राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


बारावीचा निकाल जाहीर, यंदाही निकालात मुलींची बाजी; कोकण विभाग नंबर वन


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.35 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण  89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. वाचा सविस्तर


सरपंचाने मांडला गावकऱ्यांसमोर मांडला चक्क कमिशनचा हिशोब, महिला सरपंचाने दिला गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का


सरपंच म्हणून गावात होणाऱ्या प्रत्येक कामात सरपंचाचा वेगळं कमिशन ठरलेलं असतं. सरपंचाला कमिशन देणे हा पूर्वपार चालत आलेला एक अलिखित नियमच आहे. आणि त्यामुळे कमिशन घेणे हा सरपंचाचा हक्कच बनला आहे. वेळप्रसंगी कमिशनसाठी काम अडविणे , ठेकेदारांना वेठीस धरणे असेही प्रकार होतात . मात्र कोणत्या कामात किती कमिशन घेतले हे कुणीच कुणाला सांगत नाही हे सर्व गुलदस्त्यातच असतं परंतु आपण अडीच वर्षात किती कमिशन घेतल याचा हिशोबच एका सरपंचाने गावकऱ्यांसमोर मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर


माओवाद्यांचा डाव उधळला, गडचिरोली-छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर 10 माओवाद्यांना अटक, स्फोटक सामग्री जप्त


गडचिरोली-छत्तीसगड-तेलंगण सीमेवर माओवाद्यांच्या हल्ल्याचा कट पुन्हा एकदा फसला आहे. तेलंगणा पोलिसांना 10 माओवाद्यांना अटक करण्यात यश आलं आहे. या सर्व नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे. ही स्फोटके नक्षल संघटनेच्या मोठ्या नेत्याकडे नेली जात होती. छत्तीसगड आणि तेलंगणात राज्यात माओवादी सर्वात मोठ्या नक्षलवादी हल्ल्याच्या तयारीत होते. मात्र पोलीस आणि सीआरपीएफच्या कारवाईने नक्षलवाद्यांचा डाव उधळून लावला आहे. वाचा सविस्तर


संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय? फडणवीसांचा टोला


संसेदच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर ठाकरे गटानेही बहिष्कार घातला आहे. याबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक शब्दात टोला लगावला आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. वाचा सविस्तर


खरेदीचा 'सोनेरी' शुभ मुहूर्त; सुवर्णनगरी जळगावात 'गुरुपुष्यामृत योग' दिनानिमित्त सोनं खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी


आज आहे गुरु पुष्यामृत योग. गुरु पुष्यामृत योग हा सुवर्णनगरी जळगावात सोने खरेदीसाठी सर्वात मोठा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असते अशी अनेक ग्राहकांची श्रद्धा असते. या निमित्ताने सोने खरेदीसाठी ग्राहक सोन्याच्या दुकानात गर्दी करीत असतात. आज सकाळपासून पाहिल्यास, जळगावच्या सुवर्णनगरीत याच निमित्ताने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर