Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बसच्या 382 फेऱ्या रद्द, सीमाभागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Maharashtra Karnataka Border Dispute : सीमा भागातील वाढता तणाव लक्षात घेता स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार कर्नाटकात जाणाऱ्या 1156 बस फेऱ्यांपैकी 380 फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या 382 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीमा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनूसार एसटी महामंडळाने याबाबतचा निर्णय घेतलाय.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जतमधील गावांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही राज्यांमधील सीमाभागावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळला आलाय. त्यातच काल बेळगावध्ये महाराष्ट्रातील सहा ट्रकवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत कर्नाटकच्या बसेसना काळे फासले. त्यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळेच सीमा भागातील वाढता तणाव लक्षात घेता स्थानिक पोलिस आणि प्रशासनाने तणाव असलेल्या भागातून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस रद्द करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर एसटी महामंडळाने याबाबतचा निर्णय घेत कर्नाटकात जाणाऱ्या रोजच्या 1156 फेऱ्यांपैकी 380 फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्राच्या नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिधुंदुर्ग या जिल्ह्यांतून कर्नाटक राज्यात अनेक बसेस जातात. यापैकी कोल्हापुरातून निपाणी-बेळगाव मार्गे 572 बस कर्नाटकात जातात. यातील 312 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर गडहिंगलज, चंदगड, आजरा, तळ कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या बस फेऱ्या निपाणी ऐवजी अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. याबरोबरच सांगली जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या 60 फेऱ्यांपैकी 22 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय अन्य विभागातील संवेदनशील मार्गावरील 48 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सौंदत्तीला गेलेल्या भाविकांना कर्नाटक पोलिसांचे संरक्षण
दरम्यान, सौंदत्ती येथे रेणुका मातेच्या यात्रेसाठी कोल्हापुरातून दरवर्षी हजारो भाविक जात असतात. यंदा देखील कोल्हापूर शहरातून सुमारे 7000 भाविकांना घेऊन गेलेल्या 145 एसटी बसेस आज मध्यरात्रीपर्यंत कोल्हापुरात सुखरुप दाखल होतील. या बाबतीत आवश्यकता वाटल्यास कनार्टक पोलिस प्रशासनाने संबधित बसेसना पोलिस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. याबरोबरच आज दत्त जयंती निमित्य राज्यातील अनेक तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथे दत्त जंयती निमित्त यात्रा भरविण्यात आली आहे. या यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून सोलापूर-अक्कलकोट-गाणकापूर या मार्गावर जादा वाहतूक केली जात आहे. तेथे कोणतेही विघ्न आलेले नसून यात्रा सुरळीत सुरु आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या