Success Story: वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी गेली, शिक्षणासाठी नांदेडहून पुण्यात आला, अन् बारावीच्या परीक्षेत डोळे दिपवणारं यश मिळवलं
पुण्यातील स.प. महाविद्यालयात शिकणाऱ्या नांदेडच्या एका अंध विद्यार्थ्याने अनेकांना मागे टाकत 84.33 टक्के मिळवले. विवेक घुगे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे.
Success Story: हौसला बुलंद हो, तो मंजिले दूर नही होती, हे वाक्य आपल्यातील अनेकांनी ऐकलं आहे. मात्र बाहेर गावातून येऊन पुण्यात शिक्षण घेणारे अंध विद्यार्थी हे वाक्य जगताना दिसत असतात. आज बारावीचा निकाल जाहीर झाला. पुण्यातील स.प. महाविद्यालयात शिकणाऱ्या नांदेडच्या एका अंध मुलाने अनेकांना मागे टाकत 84.33 टक्के मिळवले. विवेक घुगे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. अंध असूनही नांदेड सारख्या शहरातून पुण्यात येत नामवंत महाविद्यालयात प्रवेश मिळवून रोजचा रहदारीचा प्रवास करुन आणि काठीच्या साहय्याने आयुष्याचे प्रत्येक टप्पे पार करत त्याने हे यश खेचून आणलं आहे.
'वयाच्या सहाव्या वर्षी दृष्टी गमावली'
विवेक हा नांदेड जिह्यातील घोगेवाडी गावात राहतो. वयाच्या सहाव्य़ा वर्षी त्यांच्यावर नियतीने आघात केले. सहा वर्षाच्या असताना त्याला ताप आल्याने त्याची दृष्टी गेली. त्यानंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात उपचार घेतले. मात्र दृष्टी परत येऊ शकली नाही. त्याने आणि कुटुंबियांनी आलेल्या संकटावर मात करण्याचा निर्णय घेतला. चौथीपर्यंत त्याला सामान्य शाळेत शिकवलं आणि नंतर गावातीलच एका अंध विद्यालयात त्याचं शिक्षण पूर्ण केलं. जिद्दी आणि हुशार असल्याने विवेकला शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्याचा त्यांच्या आई-वडिलांनी ठरवलं. त्याच्या शाळेतील काही विद्यार्थी पुण्यात शिकत होते. त्यांचं मार्गदर्शन घेत विवेकने अकरावी आर्ट्स घेण्याचं ठरवलं आणि पुण्यातील स.प. महाविद्यालयात प्रवेश घेतला.
गावाकडून आल्याने त्याला सुरुवातीला शहरी वातावरण आणि रहदारीची सवय नव्हती सुरुवातीला तो काही प्रमाणात घाबरला मात्र अंध असूनही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये एकट्याने काठीच्या साहय्याने प्रवास करण्याचा संकल्प केला. त्या दहावीत 80 टक्के मिळाल्याने समोरचं शिक्षण चांगलंच घ्यायचं आणि मोठं अधिकारी व्हायचं स्वप्न त्याचा रोज डोळ्यासमोर दिसत होतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून तो रोज प्रवास करायचा.
बालमैत्रिणीची साथ...
पुण्याचं वातावरण आणि कॉलेजचं एकंदरीत वातावरण पाहून त्याला सुरुवातीला पुण्याला येणाचा निर्णय चुकला, असं वाटत होतं. मात्र त्याची लहानपणीची मैत्रीण गंगा सोबत असल्याने त्याने कधीही मागे न वळून बघण्याचा निर्धार केला. गंगा आणि विवेक लहानपणापासून एकाच शाळेत शिकले. गंगादेखील अंध आहे. एकमेकांना आधार देत त्यांनी आता बारावीचा महत्वाचा टप्पा पार केला आहे.
IAS व्हायचंय...
विवेक सांगतो की, या सगळ्या यशात माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्य़ेकाचा मोठा वाटा आहे. रस्ता ओलांडताना एखाद्याने दिलेला हात, आई,वडिल आणि स.प. महाविद्यालयातील राहुल मेश्राम सरांनी टाकलेल्या विश्वासामुळे मी हे यश संपादन करु शकलो. मला इथेच थांबायचं नाही आहे तर IAS व्हायचं आहे, असंही तो सांगतो.