मुंबई: महाराष्ट्राच्या  सत्तास्थापनेचा गोंधळ सुरु असताना अजित पवार यांनी अचानक भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन खळबळ उडवून दिली होती. आज अखेर अजित पवार शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांच्या स्वागताला सुप्रिया सुळे उभ्या होत्या.


या तीन दिवसात अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न अनेक नेत्यांनी केले. मात्र अजित पवार यांनी कुणाचेही न ऐकता आपल्या मतावर ठाम राहत ट्वीट करत बहुमत सिद्ध करण्याचा दावा देखील केला. या तीन दिवसात सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता.

आज अखेर अजित पवार शरद पवार यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी सुप्रिया सुळे या ठिकाणी होत्या. या घराचे दरवाजे अजित पवारांसाठी उघडे होते. अत्यंत तत्परतेने अजित पवार कारमधून उतरुन या घरात गेले.  आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत अजित पवार यांनी सगळ्या महाराष्ट्राला धक्का दिला होता. कारण भाजपासोबत जात त्यांनी ही शपथ घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधला आमदारांचा एक मोठा गट फोडला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

मात्र त्यांच्यासोबत जाणारे सगळे आमदार रविवारी संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीमध्ये परतले. अजित पवारांच्य मनधरणीचे प्रयत्नही सुरु होते. अखेर आज म्हणजेच मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यांंनी राजीनामा दिल्याने भाजपाचं सरकार कोसळलं आणि देवेंद्र फडणवीस यांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर नऊ तासांनी अजित पवार हे सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी आले.

सुप्रिया सुळे यांनी वारंवार अजित पवारांना परत येण्याची साद घातली होती. तसंच अजित पवारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न करत होते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील  छगन भुजबळ, रामराजे निंबाळकर यांनी देखील अजित पवारांशी चर्चा केली होती.  शरद पवारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अजित पवारांचे अनेक वर्षांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील यांना अजित पवारांची समजूत काढण्यासाठी पाठवलं होतं. मात्र दीड तासाच्या चर्चेनंतरही अजित पवारांची मनधरणी करण्यात पाटील यांना अपयश आलं. तत्पूर्वी रविवारी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही अजित पवारांची भेट घेतली. तटकरेंनी अजित पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही त्यात अपयश आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांना परतण्यासाठी भावनिक साद घातली आहे. याशिवाय आमदार रोहित पवार यांनीदेखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अजित पवार यांनी माघारी परतण्याचं आवाहन केलं होतं.