रभरात 500 प्रवाशांनी लाभ घेतला असून विविध बस मार्गांवर चालणाऱ्या बस गाड्यांमधून एकंदर 4000 प्रवाशांनी लाभ घेतला असल्याचे दिसून येते. बेस्ट उपक्रमाने राबविलेल्या या विशेष बस सेवा मोहिमेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल बेस्ट उपक्रम मुंबईकर जनतेचा आभारी आहे.
या बस सेवेला उर्वरित दिवसात देखील असाच भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमांकडून करण्यात येत आहे.
गेल्या तीन चार तासापासून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस पाहायला मिळत आहे. दरम्यान वैजापूर तालुक्यातील चांदेगाव येथे गट नंबर 38 मध्ये शेत वस्तीवर राहत असलेले दिपाली राहुल बोधक (वय 31 वर्षे) यांचा शेतातून घरी येत असताना वीज पडून मृत्यू झाला आहे. तरी पुढील कारवाईसाठी मृतदेह वैजापूर सरकारी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली आहे.
गेल्या दोन तासांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विजांच्या कडकडाटासह, वादळी वाराही पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा चिंता वाढली असून,पिकांचे मोठं नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी शेतात गुडघ्या इतकं पाणी तुंबला आहे. तर बहुतांश ठिकाणी पीक आडवी झाली आहे. कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे तोंडघशी आलेला घास पुन्हा एकदा पावसाने हिसकावून नेला आहे.
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी हा मोठा धक्का असल्याच्या भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. देशाच्या विकासात सायरस मिस्त्री यांचं मोठं योगदान आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
Hingoli News Update: वसमत शहरात 15 तलवारी जप्त, पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, चंद्रशेखर कदम यांच्या पथकाची मोठी कारवाई, 15 तलवारींसह तीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात, सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे
मुंबईत आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन केला जाणार आहे,,, मुंबईच्या पश्चिम उपनगरात सर्वात मोठा गणपती विसर्जन स्थळ असलेला जुहू चौपाटीवर विसर्जनाच्या सर्व तयारी करण्यात आली आहे,,, जुहू चौपाटी आज पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे,,, मुंबईचा जुहू चौपाटीवर संध्याकाळी गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी होणार आहे ,या गर्दी मध्ये सुरक्षा मध्ये कुठलीही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी मोठा संख्या मध्ये मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,,, जुहू चौपाटीवर मुंबई महानगरपालिका आणि अग्निशमन दलाचा आणि मुंबई पोलिसांनी स्टेज उभारून त्या स्टेजवरून गर्दीवर लक्ष ठेवला जाणार आहे,,, सुरक्षेचा दृष्टीने जुहू चौपाटी मध्ये पोलिसांनी मोठा संख्या मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा लावले आहेत
मुंब्रा येथील प्रवाशांची बैठक, आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती, एसी लोकल विरोधात आज पुन्हा होत आहे बैठक, मागील वेळेस कळवा येथे झाली होती बैठक
आज राज ठाकरे गणपती बाप्पाच्या दर्शन दौऱ्यावर आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि या दौऱ्याची सुरुवात होणार आहे ती मुंबईच्या परळमधील नरेपार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाच्या दर्शनानं...
Jalgaon News : जळगाव शहरातील सुभाष चौक मित्र मंडळाच्या वतीने आज सामूहिकरित्या अथर्वशीर्ष पठण आयोजित करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून एकाच वेळी हजारो भाविकांनी अथर्वशीर्ष पठण करून गणेशाची मोठ्या भक्तीभावाने प्रार्थना केली. बाप्पा गणेशाला हिंदू धर्मात विघ्नहर्ता मानले जाते. मागील काळात दोन वर्ष कोरोना संकटामुळे सामूहिक अथर्वशीर्ष पठण होऊ शकले नव्हते. पुढील अशी कोणतीही संकटे येऊ नयेत या उद्देशाने बाप्पाची प्रार्थना करण्यासाठी हे सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले जात असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे.
सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी करमाळा तालुक्यातील केमजवळ रुळावरून घसरली. रात्री 3 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले. गाडी शेतात मातीत जाऊन थांबली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र पहाटेच्या सुमारास मुंबईहून कर्नाटकच्या दिशेने दिशेने जाणाऱ्या गाड्या सोलापूरला काही वेळ उशिरा पोहोचल्या. दरम्यान 'घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घसरलेली मालगाडी ही लूप रूळवर होती. त्यामुळे अधिक वेळ वाहतूक बंद नव्हती. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मात्र मालगाडी रुळावरून घसरण्याचे कारण चौकशीनंतर समोर येईल.' अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागताचे लागले बॅनर्स… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच वर्षा बंगल्याच्या प्रवेश द्वाराजवळ लागले स्वागताचे बॅनर्स…आज आणि उद्या अमित शाह यांचा मुंबई दौरा… लालबागचा राजा, सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. दोन मालवाहू वाहनांमध्ये भीषण अपघात झाल्याने घडली असून एक चालक गंभीर जखमी आहे.
Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो गणेश दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर खुशाल जा. कारण गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं (Central Railway) आज म्हणजेच, 4 सप्टेंबर 2022 रोजी रेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक (Mega block) नसेल. मात्र पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Cyber Attacks on Health Systems : आरोग्य यंत्रणेवरील (Health System) सायबर हल्ल्यांमध्ये (Cyber Attack) भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत सरकार सध्या डिजिटायझेशनला चालना देत आहे. मात्र, देशात अद्याप डेटा संरक्षण कायदा नसतानाही भारतात आरोग्य सेवा क्षेत्राचं डिजिटलायझेशन आक्रमकपणे विस्तारत आहे. भारत सरकारकडून कोरोनाकाळात कोविन (CoWIN) अॅप, आरोग्य सेतू अॅप यांसारखे डिजिटल पर्याय निवडले. भारत डिजिटल इंडिया बनण्याचा प्रयत्न करत असताना, असे सायबर हल्ले होणं ही चिंतेची बाब आहे.
बीसीसीआय सचिव जय शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह शाह पोहोचले लालबागच्या राजाच्या दर्शनाला
पार्श्वभूमी
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन
पाच दिवसांच्या गणेशाचं आज विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली असून मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच यासाठी तब्बल 10 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.
आरे कारशेडप्रकरणी पर्यावरणवाद्यांचं आंदोलन
आरे कारशेड प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली गेली असली तरी पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन सुरुच राहणार आहे. आज सकाळी 11 वाजता आरेतील पिकनिक स्पॉट परिसरात पर्यावरणप्रेमी एकत्रित येत आंदोलन करणार आहेत.
महागाईविरोधात काँग्रेसचं आज आंदोलन
वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीवरून भाजप सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. आज सकाळी 11 वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. 'महागाई पर हल्ला बोल' असे या रॅलीचे नाव असेल. काँग्रेसच्या कमिटीच्या मुख्यालयातून काँग्रेस नेते राहुल गांधी बसने दिल्लीतील रामलीला मैदावावर येऊ शकतात. त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते असणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत येणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत येणार आहेत. आज रात्री 9.30 वाजता अमित शाह मुंबईत दाखल होतील. त्यानंतर ते रात्री सह्याद्री गेस्ट हाऊसला मुक्कामी राहतील. त्यांच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई पोलीस सतर्क आहेत.
ठाण्यात रेल्वे प्रवाशांचे आंदोलन
ठाण्याच्या पुढच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांचा लढा सुरूच राहणार असून आज दुपारी 12 वाजता मुंब्रा स्थानकात सर्व प्रवासी जमणार आहेत. कळवा-मुंब्रा इथे थांबणाऱ्या 21 लोकल बंद करण्यात आल्याने प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मध्य रेल्वे विरोधात, एसी लोकल विरोधात सातत्याने ट्वीट करून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड विरोध दर्शवत आहेत.
भारत-पाकिस्तान पुन्हा आमने सामने
भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार असून आज संध्याकाळी 7.30 वाजता सामना आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा आशिया चषकातील सुपर 4 मधील सामना खेळवला जाईल. याआधी 28 ऑगस्ट रोजी भारताने ग्रुप स्टेजच्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली होती. यावेळी आधी फलंदाजी करत पाकिस्तानने 147 धावा केल्या होत्या. भारताने 19.4 षटकात 5 गडी गमावत 148 धावांचे लक्ष गाठले. यावेळी जाडेजा आणि पांड्या यांनी कमाल कामगिरी केली होती. ज्यानंतर आता सुपर 4 च्या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -