मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न यशस्वी झाल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची काल (26 नोव्हेंबर) रात्री सिल्वर ओकवर भेट घेतल्यानंतर पवार कुटुंबातील दूरावा संपल्याचा स्पष्ट झालं. त्यानंतर आज पवार कुटुंबात सर्व आलबेल असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी
अजित पवार म्हणाले की, "मला सध्या काहीही बोलायचं नाही. मी योग्य वेळी बोलेन. मी आधीही बोललो होतो की, मी राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीतच आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार. सगळ्या सहकाऱ्यांसोबतच आहे. गैरसमज करण्याचं कारण नाही. मध्यंतरीच्या काळात अनेक बातम्या आल्या. त्यात तसूभरही तथ्य नव्हतं. त्याबाबत जास्त बोलायचं नाही. पवारसाहेब आमचे नेते आहेत, त्यामुळे मी भेटणारच ना. तो माझा अधिकार आहे. मी आधीही सांगितलं होतं की पवारसाहेब माझे नेते आहेत आणि मी राष्ट्रवादीमध्येच आहे. नेहमी आम्ही आनंदात असतो, काळजी करण्याचं कारण नाही. राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी."
शरद पवारांची भेट
23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत अजित पवार यांनी सगळ्या महाराष्ट्राला धक्का दिला होता. कारण भाजपासोबत जात त्यांनी ही शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधला आमदारांचा एक मोठा गट फोडला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र त्यांच्यासोबत जाणारे सगळे आमदार रविवारी संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीमध्ये परतले. अजित पवारांच्य मनधरणीचे प्रयत्नही सुरु होते. अखेर मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा दिल्याने भाजपाचं सरकार कोसळलं आणि देवेंद्र फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नऊ तासांनी अजित पवार हे सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी गेले. अत्यंत तत्परतेने अजित पवार कारमधून उतरुन घरात गेले. यावेळी त्यांच्या स्वागताला सुप्रिया सुळे उभ्या होत्या.
संबंधित बातम्या
- घडी बसली? शरद पवारांना भेटायला घरी पोहोचले अजित पवार
- Maharashtra Politics | अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- 78 तासांत सरकार कोसळलं! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा
- शरद पवारांनी 78 तासात काय केलं?