26/11 Mumbai Terrorist Attack : कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस, 14 वर्षांनंतर राज्य सरकारने उचललं पाऊल
26/11 Mumbai Terrorist Attack : दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बक्षीस मिळणार आहे. मुंबईवर हल्ला झाल्यानंतर 14 वर्षांनी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे.
26/11 Mumbai Terrorist Attack : 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या शौर्याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस मिळणार आहे. अजमल कसाबला धाडसाने पकडणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने 2020 मध्ये घेतला होता. या निर्णयाची आता अंमलबजावणी होणार आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाबसह इतर नऊ दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर अजमल कसाब याला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडलं होतं. या घटनेनंतर तब्बल 12 वर्षांनी म्हणजे 2020 साली कसाबला पकडणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व टीमला वन स्टेप प्रमोशन वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. वन स्टेप प्रमोशन वेतन म्हणजे हे पोलीस ज्या पदावर आहेत त्यांना त्यांच्या वरील पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना जेवढा पगार असेल तेवढा पगार मिळणार आहे. राज्य सरकारकडून 15 जणांना हे बक्षीस मिळणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
मुंबई पोलीसमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, 15 पोलिसांना बक्षीस देण्याचे आदेश गृहमंत्रालयाने जारी केले आहेत. या आदेशानुसार, कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांना पगारात वाढ देण्यात येणार आहे. लवकरच या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.
काय झालं होतं त्या रात्री?
26 नोव्हेंबर रोजी मुंबईतील कामा रुग्णालयाजवळ एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्या हत्येनंतर कसाब आणि त्याच्या दहशतवादी गटाने एक स्कोडा कार हायजॅक केली. ती कार मलबार हिलच्या दिशेने जात होती. या कारला थांबवण्यासाठी डीबी मार्ग पोलिसांच्या एका टीमने गिरगाव चौपाटीवर नाकाबंदी केली. या नाकाबंदीवर कार थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. कार थांबवण्यासाठी पोलीस कर्मचारी पुढे सरसावल्यानंतर कसाबने आपल्या एके 47 रायफलने पोलिसांवर फायरिंग केली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे आणि इतर पोलिसांनी कसाबला पकडण्याचा प्रयत्न केला. तुकाराम ओंबळे न डगमगता निर्भयपणे कसाबवर तुटून पडले यावेळी झालेल्या गोळीबाराच तुकाराम ओंबाळे शहीद झाले आणि पोलीस निरीक्षक संजय गोविळकर जखमी झाले. पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या इस्माईल या दहशतवाद्याला ठार केलं आणि कसाबला जिवंत पकडलं.
मुंबई पोलिसांनी अजमल कसाबला जिवंत पकडल्यामुळे या हल्ल्याची उकल झाली. त्यामुळेच या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षिस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु. या सन्मानासाठी पोलिसांना 2022 या वर्षाची वाट पाहावी लागली.
महत्वाच्या बातम्या
Exclusive : क्या हुआ तेरा वादा? कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा राज्य सरकारला सवाल