मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांसोबत राहणारे दोन खंदे समर्थक नेते म्हणजे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हेच होत. त्यामुळेच, या दोन्ही नेत्यांच्या पक्षातील भूमिकेकडे आणि कारभाराकडे राजकीय नेत्यांचे लक्ष असते. आज जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिंतेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी खास शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. तर, भाजप आमदार आणि जयंत पाटील यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांनी देखील जयंत पाटलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, पडळकर यांनी त्यांच्या शैलीत टोला देखील लगावला आहे.
आज जयंत राजाराम पाटील म्हणजेच आमचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि प्रगल्भ नेतृत्व यांचा वाढदिवस. त्यांच्या गुणावर माझे प्रचंड प्रेम आहे. ते म्हणजे तेदेखील माझ्यासारखेच प्रचंड 'आईवेडे' आहेत. आजही आई हा शब्द निघाला की त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. कधीही कोणावरही न चिडणारा, सर्वांचे म्हणणे गप्प बसून ऐकणारा , असा राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच! हसत खेळत लोकांच्या टोप्या उडवणारा. पण, संघटनेतील प्रत्येकाच्या स्वभावाची ओळख असणारा , संघटनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणारा, अर्थात हा भ्रमणाचा गुण त्यांना वडिलांकडून मिळालाय. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी जेव्हा भारत यात्रा केली होती. तेव्हा राजाराम पाटील हे त्यांच्यासोबत सबंध महाराष्ट्र फिरले होते. एका कर्तृत्ववान बापाचा कर्तृत्ववान मुलगा , ही त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवली, अशी आठवण आव्हाड यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगितली आहे.
शरद पवारांनंतर ज्यांना मी नेता मानतो - आव्हाड
सर्वांशी हसत खेळत वागणारा आणि कोणावरही न चिडणारा नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही. त्यांचा स्वभावगुण पाहता महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक असलेले ते नेतृत्व आहे. पण, नशिबाने अजून तरी साथ दिलेली नाही. पण, ते नशिब आज ना उद्या उघडेल, याची मला खात्री आहे. अशा या माझ्या आवडत्या नेत्याला , ज्यांना मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्यानंतर आपला नेता मानतो, अशा जयंत पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात जयंत पाटील यांना जितेंद्र आव्हाडांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
गोपीचंद पडखळकरांकडूनही शुभेच्छा
जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत. त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या हिताचे काम घडावं अशा शुभेच्छा देतो, अशा गोपीचंद पडळकर स्टाईलने त्यांनी जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी, पडळकर यांनी सातत्याने आपल्या भाषणातून जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे. तसेच, विधानसभेतील निवडणूक निकालानंतरही पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती, मुख्यमंत्रीपदासाठी ते नव्या नवरीसारखं नटून बसलेत, असे पडळकर यांनी म्हटलं होतं. आता, त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन