मोठी बातमी! दंगलीत महाराष्ट्र देशात अव्वल; राज्यात 2022 मध्ये दंगलीचे आठ हजार गुन्हे
NCRB : विशेष म्हणजे, 2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलींचे तब्बल 8 हजार 218 गुन्हे दाखल झाले आहेत. ज्यात, राज्यातील 9 हजार 558 नागरिक दंगलीमुळे प्रभावित झाले आहे.
मुंबई : मागील काही दिवसांत महराष्ट्रात (Maharashtra) वेगवेगळ्या कारणांनी दंगली (Riot) घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आता याबाबत आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दंगलीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याची आकडेवारी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलींचे तब्बल 8 हजार 218 गुन्हे दाखल झाले आहेत. हत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी असून, 'पोक्सो'च्या गुन्ह्यांमध्येही राज्यात वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे.
आकडेवारी काय सांगते?
देशात 2022 मध्ये सर्वाधिक दंगलीचे गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत. तर, दंगलीच्या घटनांमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ बिहार, उत्तर प्रदेशचा देखील नंबर लागतो. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये महाराष्ट्रात 8 हजार 218 दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. ज्यात, राज्यातील 9 हजार 558 नागरिक दंगलीमुळे प्रभावित झाले. तर, दुसऱ्या क्रमांकावर बिहार असून, गेल्यावर्षी बिहारमध्ये 4 हजार 736 दंगलीचे गुन्हे दाखल झाले. सोबतच उत्तर प्रदेशमध्ये 4 हजार 478 दंगलीचे गुन्हे दाखल असून, उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे.
9 हजार 558 नागरिक दंगलीमुळे प्रभावित
2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलीच्या तब्बल 8 हजार 218 घटनांची नोंद झाली आहे. NCRB च्या अहवालानुसार IPC कलम 147 ,151 अंतर्गत हे गुन्हे नोंदवण्यात आले आहे. ज्यात गेल्या वर्षी महाराष्ट्रात दंगलीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच, 9 हजार 558 नागरिक दंगलीमुळे प्रभावित झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या दंगली प्रकरणांपैकी 28 प्रकरणे जातीय आणि धार्मिक मुद्द्यांशी, 75 प्रकरणे राजकीय मुद्द्यांशी आणि 25 प्रकरणे जाती-संबंधित संघर्षांशी संबंधित होती.
महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या वार्षिक अहवालात भारतातील महिलांवरील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. 2022 मध्ये तब्बल 4 लाख 45 हजार 256 गुन्हे नोंदवण्यात आले आहे. म्हणजेच दर तासाला 51 गुन्हे महिलांबाबत दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे 2021 आणि 2020 मधील आकडेवारीपेक्षा 2022 मधील आकडेवारीत प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांवरील बहुतांश गुन्ह्यांमध्ये पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले असून, याची संख्या 31.4 टक्के आहे. त्यानंतर महिलांच्या अपहरणाचे 19.2 टक्के गुन्हे दाखल आहे. तसेच, महिलांवरील विनयभंगाचे 18.7 टक्के गुन्हे दाखल असून, बलात्कारचे 7.1 टक्के गुन्हे दाखल असल्याचे एनसीआरबीच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: