अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात श्री संत शेख महंमद महाराज यांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या ग्रामदैवतेची यात्रा मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे होऊ शकली नव्हती. यंदा मात्र, यात्रोत्सव होत असल्याने भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हे दक्षिणेतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी सोळाव्या शतकात श्री संत शेख महंमद महाराजांना श्रीगोंद्यात आणल्याचे सांगितले जाते. श्री संत शेख महंमद महाराज हे मध्ययुगीन कालखंडातले सुफी संत होते. श्रीगोंद्याचे ग्रामदैवत म्हणून त्यांची ओळख आहे. एक मुस्लीम संत असूनही गावातील हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येत बाबांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
श्री संत शेख महंमद महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे तिथे निजामशाहीच्या कालखंडातली मठाची बांधकाम शैली पाहायला मिळते. या मठात श्री संत शेख महंमद महाराज आणि त्यांच्या पत्नी समाधी घेतल्याचं जुने जाणकार सांगतात. महाराजांच्या यात्रोत्सवापूर्वी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलं जातं. आमलकी एकादशीला यात्रोत्सव सुरु होतो, दोन दिवस यात्रोत्सव असतो. यात्रोत्सवात हिंदू-मुस्लीम यांचा सक्रिय सहभाग असतो.
यात्रोत्सवात दिवसभर भाविक दर्शनासाठी आणि नवसपूर्तीसाठी गर्दी करतात. श्रीगोंद्यातील कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री संत शेख महंमद बाबांच्या समाधीच्या दर्शनाने केली जाते. यात राजकारणी मंडळी आघाडीवर आहेत.
यात्रेच्या दिवशी बाबांना स्नान घालून चंदन लेप लावला जातो. त्यानंतर संध्याकाळी वाजतगाजत पालखी निघते. दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचा फड रंगतो. श्री संत शेख महंमद महाराज यांनी दिलेली अखिल मानवतेची शिकवण आजही श्रीगोंद्यात पाहायला मिळते, म्हणूनच येथे हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदाने राहतात, बाबांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
यंदा श्री संत शेख महंमद महाराज यांना फुलांच्या चादरीने सजवण्यात आलं आहे. दोन वर्षे कोरोनामुळे यात्रा होऊ न शकल्याने यावर्षी मात्र अनेक जण यात्रेत सहभागी होताना दिसत आहेत.