Maharashtra Breaking News LIVE Updates : बीडमधील टेंडर वाद पेटला, पिस्तुल रोखल्याप्रकरणी संतोष पवारसह तिघांवर गुन्हा 

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Apr 2022 10:02 PM
Beed News Update : दीड लाख रूपयांची लाच घेताना मुख्याध्यापकासह चौघे जाळ्यात, बीडमधील घटना 

Beed News Update : दीड लाख रूपयांची लाच घेताना मुख्याध्यापकासह चौघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील तांबवा येथील गजानन शिक्षण प्रसारक संक्षेचे सचिव अशोक चाटे, गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत हंगे, साने गुरुजी विद्यालयाचे अध्यक्ष उद्धव कराड आणि दत्तात्रय धस अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

Akola News Update : अकोला पोलिसांनी आवळल्या सोयाबीन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या 

Akola News Update : सोयाबीन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या अकोला पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. बाळापूर तालूक्यातील व्याळा येथील अंबूजा सोयाबीन ऑईल फॅक्टरीतून या टोळीने 325 क्विंटल सोयाबीनची चोरी केली  होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 430  क्विंटल सोयाबीन जप्त केले असून चार आरोपींना अटक केले ईहे. या टोळीतील अजूनही  पाच आरोपी फरार आहेत. पोलिसांनी या कारवाईत 44 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Beed News Update : बीडमधील टेंडर वाद पेटला, पिस्तुल रोखल्याप्रकरणी संतोष पवारसह तिघांवर गुन्हा 

Beed News Update : पाणी पुरवठा योजनेच्या टेंडरवरून बीडमध्ये एकाला बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राहुल टेकाळे यांच्या फिर्यादीवरून संतोष पवार आणि त्यांच्या दोन साथीदारांवह हा गुन्हा दाखल झाला आहे.  


बीडचे युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राहुल टेकाळे यांनी पाटोदा तालुक्यातील केरला या गावात पाणी पुरवठा योजनेचे टेंडर भरले होते. त्यानंतर हे टेंडर का भरलं? म्हणून संतोष पवार या गुप्ते दाराने राहुल टेकाळे यांच्या घरी जाऊन बंदुकीच्या जोरावर त्यांना धमकावून कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप टेकाळे यांनी केला आहे.  

रेल्वे अपघातामुळे पंचवटी आणि नंदीग्राम एक्सप्रेस रद्द

रेल्वे अपघातामुळे पंचवटी आणि नंदीग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 12109 आणि 12110 ही पंचवटी एक्सप्रेस आहे. तर 11401 ही नंदीग्राम एक्सप्रेस आहे. तर 22221 ही राजधानी एक्सप्रेस, 12261 हा हावडा दुरोंतो आणि 12173 ही उद्योग नगरी एक्सप्रेस दुसऱ्या मार्गाने चालवण्यात येणार आहे. 

पवन एक्सप्रेस अपघातात एकाचा मृत्यू

पवन एक्सप्रेस अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. प्रवाशांना हलविण्यासाठी एसटी महामंडळ आणि महानगरपालिका ट्रान्सपोर्टच्या बसेस पाठविण्यात आलेल्या आहेत. ॲम्बुलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

Mumbai Metro :  मुंबईच्या नवीन उद्घाटन केलेल्या मेट्रो मालिकांमध्ये पहिल्या दिवशी  मोठा गोंधळ

Mumbai Metro :  मुंबईच्या नवीन उद्घाटन केलेल्या मेट्रो मालिकांमध्ये पहिल्या दिवशी  मोठा गोंधळ झाला. तब्बल एक तास प्रवासी मेट्रोच्या प्लॅटफॉर्मवर ताटकळत होते.  अचानक आग लागल्याने स्टेशन खाली करण्याच्या सूचना प्रवाशांना  देण्यात आला आहे. मेट्रोच्या आरे स्टेशनवर  हा प्रकार घडला.  रात्री 9.10 पासून 10.15 पर्यंत मेट्रो सुरू न झाल्याने प्रवासी अखेर  घरी गेले. पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवासी नाराज झाले, 

