मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्रीही देवेंद्र फडणवीस यांनी देखील राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमच्याकडे बहुमत नसल्याने राजीनामा देणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांनी काही कारणास्तव राजीनामा दिल्याने आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, त्यामुळं मी राज्यपालांकडे राजीनामा देणार आहे. राज्यात भाजप चांगल्या विरोधी पक्षाचे काम करेल, असेही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीचं ठरलं नव्हतं. शिवसेनेने आकडे बघून बार्गेनिंग सुरु केलं. जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले. महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता, असेही फडणवीस म्हणाले.

आम्ही भूमिका घेतली होती की घोडेबाजार करणार नाही, फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी अख्खा घोड्याचा तबेला उभा केला असेही फडणवीस म्हणाले. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देणार असं कधीही ठरलं नव्हतं. न ठरलेल्या बाबींचा बाऊ केला, अनेक दिवस त्यांची वाट पाहिली, पण त्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. महाविकासआघाडीचं तीन चाकं असलेलं सरकार चालणार नाही, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला, शिवसेनेपेक्षा भाजपला जनादेश मोठा होता, असे म्हणत फडणवीस यांनी पाच वर्ष साथ दिल्याबद्दल शिवसेनेसह सर्व अधिकारी आणि नेत्यांचे आभार मानले.

LIVE UPDATE 




  • जनादेशाचा सन्मान करण्याचा प्रयत्न आम्ही केला : मुख्यमंत्री फडणवीस

  • शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असं कधीचं ठरलं नव्हतं : देवेंद्र फडणवीस

  • शिवसेनेने आकडे बघून बार्गिनिंग सुरु केलं : देवेंद्र फडणवीस

  • जे लोकं मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले : मुख्यमंत्री फडणवीस

  • महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम हा भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी होता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • अजित पवारांनी माझ्याकडे राजीनामा सुपूर्द केला  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • आमच्याजवळ बहुमत उरलेलं नाही, आम्ही कुणाचे आमदार फोडणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस.

  • मी राज्यपालांकडे माझा राजीनामा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

  • भाजप सक्रीय विरोधीपक्षाचं काम करत राहणार - देवेंद्र फडणवीस


महाराष्ट्रात सुरु असलेला सत्तापेच उद्या संपण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी घ्यावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचे लाइव्ह थेट प्रक्षेपण करा असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी उरकणाऱ्या फडणवीस सरकारची विश्वासदर्शक ठरावाची तारीख लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली होती. त्यानुसार उद्याच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्यात यावी आणि हंगामी अध्यक्षांची निवड करण्यात यावी असंही कोर्टाने म्हटले आहेत.

Maharashtra Politics | अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा : सूत्र | ABP Majha



या सगळ्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातं होती. राज्यात स्थापन झालेलं सरकार हे अल्प मतांचं सरकार आहे. त्यामुळे या सरकारने नैतिका म्हणून राजीनामा द्यावा देऊन बहुमताच्या सरकारला संधी दिली पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदेनी केली होती.

महाराष्ट्रातल्या राजकारणातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचं बोललं जात आहे. 23 तारखेला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जातं आहे. हा भाजपसाठी राज्याच्या आणि केंद्राच्या राजकारणात मोठा धक्का मानला जातो आहे.