Nashik Crime : चॉपरने केक कापणे नाशिकमधील बर्थडे बॉयला चांगलेच महागात पडले आहे. चॉपरने केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी (Nashik News) बर्थडे बॉयचा शोध घेऊन त्याच्या विरुद्ध थेट कारवाईचा बडगा उगारलाय. 

याबाबत अधिक माहिती अशी की, बर्थ डे बॉय नाशिकमध्ये चॉपरने केक कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी या बर्थ डे बॉयचा शोध सुरु केला होता. त्यातच क्राइम ब्रांच युनिट एकच्या पथकाला चॉपरने केक कापणारा तरुण कमरेला चॉपर लावून दहशत निर्माण करीत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. 

'बर्थडे बॉय'वर गुन्हा दाखल 

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून गजानन गणेश शेळके या वीस वर्षीय बर्थडे बॉयला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून स्टीलचे धारदार चॉपर देखील जप्त करण्यात आले आहे. 

नाशिकमध्ये छताची कौले तोडून ब्रँडेड दारूची चोरी

दरम्यान, नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. आता एका हॉटेलच्या छताची कौले तोडून ब्रँडेड दारूची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलमधील वेगवेगळ्या ब्रँडची दारू आणि 32,500 रुपयांची रोकड असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. ही दारू चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

डाटा ऑपरेटरकडून 1 कोटी ७६ लाखांचा अपहार 

पोस्ट ऑफिसमध्ये रोजंदारीवर संगणकावर डाटा फीडिंगचे काम करणाऱ्या एका तरुणाने तब्बल दोन कोटींचा अपहार केल्याची घटना मालेगावात शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयात घडली. असीम रजा शहादत हुसेन असे या संशयिताचे नाव असून तो मुख्य डाक ऑफिसमध्ये रोजंदारीवर काम करत होता. मुख्य डाक घरातील कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून युजर आयडी व पासवर्ड चुकीच्या मार्गाने हस्तगत करीत पेमेंट झालेल्या परंतु सॉफ्टवेअरमध्ये दिसत असलेल्या एकूण 159 विमा धारकांची रक्कम कोणालाही कळू न देता स्वतःच्या बचत खात्यात बेकायदेशीर पद्धतीने टाकून घेत एकूण 1 कोटी 76 लाख 96 हजार 335 रुपयाचा अपहार केला असून मालेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी वाचा 

Video: मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मॅनेजरला शिवसेनेनं दाखवलं इंगा; हात जोडून मागितली माफी