Nanded News Update : महाराष्ट्र सरकारने बुलेट ट्रेनचे रोखलेले काम सुरु केले तर इतर बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होईल : देवेंद्र फडणवीस

Nanded News Update : महाराष्ट्र सरकारने बंद केलेल्या बुलेट ट्रेनची कामे सुरू केली तर इतर बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा होईल आणि त्यामुळे मराठवाड्यातील बुलेट ट्रेनचे आपले स्वप्न साकार होईल. यासाठी राज्याचे जबाबदार मंत्री असलेले अशोक चव्हाण यांनी मध्यस्थी करून मुख्यमंत्र्यांना विनंती करावी, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 


रेल्वे प्रकल्पासाठी 50 टक्के निधी राज्याने द्यायचा असतो. परंतु, हा निधी राज्याने देणे बंद केल्यामुळे, सगळे रेल्वे प्रकल्प बंद पडले आहेत. तोही निधी राज्याने देणे सुरू केले तर राज्यातील सगळे प्रकल्प मार्गी लागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

पवन एक्सप्रेसचे 11 डबे घसरले

मुंबईहून नाशिकला येतांना पवन एक्सप्रेसचे 11 डबे लहवीत स्टेशन जवळ घसरले आहेत. वीस मिनिटांपूर्वी ही घटना घडली आहे.

अजित पवारांची राज ठाकरेंवर टीका

राज ठाकरेंना नकलेशिवाय काही जमत नाही. त्यामुळे त्यांनी आत्मपरीक्षण करावं की एकेकाळी निवडून आलेले 14 आमदार आपल्याला सोडून का गेले. नुसंत भाषण करुन जनतेचे प्रश्न सुटत नाही. सरड्यासारखं रंग बदलण्याचं काम राज ठाकरे करतात, अशी टीका अजित पवारांनी केली आहे. 

बीडमध्ये केजजवळच्या लाडेगाव शिवारात कडब्यासोबत जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ
बीडच्या केज जवळील लाडेवडगाव परिसरामध्ये कडब्यासोबत एक जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील आडस-होळ रस्त्यावर जळालेल्या अवस्थेत एक अज्ञात मृतदेह आढळला. याल व्यक्तीला घटनास्थळीच कडब्याच्या गंजीसोबत जाळण्यात आलं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस तपासात याबाबतीत खुलासा होईल. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर  आहे. हा मृतदेह नेमका महिलेचा की, पुरुषाचा, जळाल्याने याचाही अंदाज येत नाही.
बदली आणि पदोन्नती मिळालेल्या पीएसआयना वरिष्ठ पीआय सोडेनात, मुंबई पोलीस आयुक्तांचा आदेशही पाळेनात?

मुंबई : बदली झालेल्या आणि पदोन्नती झालेल्या पीएसआयना त्यांच्या संबंधित बदली जिल्ह्यात हजर राहण्यासाठी मुक्त करण्याच्या मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पीआयकडून मुक्त करण्यास नकार. या पीएसआयना दिलासा मिळणार?

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव फेटाळला

पाकिस्तानात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव सभापतींनी फेटाळाला आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारला तूर्त जीवदान मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

धुळे: वाढत्या महागाईच्या निषेधार्थ युवासेनेचे थाळी बजाओ आंदोलन

Dhule : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ धुळ्यात युवा सेनेच्या वतीने थाळी बजाव आंदोलन करून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी युवा सेनेच्या वतीने नागरिकांना गाजरांचे वाटप करण्यात आले, वाढत्या महागाईमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे मात्र दिवसेंदिवस महागाईचा उच्चांक वाढत आहे  यापार्श्‍वभूमीवर आज राज्यभर युवा सेनेच्या वतीने प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले धुळे शहरातील भगवा चौक येथील शिवसेना कार्यालयापासून स्वस्तिक चित्रपटगृह पर्यंत हे थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते

Wardha : रोजमजुरी करणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा ; म्हसाळाचे माजी उपसरपंच यांची एक लाखांची हरवलेली सोन्याची चैन केली परत

Wardha : वर्धा जिल्ह्यातील म्हसाळा गावात रोजमजुरी करणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा दिसून आला आहे. या महिलेने म्हसाळाचे माजी उपसरपंच यांची एक लाखांची हरवलेली सोन्याची चैन केली परत केली आहे. महिलेच्या या धाडसी कामगिरीने महिलेचा साडी चोळी देऊन सत्कार केला आहे.   

