मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांचा शपथविधी झाला त्या दिवसापासून त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पक्षामध्ये परत यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाकडून प्रयत्न सुरु होते. अखेर अजित पवार यांनी  राजीनामा दिला आहे. मागच्या तीन दिवसांपासून पवार कुटुंबियांकडून अजित पवारांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु होते. यामागे शरद पवार यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे.
1. अजित पवारांच्या बंडानंतर पहिल्यांदा काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेतृत्वाला विश्वासात घेतलं. अजित पवारांची भूमिका ही राष्ट्रवादीची भूमिका नाही, हे समजावून दिलं.


2. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेलं संभ्रमाचं वातावरण पत्रकार परिषद घेऊन दूर केलं. ज्यात उद्धव ठाकरेंनाही सोबत घेतल्याने महाशिवआघाडी भक्कम असल्याचा विश्वास दिला.

3. शरद पवारांनी पहिल्या पत्रकार परिषदेत आमदारांची ओळख परेड केली. सगळा एपिसोड कथन करायला लावला. आणि भाजपनं फसवणूक केल्याचा संदेश जाईल याची काळजी घेतली.

4. अजित पवारांसोबत कोण-कोण नेते गेलेत, याची माहिती घेतली. त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी राष्ट्रवादीतल्या निष्ठावान, विश्वासू नेत्यांना सोपवली. उदा. वळसे-पाटील, जयंत पाटील, भुजबळ वगैरे

5. दुसऱ्या बाजूला शिवसेना नेत्यांना सोबत घेऊन दूर गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावली, दुरावलेल्या आमदारांवर कुटुंबाचा, निकटवर्तीयांचा दबाव वाढेल याची काळजी घेतली.

6. शरद पवारांनी आमदारांना परत आणून दाखवलं. त्यांच्या प्रतिक्रिया नीटपणे माध्यमात पोहोचतील याची काळजी घेतली. अजित पवारांना एकटे पडल्याची भावना करुन दिली.

7. अजित पवार गटाचे धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि इतर आमदारांना पवारांनी आपल्या भाषेत समज दिली, त्यामुळे पक्षात बंडाला स्थान नसल्याचा थेट आणि स्पष्ट संदेश गेला.

8. अजित पवार यांच्याबाबत कुठलंही उलट किंवा वाईट विधान करणं टाळलं. कुटुंबात फूट पडलीय, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होणार नाही याची काळजी पवारांनी घेतली.

9. अजित पवारांना समजावण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना कामाला लावलं. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, वळसे-पाटील यांना सातत्यानं अजितदादांच्या संपर्कात राहण्यास सांगितलं.

10. अजित पवार बंड करुन एकटे पडले, तरी राष्ट्रवादीपासून दुरावले जाणार नाहीत. कुटुंबापासून दुरावले जाणार नाहीत. ते मानसिकरित्या भाजपच्या गळाला लागणार नाहीत याची काळजी घेतली.

11. अजित पवारांच्या निकटच्या आमदारांना परत आणलं, आणि अजित पवारांसकट भाजपच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स वीक होईल याची काळजी घेतली.

12. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांना एकत्र बांधून ठेवलं. वेळोवेळी भेटीगाठी घेऊन त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला.

13. हयात हॉटेलात एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन केलं. जे देशभरातील मीडियानं पाहिलं. त्यामुळे लोकभावनेविरोधात जाऊन भाजपनं सत्ता स्थापन केल्याचा संदेश दिला.

14. अजित पवारांवर शेवटचा भावनिक वार केला तो सदानंद सुळे आणि प्रतिभा पवार यांच्यातील चर्चेनं. अजित पवारांना काकांच्या बोटाला धरुन आल्याची जाणीव या भेटीनं करुन दिली.

15. अजित पवारांना राजीनामा देण्यास भाग पाडून केंद्रातील मोदी-शाह जोडीला महाराष्ट्रात पहिला शह देण्याची कमालसुद्धा शरद पवारांनी करुन दाखवली.