Heat Wave : उष्णतेच्या बाबतीत हवामान विभागानं व्यक्त केलेला अंदाज खरा ठरताना दिसतोय. कारण कोकणातील अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट आली असून तापमान 40 अंशापार गेलंय. रायगडच्या कर्जतमध्ये सर्वाधिक 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर परभणीत आज 38.02 अंश सेल्सिअस आणि वाशिममध्ये 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील काही ठिकाणांच्या स्टेशनवरील तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेले आहे. मुंबईमध्ये 1956 नंतर मार्चमध्ये प्रथमच पारा 41 अंशांवर गेला आहे.
उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. आणखी दोन दिवस मुंबई, ठाणे,पालघर, रायगडमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवलीय. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी इशारा जारी केला आहे. उष्णतेची लाट आल्याने लहान मुलं, वृद्धांसह आधीच आजारी असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. यामुळे शरीरात पेटके येणे, थकवा येणे, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहिल.
हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर (K. S. Hosaliakr) यांनी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबईतील उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील आणि त्यानंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता, असल्याचं IMD नं सांगितलं आहे." पुढे ते म्हणाले की, "कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर आणि कमाल तापमान किमान 37°C असावं."
संबंधित बातम्या :