Maharashtra Heat Wave : उन्हाळ्याने वर्दी दिली असून उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणासाठी इशारा जारी केला आहे. रविवारी (13 मार्च) मुंबईचं तापमान 38.6 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी  पालघर, ठाणे, मुंबई, रायगड

  उष्णतेच्या लाटेसह ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.


उष्णतेची लाट आल्याने लहान मुलं, वृद्धांसह आधीच आजारी असलेल्यांनी सावध राहण्याची गरज आहे. यामुळे शरीरात पेटके येणे, थकवा येणे, उष्माघात यांसारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राहिल.






तापमानवाढ कशामुळे?
गुजरातच्या सौराष्ट्र आणि राजस्थानच्या कच्छमध्ये अनेक ठिकाणी 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाल्याने तिथे उष्णतेची लाट आली आहे. या परिसरातून उष्ण आणि कोरडे वारे उत्तर कोकणाच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे उत्तर कोकणासह मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील तापमान वाढलं आहे.






उष्णतेची लाटेचे निकष कोणते?
कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त असणे यालाच उष्णतेची लाट येणं म्हटलं जातं.  अशा उच्च तापमानामुळे निर्माण होणारी परिस्थिती आणि अति आर्द्रतेमुळे लोकांच्या शरीरावर हानिकारक परिणाम होतो, यामुळे मृत्यू देखील होतो. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार समुद्र किनाऱ्याजवळच्या भागात 37 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त कमाल तापमान नोंदवलं गेलं किंवा कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर उष्णतेची लाट आल्याचं समजलं जातं.






उष्माघाताची लक्षणे
थकवा येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होणं, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे, रक्तदाब वाढणे ही उष्माघाताची काही लक्षणे आहेत. थकवा आणि  हीट स्ट्रोक अर्थात उष्माघातामधील मुख्य फरक असा की हीट स्ट्रोकमध्ये घाम येत नाही.


काय काळजी घ्यावी?
- तापमान अधिक वाढल्याने उन्हात बाहेर पडणं टाळा. घराबाहेर पडणं गरजेचं असल्यास छत्रीचा वापर करा. टोपी किंवा रुमालाने डोकं झाका. हलके आणि सुती कपडे परिधान करा.


- हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज 500 मिली जास्त असते. त्यामुळे जरी तहान लागली नाही तरी जास्त प्रमाणात पाणी प्या.


- चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंकऐवजी ओआरएस, लिंबू सरबत, ताक आदी पेय प्या, जेणेकरुन शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवता येऊ शकतं.