Jalgaon Gold News : आज आहे गुरु पुष्यामृत योग (Guru Pushyamrut Yog). गुरू पुष्यामृत योग हा सुवर्णनगरी जळगावात (Jalgaon) सोने (Gold) खरेदीसाठी सर्वात मोठा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी केलेली सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असते अशी अनेक ग्राहकांची श्रद्धा असते. या निमित्ताने सोने खरेदीसाठी ग्राहक सोन्याच्या दुकानात गर्दी करीत असतात. आज सकाळपासून पाहिल्यास, जळगावच्या सुवर्णनगरीत याच निमित्ताने सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
एकीकडे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली असताना, सोने खरेदीच्या निमित्ताने दोन हजार रुपयांच्या नोटाही बदलून घेण्यासाठी काही ग्राहकांना हा चांगला मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी सोने खरेदीच्या मुहूर्ताबरोबरच नोट बदलीचा मुहूर्तही या निमित्ताने साधला असल्याचं पाहायला मिळत आहे.
व्यावसायिकांसाठी आजचा मुहूर्त चांगला
दोन हजार रुपयांच्या नोटा सोने खरेदीच्या निमित्ताने ग्राहक आज जास्त प्रमाणात आणत असल्याने आजचा मुहूर्त हा आमच्यासाठीही चांगला राहणार असल्याचं सोने व्यावसायिक सांगत आहेत.
ग्राहकांसाठी दोन्ही मुहूर्त साध्य
या संदर्भात, ग्राहकांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली असता ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. एका ग्राहकांनी असं म्हटलं की, 'गुरु पुष्यामृत या दिवशी केलेली सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असल्याने आम्ही या दिवशी काहीना काही प्रमाणात सोने खरेदी करत असतो. त्यात यंदा दोन हजार रुपयांच्या नोटाही आम्हाला बदलण्यासाठी बँकेत जायचे होते ते आम्ही सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करून दोन हजार रुपयांच्या नोटाही बदलून घेतल्याने आमचे दोन्ही मुहूर्त साध्य झाले.' अशा प्रतिक्रया ग्राहकांनी दिल्या आहेत.'
गुरु पुष्यामृत दिनाचा शुभ योग
प्रत्येक वर्षाची काहीतरी वैशिष्ट्य असतात. मराठी 'शोभन नाम संवत्सर' या नवीन वर्षाबाबत जर बोलायचं झालं तर यावर्षी सहा गुरुपृष्यामृताचे योग आहेत. या योगावर लोक अनेक वस्तूंची खरेदी करतात. आजच्या दिवशीचा शुभ योग सकाळी 06.04 पासून सुरु होतो तो सायंकाळी 05.52 पर्यंत असेल.
गुरुपुष्य योगाचे महत्त्व
गुरुवारी हा श्री स्वामी समर्थ यांची आराधना करण्याचा दिवस आहे. गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवाची पूजा केल्यास सुख, वैभव आणि संपत्ती प्राप्त होते. अशी मान्यता अनेक वर्षांपासूनची आहे.
महत्त्वाच्या बातम्या :