Aurangabad : औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईपलाईन फुटली

Aurangabad : औरंगाबाद शहरातील पैठण रोडवर धनगाव जवळ पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईपलाईन फुटली. सकाळी 10 वाजल्यापासून ही पाईपलाईन फुटली आहे. आतापर्यंत अंदाजानुसार, तब्बल 70 फुटापर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. ही फुटलेली पाईपलाईन जोडण्यासाठी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेने पुढचे काही दिवस औंरंगाबादमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. 

अवकाळीचा फटका हापूस आंब्याला, मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा 30 टक्केच पेट्या रत्नागिरी, सिंधुदुर्गहून नवी मुंबई मार्केटमध्ये दाखल

रत्नागिरी : कोकणातील आंबा बागायतदार मुहूर्ताची पेटी गुढीपाडव्याला पाठवत व्यवसायाला सुरुवात करतात. पण, यंदा मात्र अवकाळीचा फटका हापूस आंब्याला बसला आहे. गतवर्षीची तुलना केल्यास केवळ 30 टक्केच पेट्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हापूसचे दर मात्र चढे असून सामान्यांना परवडणारे नाहीत असेच आहेत.  

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीला 11 हजारांचा भाव, वसमत बाजार समितीत यंदाचा सर्वोच्च दर

हिंगोली : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी मानाच्या हळदीचा लिलाव केला जातो. या हळदीच्या लिलावावरुन वर्षभरात हळदीचा भाव कसा असणार याचा अंदाज बांधला जातो. त्यानुसार वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला सर्वोच्च भाव 11 हजार 111 रुपये हा लागला आहे. पार्टी येथील शेतकरी रमेश बागल यांच्या हळदीला हा सर्वोच्च भाव लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तर काल पाच हजार पोत्यांची वसमत बाजार समितीमध्ये आवक झाली.

Nagpur : नागपूरात महिलांचे सामूहिक राम रक्षा पठण; हिंदू रक्षा समितीचे आयोजन...

Nagpur :  नागपुरात दरवर्षी चैत्र नवरात्रात हिंदू रक्षा समितीच्या वतीने रामनवमी पूर्वीच्या रविवारी रामरक्षा पठणाचे आयोजन करण्यात येते. शहरातील महाल परिसरातील बडकस् चौकात सकाळी 7 वाजता रामरक्षा पठण करण्यात आले. यात मोठ्या संख्येने भगव्या साड्या घालून महिला सहभागी झाल्या. सुरुवातीला भगवान राम यांचे सामूहिक भजन कीर्तन करण्यात आले. त्यानंतर रामरक्षा स्तोत्र पठण केले गेले. यावेळी संपूर्ण परिसरात जय श्री रामाचा जय घोष करण्यात आला. हिंदू रक्षा समिती मागील 15 वर्षापासून हे आयोजन करत असून कोरोना काळात त्यात खंड पडला होता. यंदा मात्र पुन्हा नव्या उत्साहाने कार्यक्रम घेण्यात आलाय. कालच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गुढीपाडव्याच्या निमित्ताने लक्ष्मीनगर चौकात करण्यात आलेल्या रामरक्षा पठण कार्यक्रमात सहभागी झाले होते.

उल्कापात की उपग्रहाचे अंतराळातील तुकडे हे सध्यातरी सांगणं कठीण : खगोल अभ्यासक रवींद्र खराबे

यवतमाळ : अवकाशात काल (2 एप्रिल) खगोलीय घटना घडली यात उल्कापात की उपग्रहाचे अंतराळातील तुकडे आहेत हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, एखादा कृत्रिम उपग्रह पाडण्याआधी तशी सूचना त्या देशाला मिळतात. मात्र कालच्या घटनेबाबत अशी कुठलीही पूर्वसूचना नव्हती, त्यामुळे हा उपग्रह आहे की उल्कापात हे सांगणं सध्यातरी कठीण आहे.  उल्कापात हे अचानक पडत असतात. हे कृत्रिम उपग्रहाचे भाग असल्याचे खगोल अभ्यासक रवींद्र खराबे यांनी सांगितलं.

चंद्रपुरात आकाशातून लोळ कोसळले त्या ठिकाणी आढळली 10x10 ची रिंग!

चंद्रपूर : संपूर्ण राज्यात काल (2 एप्रिल) अनेक ठिकाणी आकाशातून आगीचे लोळ जाताना लोकांनी पाहिले आणि याबाबत एकच कुतूहल लोकांमध्ये निर्माण झालं. मात्र आगीचे हे लोळ चंद्रपूर जिल्ह्यातील लाडबोरी या गावात कोसळले. ज्या ठिकाणी हे लोळ कोसळले त्या ठिकाणी रिंग सदृश्य एक वस्तू आढळून आली आहे. अंदाजे 10x10 फूट आकाराची ही रिंग तारा तुटल्यासारखा भास होत गडगडाटासह कोसळली. त्यामुळे घाबरुन जात लाडबोरीच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. थोड्या वेळाने घटनास्थळी शोध घेतल्यावर ही रींग आढळून आली आणि त्यानंतर नागरिकांनी प्रशासनाला याची माहिती दिली. सध्या ही रिंग वस्तू सिंदेवाही पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना रमजानचा आज पहिला दिवस म्हणजेच पहिला उपवास आहे. रविवारी चंद्र दिसल्यानंतर रमजानच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करतात. महिनाभर उपवास केल्यानंतर, ईदचा चंद्र पाहिल्यानंतर पुरुष आणि मुले ईदगाहमध्ये आणि महिला घरांमध्ये ईदची नमाज अदा करतात. पवित्र महिन्याचा चंद्र पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रमजान महिन्याला सुरुवाती झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'हा पवित्र महिना लोकांना गरीबांची सेवा करण्याची प्रेरणा देईल. यामुळे आपल्या समाजात शांतता, सौहार्द आणि करुणेची भावना अधिक वाढण्यास मदत होईल.'


मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलीस चौकशी करणार, प्रवीण दरेकर यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश
मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. प्रवीन दरेकर यांना सोमवारी (4 एप्रिल) मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून त्यांना सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.


'ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्याच्या समोर हनुमान चालिसा लावू', राज ठाकरे यांचा इशारा
''प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारने घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महविकास आघाडी सरकारला दिला आहे. शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला. 


विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आकाशातल्या गूढ दृश्यांनी थरकाप
महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात अवकाशातून एक रोषणाई जाताना दिसली. लोकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ही रोषणाई आगीच्या गोळ्यांप्रमाणे असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आकाशात ही रोषणाई दिसली. चंद्रपूर,  नागपूर, वाशिम, अकोला, जळगाव, जालना आणि बुलडाणा,अशा जिल्ह्यामध्ये ही खगोलीय घटना नागरिकांनी पाहिलं असल्याचं समोर आलंय. अवकाशात जी घटना घडली यात उल्कापात की सॅटेलाईट उपग्रहाचे अंतराळातील तुकडे आहे हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, एखादा कृत्रिम सॅटेलाइट पडण्याआधी तशी सूचना त्या देशाला मिळतात मात्र आज घटनेबाबत अशी कुठलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा उपग्रह आहे की उल्कापात हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. उल्कापात हे अचानक पडत असतात पण हे कृत्रिम उपग्रहाचे भाग असल्याचे खगोलशास्त्र अभ्यासक रवींद्र खराबे यांनी सांगितले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.