आर्थिक संकटात असलेल्या एसटीला शासनाकडून दोनशे कोटींचा रोख निधी, शासनाच्या निर्णयाने दिलासा
आर्थिक संकटात असलेल्या एसटीला शासनाकडून दोनशे कोटीचा निधी रोखीने वितरित होणार आहे. शासनाच्या निर्णयाने एसटी महामंडळाला दिलासा मिळाला आहे.
धुळे : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली एसटी सध्या आर्थिक संकटात आहे. त्यामुळे एसटीला शासनाकडे असलेलं देणं मिळावं, जेणेकरून एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन होण्यास अडचणी उद्भवणार नाही, एसटीच्या किमान प्राथमिक गरजा पूर्ण होण्यास काही अंशी तरी दिलासा मिळू शकतो, यासंदर्भात एबीपी माझाने वेळोवेळी बातमीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे. या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने 3 जानेवारी 2020 या दिवशी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात एसटी महामंडळाला विविध प्रवास सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी द्यावयाच्या 292 कोटी 89 लाख इतक्या रकमेपैकी दोनशे कोटी इतक्या रकमेचा निधी रोखीने प्रदान करण्यास मान्यता देत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सन 2019-2020 या आर्थिक वर्षाच्या तरतुदींमधून हा निधी दिला जाणार आहे.
या परिपत्रकात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, सदर खर्च 2019-2020 या आर्थिक वर्षामध्ये उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा.
शासनाने एसटीला दिलेल्या या दोनशे कोटी रुपयांच्या निधीमुळे दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. शासनाने उर्वरित 92 कोटी 79 रुपयांचा निधीदेखील एसटी महामंडळाला लवकरात लवकर कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावे. तसेच एसटीला इंधन अधिभार, टोल टॅक्स यातूनदेखील मुक्त करावे, अशी मागणी एसटीच्या गोटातून केली जात आहे.
शासनाने एसटीला दिलेल्या दोनशे कोटी रुपयांचा निधी रोखीने वितरित केल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाचे तसेच एबीपी माझाचे देखील आभार मानले आहेत.