Maharashtra lockdown update : राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठण्याची शक्यता, 1 जूनपासून कार्यालयं 50 टक्के क्षमतेने सुरु होणार?
Maharashtra lockdown update : राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जून पासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती आहे.
Maharashtra lockdown update : कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जूनपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हाबंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जूनपासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रात आज 31,671 रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात आज तर 20,740 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 31,671 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 424 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 2,89,088 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत एकूण 53,07,874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.24 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 424 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,43,50,186 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,92,920 (16.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 21,54,976 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 16,078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे जिल्ह्यात काही बंधनं काढून टाकली जाणार
पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय. पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने काही निर्बंध उठवण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सुविधांवर असलेली बंधनं काढून टाकली जाणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. रेड झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. सध्या पुण्यातील परिस्थिती समाधानकारक असल्याचे टोपे म्हणाले. परंतु, डेथ रेशो आणि पॉझिटीव्हीटी रेट कमी झालेला नाही. संपुर्ण महाराष्ट्रात ट्रॅकिंग आणि ट्रेसिंगी शास्त्रीय पद्धतीने वाढवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी हाय रिस्क एरिया आहे तिथेच ट्रेसिंग व्हायला हवे. उगीच कुठेही ट्रेसिंग करुन पॉझिटीव्हीटी रेट कमी आहे, असं दाखवता कामा नये.
संस्थात्मक विलगीकरण वाढवण्यात येणार
होम क्वारंटाईन कमी करुन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवायला हवे, अशी सगळ्या लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. बऱ्याचवेळा होम क्वारंटाईन असलेला रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे अनेकांनी ही मागणी केली होती. प्रत्येक हॉस्पिटल्सची बिलं तपासण्यासाठी डेडीकेटेड ऑडीटर देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. अनेक रुग्णालयांकडून अव्वाच्यासव्वा बिल आकारली जात आहेत. ऑडीटरने हे रोखावे ही अपेक्षा आहे, असं टोपे म्हणाले.
निर्बंधांमधून सुट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा
अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे रुग्ण उपचार घेतायत. मात्र, अनेक मोठी हॉस्पिटल्स सरकारी योजना त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांना लागू करत नाहीत. त्या कराव्यात यासाठी चॅरीटी कमीशनरांना सुचित करण्यात आलं आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वतःच्या स्टाफला स्वतःच्या खर्चाने लस द्यावी अशा सुचना औद्योगिक क्षेत्रात देण्यात आल्या आहेत. अनेक खाजगी हॉस्पिटल्स लसीसाठी जास्तीची रक्कम वसूल करतायत. प्रशासनाला त्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात येईल. परंतु, निर्बंधांमधून सुट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा असेल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.